जुन्या प्रेमाची नवीन गोष्ट
‘एक दीवाना था’मधला रोमान्स हा बराचसा ओल्ड स्कूल पठडीतला आहे, घरच्यांना प्रेम पसंत नसणं वगैरे पद्धतीचा. त्याचा सेटअप अर्थातच नवा आहे, कंटेंपररी आहे, पण आत्मा जुन्या काळातला (जुनाट नव्हे), चिरंतन आहे.
भारतातल्या मल्टिप्लेक्स क्रांतीमुळे चित्रपट बदलला तसं लव्ह स्टोरीजचं स्वरूपही बदललं. पूर्वी खानदान की इज्जत, आपसी दुश्मनी वगैरे गोष्टी नायक-नायिकेच्या प्रेमात बिब्बा घालायला हजर असायच्या. गेल्या दशकभरात या गोष्टी रोमँटिक चित्रपटांतून जवळपास हद्दपार झाल्या होत्या. चित्रपट जसा अधिकाधिक शहरी, उच्चभ्रू प्रेक्षकांसाठी बनू लागला, त्यांच्या सेन्सिबिलिटीजना प्राधान्य देऊ लागला, तसतसं जुन्या पठडीतल्या लव्ह स्टोरीजची जागा नव्या पिढीतल्या रॉमकॉमनी घेतली. या रॉमकॉममध्ये नायक-नायिका यांच्यावर सगळा फोकस असतो, त्यांच्या भोवतालच्या लोकांना, घरच्यांना फारसं महत्त्व नाही. प्रेमातले जे काही पेच, ज्या काही अडचणी आहेत त्या नायक आणि नायिका यांच्या वैयक्तिक प्रश्नांमधून, स्वभावातून उद्भवणा-या आहेत. त्यांना दोघांच्या घरच्यांच्या मतांची, परस्परसंबंधांची, समजुतींची किनार सहसा नसते. या पार्श्वभूमीवर ‘एक दीवाना था’मधला रोमान्स हा बराचसा ओल्ड स्कूल पठडीतला आहे, घरच्यांना प्रेम पसंत नसणं वगैरे पद्धतीचा. त्याचा सेटअप अर्थातच नवा आहे, कंटेंपररी आहे, पण आत्मा जुन्या काळातला (जुनाट नव्हे), चिरंतन आहे.
मेकॅनिकल इंजिनीअर झालेल्या सचिनला (प्रतीक) चित्रपटांच्या दुनियेत जायचंय, दिग्दर्शक म्हणून. त्यासाठी त्याचा स्ट्रगल सुरू आहे. सुशिक्षित, उच्चभ्रू, उदारमतवादी आईवडील, बहीण असं सचिनचं चौकोनी, सुखी कुटुंब आहे. घरातलं वातावरण प्रसन्न आहे. स्वत:च्या फ्लॅटचा ताबा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं हे कुटुंब काही महिन्यांसाठी भाड्याच्या घरात राहतंय. तिथेच सचिनची गाठ जेस्सीशी (अॅमी जॅक्सन) पडते. धर्माने ख्रिश्चन, वडिलांच्या धाकात असलेली, नाकासमोर पाहून चालणारी, मितभाषी जेस्सीला पाहून सचिन पहिलेछूट तिच्या प्रेमात पडतो. पण अर्थातच या प्रेमाच्या मार्गात अडचणी ब-याच आहेत. सर्वात पहिलं म्हणजे जेस्सीलाही सचिनविषयी प्रेम वाटायला हवं. दुसरी अडचण दोघांचा धर्म वेगळा आहे आणि सचिनचे वडील उदारमतवादी असले तरी जेस्सीचे वडील कर्मठ आहेत. तिसरी अडचण म्हणजे धर्माचा पगडा जेस्सीच्या वडिलांवर इतका आहे की, चित्रपट या प्रकाराला ते पाप समजतात. आधीच सचिन हिंदू, त्यात चित्रपटांशी संबंधित; त्यामुळे हे प्रेमप्रकरण साधं-सोपं नाही.
अशा पद्धतीच्या लव्ह स्टोरीजमध्ये ज्या टप्प्यांवर जे पेच निर्माण होत असतात, त्याच मार्गाने हा चित्रपट जातो. या प्रवासात काही नावीन्य नाही. पण प्रतीक-अॅमीची फ्रेश जोडी, केरळची नेत्रसुखद आणि हिंदी चित्रपटांमध्ये इतक्या प्रामुख्याने क्वचितच दिसणारी पार्श्वभूमी आणि गौतम मेननचं सफाईदार दिग्दर्शन यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. रोमँटिक चित्रपटात लागणारे अनेक छोटछोटे लोभस क्षण या चित्रपटात आहेत. मुख्य जोडीची केमिस्ट्री आहे. प्रतीकला पहिल्यांदाच 100 टक्के व्यावसायिक चौकटीतल्या नायकाची भूमिका मिळाली आहे आणि अशा प्रकारची भूमिका पेलण्याची आपली कुवत असल्याचं तो दाखवून देतो. इतकंच नव्हे तर दिसायला सुंदर पण अभिनयाला मठ्ठ असलेल्या अॅमी जॅक्सनची लंगडी बाजूही तो सांभाळून घेतो. मनू ऋषी या अभिनेत्याने त्यांना उत्तम साथ दिली आहे. यापूर्वी त्याने ‘ओये लक्की लक्की ओये’ आणि ‘फँस गये रे ओबामा’मधल्या भन्नाट भूमिकांमधून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो स्वत: चांगला संवादलेखकही (ओये लक्की., यह साली जिंदगी) आहे. या चित्रपटांचे संवादही त्याचे आहेच. या संवादांमध्ये स्वाभाविकता आहे आणि वेळप्रसंगी ते काव्यात्मही होतात.
या चित्रपटातला संघर्ष हा जसा ‘ओल्ड स्कूल’ प्रकारचा आहे, तसंच दिग्दर्शक गौतम मेननने काही प्रसंगांची हाताळणीही जुन्या तंत्राने केली आहे. म्हणजे दीर्घ प्रसंग आणि स्थिर कॅमेरा. हल्ली छोटेछोटे शॉट्स, जास्तीत जास्त कट्स आणि सतत हलणारा कॅमेरा ही आजच्या सिनेमाची परिभाषा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या जुन्या तंत्राचा वापर चटकन नजरेत भरतो आणि जिथे घटना फार नाहीत आणि केरळसारख्या शांत ठिकाणी घडणा-या या लव्ह स्टोरीसाठी तो परिणामकारकही ठरतो. या दृष्टीने क्लायमॅक्सच्या आधी, जेव्हा सचिन आणि जेस्सी दोन वर्षाच्या खंडाने पुन्हा एकमेकांसमोर येतात, तो प्रसंग बघण्यासारखा आहे. ताजमहालाभोवतालच्या बागेत ते आहेत, मागे पार्श्वभूमीवर ताजमहाल दिसतोय. हे दोघे एका बाकड्यावर बसलेत, दोघांमध्ये संभाषण सुरू आहे आणि कॅमेरा आपल्याजागी स्थिर आहे. कॅमे-याची कमीतकमी हालचाल करत दिग्दर्शकाने हा इमोशनल प्रसंग टिपल्यामुळे त्या भावनांची खोली प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. चित्रपटाची लांबी मात्र त्याने किमान अर्ध्या तासाने कमी करण्याची गरज होती. पावणेदोन तासांपेक्षा जास्तीचा मसाला या चित्रपटात नाही. त्यामुळे एका टप्प्यानंतर चित्रपट जेव्हा गोगलगायीच्या गतीने सरकू लागतो, तेव्हा या लव्ह स्टोरीपासून आपलं मन दूर जायला सुरुवात होते.
ए. आर. रेहमानचं संगीतही साफ निराशा करतं. गाणी सुश्राव्य आहेत, पण एकही चाल थुईथुई नाचायला लावणारी किंवा ‘तू ही रे’सारखी पोटाचा तळ ढवळून काढणारी नाही. चित्रपट पाहताना ती ऐकायला बरी वाटतात, पण नंतर लक्षात राहत नाहीत. रोमँटिक चित्रपटासाठी संगीत ही सर्वात महत्त्वाची बाजू आहे. मेकर्सनाही हे माहिती आहे, कारण चित्रपटाचं मार्केटिंगच ‘ए. आर. रेहमान अँड जावेद अख्तर म्युझिकल’ असं केलंय. पण दुर्दैवाने संगीताची बाजू तितकीशी भक्कम नाही.
छायालेखक एम. एस. प्रभू यांनी केरळचा चार्म सुरेख टिपला आहे. तिथलं नुसतंच निसर्गसौंदर्य नाही, तर जो टुमदारपणा आहे, तोही त्यांच्या कॅमे-याने मस्त पकडला आहे. संकलकाने मात्र कात्री अधिक निर्दयीपणे चालवण्याची गरज होती.
एकंदरीत, ‘एक दीवाना था’ फार ग्रेट सिनेमा नसला तरी ब-यापैकी मनोरंजन करणारा आणि काही लोभस क्षण दाखवणारा आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे. ढणढणाटी संगीत, लार्जर दॅन लाइफ व्यक्तिरेखा आणि छाती दडपवणारी स्केल यापेक्षा खूप लांबचा, छोटासा आणि म्हणूनच भावणारा.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा