माझे संकल्प, माझ्या अपेक्षा
संकल्प लहान, कृती महान!
या वर्षी अगदी मनापासून मी काही संकल्प करणार आहे. जसे सकाळी लवकर उठणे, फोनवर मोजकेच बोलणे, शक्यतो कामाशिवाय कोणालाही फोनच न करणे. पण यावेळी देशाला, मुंबईला आपल्या सर्वाची खूप गरज आहे. यावर्षी मुंबईत ‘पाणी टंचाई’ सर्वात मोठी समस्या आहे. मुंबई शहराची लोकवस्ती झपाटय़ाने वाढत असल्याने फक्त २ महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. यावर्षी माझ्याबरोबर आपण सगळे रोज प्रत्येक जण निदान अर्धी बादली पाणी वाचवलीत तरी किती पाणी बचत होईल? दुसरा संकल्प म्हणजे विजेची बचत करीन, ज्या खोलीत बसेन फक्त तेथीलच दिवा लावीन. रिकाम्या वेळेत दुर्बल घटकांना शिक्षण देईन.
- अर्चना ठक्कर, डोंबिवली.
पाणी वाचवेन, रिक्षा टाळेन!
सरत्या वर्षाच्या काही कटू आठवणींना निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना मनात खूप काही करण्याची एक नवी उमेद निर्माण होते. या वर्षी बदलत्या काळानुसार मी माझे संकल्पही बदलले आहेत. नवीन वर्षात मी घरात व कार्यालयात वीज आणि पाणी यांची जास्तीत जास्त बचत करणार व इतरानांही करायला लावणार आहे. वाढत्या महागाईला तोंड देताना काटकसर म्हणून सकाळ-संध्याकाळचा प्रवास रिक्षाऐवजी पायीच करणार. प्रवासात सावध-जागरूक राहून समाजविघातक कृत्ये रोखणार आणि गरज पडल्यास जनतेच्या दैनंदिन समस्यांवर ‘प्रहार’च्या माध्यमातून आवाज उठवणार आणि हो.. हे सर्व सोडलेले संकल्प पूर्ण करण्याचा निश्चय आहे!
- अनिल महादेव बने, डोंबिवली (प.)
भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढणार
मी २०१०चे तीन संकल्प केले आहेत. १) पाणी जपून वापरणे. २) आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा राहील याची काळजी घेणे. वेळ पडल्यास महापालिकेची व महापौर यांची मदत घेणे. ३) भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. भ्रष्टाचार निपटून काढणे वाटते तितके सोपे नाही. भ्रष्टाचारी लोकांना अटक होते. भ्रष्टाचारी माणसाला अशी शिक्षा व्हावयास पाहिजे की कुणीही भ्रष्टाचार करण्यास धजणार नाही. मी मधल्या काळात लालकृष्ण अडवाणी व विलासराव देशमुख यांना पत्रे पाठविली होती की, आपण भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? पण त्या पत्रांचे दोघांकडून उत्तर मिळाले नाही. मी आता नव्या वर्षात भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी मला जे शक्य होईल ते सर्व करणार आहे. वेळ पडल्यास चांगल्या लोकांची व प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचा विचार आहे. आता माझे वय ७९ आहे. मी आता कशाचीही अगदी मृत्यूचीही पर्वा करणार नाही.
- मधुकर धोकटे, माहीम.
सर्वच क्षेत्रांत राखीव जागा हव्यात
मागच्या वर्षापेक्षा २०१० साल सुसह्य व्हावे, यासाठी काही धोरणात्मक निर्णय राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहेत. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजन करणा-यांना सवलती दिल्या पाहिजेत. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर संपूर्णपणे बंदी घालून प्लॅस्टिक वापरणा-यांना दंड केला पाहिजे. नोकरी, उद्योगधंदा, व्यापार यात राखीव जागेची अमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे. लोकशाही मूल्यांचे तंतोतंत पालन सर्वानी केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या स्वप्नातील भारत देश पुन्हा निर्माण व्हावा, हीच माझी अपेक्षा!
- सोनाली झोरे, वडाळा.
अपेक्षा अन्याय थांबण्याची..
आपल्या देशामध्ये कोणी गरीब राहू नये, कुणाचीही उपासमार होऊ नये, सगळय़ा गोरगरीबांना कामे मिळावीत. न्यायालयात निकाल लवकरात लवकर मिळावे. गोर-गरीब लोकांकडून, मालक वर्ग रोज १० ते १२ तास काम करून घेतात त्यांच्यावर अन्याय होत आहे. उदाहरणार्थ कारखान्यात काम करणारे मजूर व ड्रायव्हर यांच्यावर होणारा अन्याय थांबला पाहिजे असे मला वाटते.
- केशव नागनुरी, कांजूरमार्ग.
भारताने जगाचे नेतृत्व करावे
हे नवे वर्ष दलित, आदिवासी, भटक्या जाती-जमाती, अनुसूचित जाती, बौद्ध व सर्वधर्मीय गोर-गरीबांना सुख-समाधान, आनंदाचे गेले पाहिजे. मला वाटते, नव्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती साक्षर असलीच पाहिजे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आनंदाने वागावे, नांदावे. गरीबांच्या अडीअडचणींकडे आणि धनदांडग्यांच्या जुलुमाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणारा नेता या वर्षात उदयास यावा आणि त्याने भारताला प्रगतीपथावर न्यावे, भारताने जगाचे नेतृत्व करावे.
- सुभाष झोरे, दादर.
महाराष्ट्र झोपडीमुक्त व्हावा..
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला २०१० मध्ये गती यावी. मुंबईतल्या खासगी व सरकारी जमिनींवरील झोपडीधारकांना ६० व १०० रुपये शुल्क घेऊन फोटोपास देण्याची योजना जानेवारी २००३ पासून सुरू झाली. याचे सर्वेक्षण मे २००० मध्येच झाले होते आणि ऑगस्ट २००० मध्ये फॉर्म भरून घेण्यात आले होते. काहीजणांचे फोटोपास मिळाले नसल्याने ‘झोपडीमुक्त महाराष्ट्र’ घोषणेलाही खीळ बसते आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करून या योजनेला गती द्यावी आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून ऑगस्ट २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना किमान २६९ चौरस फुटांची घरे द्यावीत.
- अनंत शेलार, दहिसर.
अपेक्षा कणकवलीसाठी..
कणकवली शहराला जोडणारे रस्ते अरुंद व निमुळते व खराब झालेले आहेत. आचरा रोड खराब झालेला आहे. रविवार, बुधवार, शुक्रवारी भरणा-या मच्छी बाजारासाठी वेगळी जागा निवडणे या नवीन वर्षात होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाच्या कणकवली शहराचा दृष्टीने लक्ष देऊन पर्यटनाला वेग यावा.
- श्री. विठ्ठल द. रावराणे, कणकवली.
पर्यावरण वाचवण्याची वेळ
आता वेळ आलीय की केलेले संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक बाबतीत सरकारवर अवलंबून न राहता सामाजिक बांधीलकी, आपलं नैतिक कर्तव्य करण्याची वेळ आलीय. महागाई, पाणीटंचाई, प्रदूषण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लॅस्टिकबंदी, काँक्रिटची जंगलं, दहशतवाद, ग्लोबल वार्मिग या सा-या समस्या सोडवण्यासाठी खारीचा वाटा उचलूया. नव्या वर्षात पाण्याचा काटकसरीने वापर करूया. हे वर्ष ‘पर्यावरण वर्ष’ घोषित व्हावं. पर्यावरणास हातभार लावणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळावं. जे नवे प्रकल्प राबवले जातील ते सारे पर्यावरणाभिमुख असावेत. देशाच्या विकासाच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञान हवंय, पण मनाला प्रसन्नता देणारी हिरवाई नष्ट होतेय, ते थांबायला हवं. लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धांवर होणारे अन्याय थांबायला हवेत. दहशतवाद मुळापासून उखडला जावा आणि सर्वत्र सुखशांती नांदावी आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे क्रूरकर्मा अजमल कसाब नावाच्या ‘कसाया’ला या वर्षात थोडीसुद्धा दयामाया न दाखवता असं मरण द्यावं, की मृत्यूचासुद्धा थरकाप उडावा!
- शीतल साळुंके, घाटकोपर
सामाजिक उपक्रमांचा संकल्प
रक्तदान शिबिरं, एड्स जनजागृती मोहीम, प्लस पोलिओ, लसीकरण मोहीम, वृक्षारोपण मोहीम यासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन माझे समाजाच्या प्रति असलेले कर्तव्य पूर्ण करण्याचा आणि सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न मी २०१० मध्ये करणार आहे. सध्या अन्य देशांप्रमाणे आपल्या देशालाही जागतिक तापमानवाढीचे चटके बसत आहे. आपल्या देशाला या संकटापासून वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना आहे, त्या उपाययोजनांचा वापर मी करणार आहे. त्याचबरोबर निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संरक्षणही करेन. आपल्या देशात अस्वच्छतेचे जे साम्राज्य पसरले आहे, ते दूर करण्यासाठी मी माझ्या स्वत:पासून सुरुवात करणार आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
- स्वप्नील साळवे, कुर्ला
भारताने स्वयंसिद्ध व्हावे
वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने, सरकारी आस्थापनांमधील अनुशेष भरून काढावा. महाराष्ट्रातील कारखाने बंद किंवा दुस-या राज्यात जाऊ नयेत, म्हणून प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र सरकारने या नवीन वर्षामध्ये देशाच्या सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व द्यावे. भारताला भेडसावणाऱ्या दहशतवादी कारवाया, चीनकडून होणा-या कुरापती, अमेरिकेच्या दबावाला अजिबात भीक न घालणे या सर्व मुद्दय़ांवर भारताने कठोर व्हावयाला हवे. पाकिस्तानच्या कारवायांवर बारिक लक्ष ठेवले पाहिजे. भारताने पूर्वीचा मित्र रशियाबरोबर अणुसंशोधन आणि लष्करी सामर्थ्य या बाबतीत जो पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपल्या रशियाच्या दौऱ्यात करार केला त्याची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण अमेरिकेच्या प्रचंड जाचक अटीपेक्षा रशियाबरोबरील करार भारताला खूप लाभदायक ठरलेला आहे. भारतात पुन्हा
मोठा पाकपुरस्कृत अतिरेकी हल्ला होऊ नये म्हणून भारताने अमेरिकेच्या तालावर न नाचता पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविण्याचा संकल्प या नवीन वर्षात करावा. पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य कमी करण्याकरीता प्रत्येक नागरिकाने आपल्यापासून पाणी बचतीची सवय लावावी. महापालिकेने प्रथम उंच टॉवर्सना पाणी देण्याचे बंद करावे. तसेच उच्चभ्रूंच्या ‘हाय-फाय’ सोसायटय़ांमधून होणारा पाण्याचा अपव्यय बंद करण्याकरिता अशा सोसायटय़ांवर कडक कारवाई करावी.
- नरेंद्र कदम, मुंबई.
वाचनही वाढवणार
मला ‘रक्तदाना’सारखे सर्वश्रेष्ठ दान जास्त वेळ करायचे आहे. गरिबांना केवळ पोकळ सहानुभूती न दाखवता माझ्यातर्फे जेवढी आर्थिक मदत होईल. तेवढी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे अवांतर वाचन थोडे कमी झाले आहे. उदा. कथा, कांदबरी, कवी यांच्या पुस्तक वाचण्यावर तसेच महान पुरुषांच्या आत्मचरित्र वाचण्यावर भर देणार आहे.
-विनायक कांबळे, कणकवली.
अपेक्षा अनेक, संकल्प एक!
सर्वात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे ‘आर्थिक मंदी’ सरून औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात भरभराट येवो. आमच्या साऱ्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना रोजगार आणि शेतमालाला चांगला भाव मिळो. सरकारनेही योजनेची अमलबजावणी करून पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे. शाळेची बस, सहल आणि त्यामधील अपघात, उच्च शिक्षणाचा प्रवेश घोटाळा यापासून हे वर्ष मुक्त राहावे.
- प्रमोद कडू, पनवेल.
माणुसकी जपेन..
यावर्षी मी आपल्या परिने गरजवंतांना मदत करताना माणुसकी जपण्याचा संकल्प करत आहे. असं जरी असलं तरी यंदा जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. पाऊस कमी झालाय, बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालंय. शहरात इमारतींच्या कोंडमा-याने झोपडपट्टीवासियांचा जीव टांगणीला आलाय. बिल्डर लॉबी सोकावताना गरिबांना मात्र आपलं घर टिकेल का या चिंतेने ग्रासलंय.. महागाईचा आगडोंब.. आणि म्हणूनच हे नववर्षा तू येताना राज्यकर्त्यांना जनतेची ख-या अर्थाने प्रामाणिक सेवा करण्याची इच्छा घेऊन ये.. आणि हे झालं नाही तरी सामान्यांना जगण्यासाठी, संकटांवर मात करण्यासाठी बळ घेऊन ये.
- रोशन कांबळे, अंधेरी.
पर्यावरणनिष्ठा जपेन..
मी पर्यावरणाला पोषक असे राहणीमान अवलंबण्याची सुरुवात करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या व वस्तूंचा कमीत कमी वापर करणे, वीज व पाण्याचा काटकसरीने वापर करणे, वीज व पाणी बचतीच्या उपायांचे काटेकोरपणे नियम पाळणे, ओला व सुका कचरा यांचे व्यवस्थित नियोजन करणे, पोषक झाडांची लागवड करणे, मोबाइल फोनचा कमी वापर करणे, सार्वजनिक स्वच्छता व उपक्रम यासाठी वेळ देणे आणि हा उत्साह मिळवण्यासाठी दररोज नियमितपणे व्यायाम करणे.. हे माझे पर्यावरणनिष्ठेचे संकल्प आहेत.
- सुहास बसणकर, दादर (मुंबई).
प्रश्न गंभीर, अपेक्षा गांभीर्याची
महागाईचे दर २००९ सालात आकाशाला भिडल्यामुळे काय खावे व काय खाऊ नये हा विचार मध्यमवर्गीयांना व गरिबांना करावा लागतो. विजेचे बिल पूर्वी दोन महिन्याला २५० ते ३०० रु. यायचे. आता महिन्याला ९०० ते १००० रु. येते सामान्य माणसाने घरात विजेचे दिवे लावायचे की नाही? तलावात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे फक्त सामान्य माणसालाच पाणी टंचाईचे धक्के सहन करावे लागतात. श्रीमंताना, मल्टीप्लेक्सला व टॉवर्समध्ये राहणाऱ्यांकडून बागा आणि स्विमिंग पूलसाठी पाण्याचा अवाजवी वापर होत असतो. नव्या वर्षात महाराष्ट्रात येणरे परप्रांतीयांचे लोंढे रोखले गेले पाहिजेत. ते जर रोखले नाहीत, तर वर्षानुवर्षे रहाणा-या स्थानिकांना मुंबई, महाराष्ट्र सोडून जायची वेळ येईल. या सर्व विषयांकडे राज्य सरकार गांभीर्याने
पाहील का?
- मधुसूदन पु. पेरेकर, उमरखाडी.
