PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रज्ञा सिंहला जामीन नामंजूर प्रज्ञा सिंहला जामीन नामंजूर ================================================================================ पीटीआय on 12 March, 2010 04:35:00 PM मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह हिचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. प्रज्ञा सिंह हिला अधिकृतरीत्या अटक होण्यापूर्वी बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवण्यात आले होते, असा दावा तिचे वकील महेश जेठमलानी यांनी केला होता. त्यामुळे तिची जामिनावर मुक्तता केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र प्रज्ञा सिंहला बेकायदेशीररीत्या कोठडीत ठेवल्याचे बचाव पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे नमूद करत, न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी यांनी जामीन नाकारला. कोठडीत छळ होत असल्याबाबत प्रज्ञा सिंहने मानवी हक्क आयोगापुढे सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि न्यायालयासमोर दिलेला जबाब यात विरोधाभास असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागाचा आरोप प्रज्ञा सिंहवर आहे. या स्फोटात सहा जण ठार झाले होते.