मृणाल कुलकर्णी दिग्दर्शनात
गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली मृणाल कुलकर्णी आता एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून आपल्या या पहिल्या चित्रपटात तिने नामवंत कलाकारांची फौजच उभी केली आहे.
मुंबई- गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली मृणाल कुलकर्णी आता एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून आपल्या या पहिल्या चित्रपटात तिने नामवंत कलाकारांची फौजच उभी केली आहे. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते’ असे या चित्रपटाचे नाव असून त्यात सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, विक्रम गोखले, सुनिल बर्वे, सुहास कुलकर्णी यांच्या बरोबरीने मृणाल कुलकर्णीही अभिनय करणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती सचिन पारेकर करत असून त्यांच्या ‘अमोल प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेच्या बॅनरखाली हा चित्रपट येत आहे. कुशाल ठक्कर हे या चित्रपटाचे सहनिर्माते असून येत्या काही दिवसांत चित्रीकरण सुरू होणार आहे.
स्वामी या मालिकेतून पुढे आलेल्या मृणाल कुलकर्णीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. तिची झी वाहिनीवरील अवंतिका ही मालिकाही प्रचंड गाजली होती. परीच्या भूमिकेतूनही ती संपूर्ण देशाला ज्ञात आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेतील तिची जिजाबाईंची भूमिकाही प्रचंड गाजली होती.
गेले काही दिवस ती या चित्रपटाच्या संहितेवर काम करत होती. त्यानंतर नुकतेच तिने या चित्रपटासाठीच्या कलाकारांची निवड पूर्ण केली. येत्या काही दिवसात या चित्रपटाचा मुहूर्त होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक महिला दिग्दर्शकांनी आपला ठसा उमटवला आहे. विजया मेहता, सई परांजपे यांच्यापासून ते प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक चांगल्या कलाकृती निर्माण केल्या आहेत. मृणाल कुलकर्णीची कलाकृतीही त्याच धर्तीची असेल अशी अशा करायला हरकत नाही.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा