PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 75 हजार प्रवासी कोकणात दाखल! 75 हजार प्रवासी कोकणात दाखल! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 10 September, 2010 03:45:00 AM मुंबई- गणेशचतुर्थी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना कोकणच्या चाकरमान्यांनी गाव गाठण्यासाठी धडपड चालवली आहे. त्यात रमजान ईद, गणेश चतुर्थी व रविवार अशी सुट्टीची हॅटट्रिक लागून आल्याने एसटी महामंडळ तसेच खासगी गाड्यांमध्ये गर्दीचा महापूर वाहूलागल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे गुरुवारी एकाच दिवशी तब्ब ९०० जादा गाड्या सोडण्यात आल्या असून, या गाड्यांतून सुमारे 75 हजार प्रवाशांनी गावची वाट धरली आहे. सहा ते 11 सप्टेंबर या कालावधीत एसटीने नेहमीच्या 200 गाड्यांव्यतिरिक्त आणखी 1500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई सेंट्रल आगारातून सर्वात जास्त म्हणजे 181 गाड्या सोडण्यात आल्या. त्यात सायंकाळी पाचनंतर मुंबई सेंट्रल आगार, लालबाग येथील साईबाबा चौक, दादर फूल मार्केट या ठिकाणी एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू होती. इतर आगारांतूनही जादा गाडय़ा मागवण्यात आल्याने मुंबई सेंट्रल आगाराबाहेरील मुख्य रस्त्यावरच या गाड्यांची गर्दी झाल्यामुळे चार ते पाच पोलिस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करण्यात गर्क होते. परळ, कुर्ला-नेहरूनगर, ठाणे, कल्याण आदी आगारांमधील वेगवेगळ्या बस स्थानकांवरून कोकणात विविध ठिकाणी गाडय़ा सोडण्यात आल्या. शुक्रवारीदेखील हीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. एसटीचा विशेष नियंत्रण कक्ष प्रवाशांना संबंधित आगारांतून सुटणा-या गाड्यांची माहिती मिळावी, यासाठी एसटीने विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच गाड्यांच्या भाऊगर्दीत आपली नेमकी गाडी कुठली, हे प्रवाशांना कळावे, यासाठी प्रत्येक गाडीवर तिची सुटण्याची वेळही लिहिण्यात येत असल्याचे एसटीतील माहितगाराने सांगितले. तसेच पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आणखी अडीचशे गाडय़ाही एसटीने तैनात ठेवल्या आहेत.