PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदर्भात पावसाचे धूमशान विदर्भात पावसाचे धूमशान ================================================================================ प्रहार वार्ताहर on 10 September, 2010 04:15:00 AM वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर- गेल्या तीन दिवसांपासून भंडा-यात जोरदार बॅटिंग करणा-या पावसाने गडचिरोली, वर्धा आणि चंदप्रूरकडे मोर्चा वळवला आहे. बुधवारी रात्रीपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वर्ध्यात पूरस्थिती ओढवली असून, जिल्ह्याच्या सेलू, हिंगणी, ब्रह्मणी, डोंगरगाव आदी गावांत पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. पावसाचा जोर गुरुवारीही कायम राहिल्याने येथील बोरधरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, या धरणाचे सर्वच्या सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणानजीकच्या हिंगणी, ब्राह्मणी, डोंगरगाव परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. बोरनदीलाही महापूर आल्याने नदीकाठच्या घरांची पडझड झाली असून, हिंगणी येथे हजारोंची लोकवस्ती असलेल्या अनेक घरांत पुराच्या पाण्याने शिरकाव केला आहे. सेलू तालुक्याच्या कौठेवाडा येथील राजू अंबालाल उईके (40) यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर दिलीप डोळस्कर (35) या तरुणाचाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला असून, अन्य दोघे वाहून गेल्याचे समजते. कारंजा तालुक्यातील चिंतामण इंगळे (60) हे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. वर्ध्यात पावसाचा जोर कायम असल्याने साथीच्या विविध आजारांनीही डोके वर काढले असून, सेलू येथील राजाराम ढोबळे (60) याचा मलेरियाने मृत्यू झाला. पावसाची संततधार सुरूच असून, गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने येथील धरणाच्या पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे.