अजित पवारांच्या ‘रोड शो’चा ‘फ्लॉप शो’
पुण्यात बुधवारी अजित पवारांच्या ‘रोड शो’चा ‘फ्लॉप शो’ आयोजन करण्यात आले होते. मात्र तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही दादा आलेच नाहीत.
पुणे- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहरातील विविध भागातून दादा समर्थकांनी गांजवे चौकात एकच गर्दी केली होती. मात्र, तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही दादा आलेच नाहीत. त्यामुळे मोठा गाजावाजा केलेल्या राष्ट्रवादीच्या ‘रोड शो’ चा ‘फ्लॉप शो’ झाला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्व पक्षांत सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पवार यांच्या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा पवार आणि राज ठाकरे यांच्या ‘रोड शो’ला फक्त तीन मोटारींच्या अटीवर परवानगी मिळाल्याने हा ‘रोड शो’ कसा असणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यात पवार यांचा रोड शो सकाळी साडे आकरा वाजता नवी पेठ पत्रकार भवन येथून सुरू होणार होता. मात्र दुपारचे दोन वाजले तरी पवार आलेच नाहीत. उलट ठरलेल्या ठिकाणी न येता पिंपरीतून ते परस्पर शिवाजीनगर भागत गेले. त्यामुळे पत्रकार भवन येथे जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांची निराशा झाली आणि ‘रोड शो’चा ‘फ्लॉप शो’ झाला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार भवन येथे सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. त्यात अनेक काही उमेदवार आपापल्या समर्थकांसह सहभागी झाले होते. प्रत्येक उमेदवाराबरोबर त्याचे चारचाकी वाहन, प्राचाराच्या रिक्षा आणि हातात राष्ट्रवादीचे झेंडे असलेले कार्यकर्ते येथे जमल्याने सर्व परिसराला निवडणुकीचे स्वरुप प्राप्त झाले होते. उपस्थितांमध्ये महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पवार हे वेळेचे पक्के असल्याने ठरलेल्या वेळी सकाळी साडे आकरा ‘रोड शो’ला सुरुवात होणार याची चर्चा होती. ध्वनी क्षेपकाचा मोठा आवाज, जमलेली गर्दी यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. दादा येतील या आशेने कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास वाट पाहिली. मात्र, दादा आलेच नाहीत. त्यामुळे हिरमुसलेला हा जनसमुदाय क्षणार्धात गायब झाला. याबाबत दीपक बिडकर यांना विचारले असता ते म्हणाले, पवार परस्पर शिवाजी नगर येथे गेल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली. मात्र कार्यकत्रे ठरलेल्या मार्गाने ‘रोड शो’ला गेले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवारांनी सकाळी सात वाजता औंध, बाणेर, पाषाण भागातून ‘रोड शो’ला सुरुवात केली. मात्र, शहरातील पेठांत प्रवेश करण्याअगोदरच पवारांना मुंबईचे बोलावणे आल्याने ‘रोड शो’ अर्ध्यावरच सोडून त्यांनी विमानतळ गाठले. त्यामुळे पत्रकार भवन येथे जमलेल्या कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा