आम्ही वाचक 'प्रहार'चे
अरुण साधू
‘प्रहार’ हे एक दर्जेदार दैनिक आहे. शुद्ध व सुसंस्कृत मराठी भाषेचा वापर, विविधांगी लेख, सांस्कृतिक पुरवण्या तसेच पानांची उत्तम मांडणी या दृष्टीने महाराष्ट्रातील अव्वल दर्जाच्या वृत्तपत्रांमध्ये ‘प्रहार’ने अगदी थोड्याच अवधित स्थान मिळविले आहे. त्याबद्दल संपादक व त्यांच्या सहका-यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
‘प्रहार’ हे अतिशय दर्जेदार व वाचनीय दैनिक आहे. दैनिकात दररोज प्रसिद्ध होणारा मजकूर, छपाईचा दर्जा, रंगसंगती यात कुठेही नाव ठेवायला जागा नाही. म्हणूनच मी ‘प्रहार’चा नियमित वाचक आहे. सध्याच्या अटीतटीच्या स्पध्रेच्या युगातही प्रसारमाध्यमांच्या कठीण उद्योगात उडी घेऊन अल्पकाळात आपला ठसा उमटविण्यात ‘प्रहार’ यशस्वी झाले आहे, हे निश्चित!
डी. शिवानंदन, पोलिस आयुक्त
सात महिन्यांपूर्वी मी इस्रायलचा दौरा करून मुंबईत परतलो होतो. त्या वेळी एका कार्यक्रमात मी इस्रायलच्या सुरक्षेविषयीच्या तंत्रज्ञानाचे कौतुक केले होते. तसेच भारतातसुद्धा अशी यंत्रणा असण्याबद्दल बोललो, परंतु एका वृत्तसंस्थेने चुकीच्या पद्धतीने बातमी दिली. रात्री दहाच्या सुमारास मला ‘प्रहार’मधून फोन आला आणि त्या बातमीची सत्यता पडताळली. एखाद्या बातमीची शहानिशा करूनच ती छापली जावी, हीच त्या वृत्तपत्राची विश्वासार्हता असते.
डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ
मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘प्रहार’चे आगमन झाल्याने त्याचे ‘राज’कीय पडसादच जास्त उमटले, परंतु एक वृत्तपत्र म्हणून निर्भेळ दृष्टीने पाहिले तर ‘न्यूज’ म्हणजे बातम्या आणि ‘व्ह्यूज’ म्हणजे दृष्टिकोन या दोन्ही पातळ्यांवर ‘प्रहार’ची वाटचाल नि:पक्षपातीपणे झालेली दिसते. या वृत्तपत्राचे बाह्यरंग तर आकर्षक आहेतच पण बातम्याही चौफेर असतात. महत्त्वाचे म्हणजे संपादकीय विचारही समतोल आहेत.
जयराज साळगावकर
‘प्रहार’ नावाचे दैनिक नारायण राणे काढणार आहेत, असे मला ज्यावेळी समजले तेव्हा त्यांच्या स्वभावानुसार ते असणार असे वाटले. परंतु प्रहारचा पहिलाच अंक बघितला आणि मी थक्कच झालो. राजकारणातील अग्रेसर नेत्याचे असेही दैनिक असू शकते यावर प्रथमच विश्वास बसला. नियमित कौटुंबिक जिव्हाळ्याचे हे दैनिक खरोखरीच कुटुंबवत्सल आहे. बातम्यांमध्ये आणखी आक्रमकता आली तर राज्यातील अग्रेसर दैनिक म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. जयराज फाटक, मुंबई महापालिका आयुक्त
दैनिक ‘प्रहार’ने अवघ्या एका वर्षातच त्याचा वेगळा वाचकवर्ग निर्माण करण्याजोगी मजल मारली आहे. त्यामुळे ‘प्रहार’ची टीम अभिनंदनास पात्र आहे. विविध क्षेत्रांतील बातम्यांसह वेगवेगळे लेखही वाचनीय असतात. महापालिकेच्या बातम्याही चांगल्या असतात. एक सकस वृत्तपत्र वाचल्याचे समाधान लाभते. ‘प्रहार’ची अशीच वृद्धी होत जाऊन तो लोकांपर्यंत पोहोचावा. सर्वाधिक खपाचा अंक म्हणून नावलौकिक मिळावा, ही शभेच्छा!
उज्ज्वल निकम, सरकारी वकील
‘प्रहार’ हे निश्चितपणे स्वतंत्र दैनिक आहे. एका राजकीय नेत्याच्या मालकीचे असले तरी त्याची मते त्यावर लादली गेलेली नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येते. वृत्तांकन करताना ते सर्वागीण असावे, हे तत्त्व ‘प्रहार’ने कसोशीने पाळले आहे. ‘प्रहार’ने केवळ मुंबई व कोकणपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर आपला विस्तार करावा हीच माझी अपेक्षा असून त्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छाही!
डॉ. असद रेहमानी, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
प्रहारला पहिल्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा. जगापुढच्या प्रमुख प्रश्नांपैकी पर्यावरणाचा प्रश्न आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या वर्षातच ‘प्रहार’ने आपल्या वृत्तपत्रात पर्यावरण संवर्धनाच्या गंभीर प्रश्नांना स्थान दिले आहे. पर्यावरणाबाबत जाणीवजागृतीच्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापुढेही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर प्रकाशझोत टाकून ‘प्रहार’ आपला खारीचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे.
कौशल इनामदार, संगीतकार
मराठी संस्कृती काय आहे, ‘प्रहार’ने त्याची नेहमीच जाणीव करून दिली आहे. मुंबईचा मराठी चेहरा खुलवण्याचे चांगले काम या दैनिकाने नेहमीच केले आहे. भाषा, मांडणी, निर्मितीमूल्ये चांगल्या दर्जाची असून हातात पडल्या पडल्या कुठलेही पान उघडले तरी ते वाचनीय असते. मुख्य अंकाबरोबर ‘मुंबई प्रहार’, ‘रिलॅक्स’, ‘कोलाज’ या पुरवण्यांनी कायमच आकर्षित केले आहे. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हटले तरी वावगे ठरू नये.
प्रशांत कुलकर्णी, व्यंगचित्रकार
दैनिक ‘प्रहार’मुळे मराठी वृत्तपत्रसृष्टीत निश्चितच ताजेपणा आला आहे. विविधतेबरोबरच सुसंस्कृत दर्जेदारपणा हे ‘प्रहार’च्या पुरवण्यांचे वैशिष्टय़ ठरावे. प्रहारची मांडणी आणि सजावटही आकर्षक असते. ‘प्रहार इफेक्ट’ किंवा ‘याला म्हणतात प्रहार’ यासारख्या उपक्रमामुळे ‘बदल’ हा प्रत्यक्षातही होतो, हे वाचकांच्या दृष्टीने लाखमोलाचे!! त्यातून ‘प्रहार’ने लोकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीत अल्पावधीत आपला ठसा उमटवणा-या ‘प्रहार’ला शुभेच्छा!
अंकुश चौधरी , अभिनेता
व्यावसायिक व्यग्रता आणि धावपळीमुळे कधी शांतपणे वृत्तपत्र वाचायला मिळत नाही. मुंबईत असताना प्रहार वाचतोच. मात्र मी मध्यंतरी जेव्हा शुटिंगच्या निमित्ताने गोव्यात अनेक दिवस होतो, त्यावेळी मी प्रहारचा नियमित वाचक होतो. अंक अतिशय उत्कृष्ट निघतो. सगळयाच विषयांची त्यामधून चांगली माहिती मिळते. कोकणाच्या विकासाची दृष्टी या वृत्तपत्रामधून दिसत असते. प्रहारच्या पुरवण्यांमधून येणारी विविध विषयांवरची माहितीही उपयुक्त असते. प्रहारच्या पुढील वाटचालीला माझ्या शुभेच्छा.
डॉ. वैजयंती पंडित, संचालक, फिक्की (पश्चिम क्षेत्र) ‘प्रहार’च्या रूपाने मराठी वाचकांना एक चांगलं वर्तमान पत्र मिळालं असं मला वाटतं. महाराष्ट्राबद्दल चांगलं विश्लेषण या अंकात दिसतं. लेखांची निवड विचारपूर्वक केलेली दिसते. वेगवेगळे विषय हाताळण्याकडे कल दिसतो. आर्थिक विषयांचा मागोवाही समाधानकारक आहे. मला अंक आवडतो. आज अंकाचा पहिला वाढदिवस. अजून मोठा पल्ला बाकी आहे. त्यासाठी सतत प्रयत्न व्हावेत आणि हा अंक सतत वाढत राहो या माझ्या मनापासून शुभेच्छा!
भार्गवी चिरमुले, अभिनेत्री
‘प्रहार’चा अंक हा वाचनीय आहेच त्याचबरोबर तो प्रेक्षणीयही आहे. अतिशय उत्तम रंगसंगतीमध्ये येणा-या प्रहारच्या पहिल्या पानामुळेच हा अंक अगदी आपलासा वाटतो. मला तशी वृत्तपत्र वाचण्याची सवय नाही. मात्र एका सदरात जेव्हा माझी नापाक कृती छापून आली होती त्यावेळी अनेकांनी मला फोन केले. महिलांसाठी फार चांगली सदरे आणि महिलांना उपयुक्त ठरेल अशी माहिती मला प्रहारमध्ये मिळते.
प्रज्ञा दया पवार, कवयित्री
‘प्रहार’ची मला जाणवलेली सगळ्यात जमेची आणि सकारात्मक बाजू म्हणजे साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या घडामोडींना चांगली जागा दिली जाते. या क्षेत्रातल्या घडामोडींबद्दलचे खोल आकलन, भानही त्यातून दिसते. त्यामुळे अतिशय गंभीर, सकस आणि समृद्ध करणारे लेखन त्यात वाचायला मिळते. समाजातल्या समकालीन प्रश्नांना लगटून असणारे कालचे आणि उद्याचेही प्रश्न समजून घेऊन हे विषय मांडणा-या पत्रकारांना या यशाचे श्रेय जाते.
नागेश भोसले, अभिनेता प्रहार आजच्या युवकांचे वृत्तपत्र आहे, त्यांच्यासाठी विविध विषयांवरची माहिती असते, त्याचबरोबर विविध सदरांमधूनही सकारात्मकता जपली आहे. एका राजकीय नेतृत्वाचे हे वृत्तपत्र असूनही त्यातल्या बातम्या निरपेक्ष असतात. समाजाच्या विकासाचा ध्यास त्या बातम्यांमधून सहज दिसून येतो. एक स्वतंत्र आणि निरपेक्ष बातम्या देणारे हे वृत्तपत्र आहे. प्रहारने यापुढील काळातही अशाच उत्साहात आपली वाटचाल सुरू ठेवावी.
अरुण केदार, राष्ट्रीय कॅरम विजेता ‘प्रहार’ वर्तमानपत्रात स्पोर्ट्ससाठी बरीच जागा मिळते, ही माझ्यासारख्या खेळाडूसाठी आनंदाची बाब. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्यांना प्रसिद्धी मिळते. तसेच देशी खेळांनाही चांगले ‘कव्हरेज’ दिले जाते. कबड्डी, खो-खो, मल्लखांब, कॅरम या दुर्लक्षित क्रीडा प्रकारांनाही योग्य न्याय दिला जात आहे. ‘प्रहार’मधील लेख वाचनीय आहेतच. तसेच पेपरचा दर्जा, आकर्षक मांडणी आणि रचना इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत सरस आहे.
जयू भाटकर, दूरदर्शन निर्माते
वृत्तपत्रसृष्टीत ‘प्रहार’चे आगमन झाले तेव्हा नारायण राणेंचे वृत्तपत्र म्हणजे राजकीयच असणार, असे वाटले होते. मात्र ‘प्रहार’ वाचत राहिल्यावर कालांतराने या शंका गळून पडल्या. आता तर दररोज सकाळी ‘प्रहार’ वाचल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभत नाही. आकर्षक मांडणी, उत्तम बातम्या तसेच वाडीवस्ती, हृद्गत अशी एकाहून एक सदरे असलेल्या वाचनीय पुरवण्या यामुळे हे वृत्तपत्र राज्यातील प्रतिष्ठित वृत्तपत्रांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. एकंदरीत नाव ‘प्रहार’ असले तरी हे दैनिक म्हणजे साहित्यिक उपहार-अलंकार आहे..
आणखी काही वाचकांनी व्यक्त केलेले मनोगत...
प्रिय ‘प्रहार’..
आज तू एक वर्षाचा झालास त्याकरिता तुझे अभिनंदन! या एक वर्षात तू घेतलेल्या गुटगुटीत बाळशाने तू आम्हा सर्वाचा लाडका बनलास . तुझे संपादकीय तर नि:पक्षपातीच असते. सोमवारी तू बुकमार्क म्हणून येतोस व नवीन-जुन्या पुस्तकांचे समीक्षण करतोस. त्यामुळे मला वाचनाची गोडी जरा जास्तच लागली. मंगळवारचा तुझा सायफाय, जग किती पुढे गेलंय, याची आठवण करून देतो. बुधवारी येताना श्रद्धा-संस्कृतीचं देश-विदेशातील दर्शनच घडवतो. गुरुवार-शुक्रवार तर माझा विशेष लाडोबा होतोस. स्त्रीविधामधून मला घडवतोस. स्त्रियांचे अनके प्रश्न अगदी आरोग्यापासून ते घर कसं सुटसुटीत व छान ठेवायचं, हे तू सांगतोस. शनिवारी मी थकलेली असते म्हणूनच रिलॅक्सचा आनंद देतो. ‘मॅड’व्हेंचरमधून जग फिरवून आणतोस. रविवारी तर मज्जाच मज्जा. दुपारी ‘चमचमीत’ काय हे सांगतोस. घरबसल्या कुठलं नाटक, कुठला सिनेमा कसा आहे, याची माहिती देतोस. दिवसेंदिवस प्रगती घडवत जातोस. रोजच्या रोज ‘अपटुडेट’ ठेवतोस मला. आता तू एक वर्षात एवढी ‘भरारी’ घेतलीस. नक्कीच पुढे भविष्यात ‘प्रहार’ चॅनल सुरू करून नवीन भांवडं आण. तिथे तुला जपणारे पत्रकार मित्र-मैत्रिणी असतील त्यांना ‘बेस्ट ऑफ लक’ दे .-
स्वाती पुनाळेकर
नि:स्पृह दैनिक‘प्रहार’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आपल्याला प्रथमत: मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपले दैनिक सुरू होऊन म्हणता-म्हणता वर्ष झाले. ज्या पार्श्वभूमीवर ‘प्रहार’चं प्रकाशन झालं तेव्हा सदर वर्तमानपत्र प्रचारी थाटाचं, एकांगी राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन देणारं असेल, अशी शंका अनेकांच्या मनात डोकावून गेली. परंतु वर्षभरातील आपली पत्रकारिता बघता आपलं वर्तमानपत्र हे संपूर्ण स्वतंत्र बाण्याचं-मराठी अस्मिता जपणारं, निर्भिड, निरपेक्ष व नि:स्पृह वृत्तीने चालवलेलं दैनिक आहे. स्पष्ट विचार, सुरेख छपाई, स्वच्छ कागद व त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे स्पष्ट व परखड विचार देणारं ‘प्रहार’ हे वर्तमानपत्र एकाच वर्षात मराठीतील एक अग्रगण्य वर्तमानपत्र झालं आहे. निर्भिड लोकाभिमुख पत्रकारिता व सर्वसमावेशक विचार सातत्याने वाचावयास मिळतील, याची खात्री वाटते.
- शरद वर्तक, चेंबूर
वाटचालीस शुभेच्छा!
‘प्रहार’ वर्षाचा झाला. अभिनंदन! दर्जेदार बातम्या, विशेषकरून आमच्या कोकणातल्या गाव, तालुका, जिल्हा स्तरावरील इत्थंभूत माहिती आम्हाला दै. ‘प्रहार’मुळे मिळते. ‘अपटुडेट’ या पानावर नैसर्गिक चित्रं, आरोग्यविषयी नामांकित डॉक्टरांचा सल्ला, राशिभविष्य, स्मरण, प्रसिद्ध व्यक्तींचे चित्र, माहिती, लेडीज स्पेशल वाचायला मिळतात. नागरिकांची विविध विषयांवरील मते, राजकीय विषयांवर मान्यवरांचे लेखन संपादकीय पानावर आढळते. राणेसाहेबांनी विरोधकांना दिलेली रोखठोक उत्तरे प्रहार करून जातात.
विनायक वाडेकर, नेरूळ
प्रगतीपथावर राहा
आज ९ ऑक्टोबर २००९ रोजी ‘प्रहार’चा पहिला वाढदिवस आहे. तरी तिथीप्रमाणे तो दस-यालाच झाला. गेल्या वर्षभरात ‘प्रहार’ने खूप मोठय़ा घडामोडी, लेख यांचं चांगल्या प्रकारे लेखन केलं. ‘प्रहार’ने स्वत:चं असं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. त्याने मनोरंजन, साहित्य, क्रीडा यांची योग्य प्रकारे दखल घेतली, त्याबद्दल संपादक, प्रकाशक, सर्व पत्रकार व अन्य कर्मचारीवर्ग यांचं हार्दिक अभिनंदन! ‘प्रहार’ची प्रगती अशीच होत राहो अशीच प्रार्थना. पुन्हा ‘प्रहार’चं मन:पूर्वक अभिनंदन! -
लता सावंत, डोंबिवली
आवडणारा अंक
प्रत्येक अंक हा नावाप्रमाणे ‘प्रहार’ करणारा आहे. निरनिराळ्या विषयांवरची माहिती असते. वाचनीय सदरे, संपादकीय, मतपेटी याद्वारे लोकांना आपली निरनिराळ्या विषयांवरची मतं मनमोकळेपणाने मांडता येतात. देशी व परदेश, आरोग्याविषयी बरीच माहिती दिलेली असते. ‘शेअर बाजार’चा चढउतार, रोजचं पंचाग, राशिभविष्य, अर्थजगत, क्रीडा, स्त्रीविधा हेही विचार मांडून जातात. एकंदरीत ‘प्रहार’चा अंक पहिल्या दिवसापासून वाचनीय आहे.
मधुकर धोकटे, माहीम
