नांदेडमध्ये सर्वच पक्षांना गटबाजीचे ‘ग्रहण’
नांदेड - नांदेड जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून नेहमीच चर्चेत राहिला आहे. या चर्चेत आता ती गटातटाच्या वादामुळे भर पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांत असलेले गटबाजीचे ‘ग्रहण’ त्या-त्या पक्षांनाच अडचणीत आणणार आहे.
या वेळी पक्षअंतर्गत गटबाजीचा सर्वात जास्त फटका शिवसेनेला बसणार आहे. आमदार प्रकाश खेडकर यांच्या निधनानंतर शिवसेनेत गटबाजीचे पेव फुटले. आमदार खेडकर यांच्या निधनानंतर अनुसूया खेडकर निवडून आल्या. त्यांनी शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कामे केली नाहीत. त्यामुळे शिवसेनेत नाराजांचा गट तयार झाला. काही दिवसांनी शिवसेनेचे हेमंत पाटील जिल्हाप्रमुख झाले आणि नाराजांच्या गटाने त्यांचा आधार घेतला. त्या वेळी जिल्हाप्रमुख असलेले रोहिदास चव्हाण यांना ग्रामीण जिल्हाप्रमुख करण्यात आले.
रोहिदास चव्हाण यांना मानणारा एक वेगळा गट आहे. हा गटदेखील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश न जुमानता काम करीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीत उत्साहाने काम करण्याऐवजी शिवसेनेचे नेते शहरात आले की पुढे पुढे करणा-यांचीच चलती आहे.
शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष शोभा वाघमारे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन महिला आघाडीचे पद दिल्याने जुन्या महिला पदाधिकारी नाराज आहेत. तर उमरीचे शिवसेना प्रमुख बालाजी गोळेगावकर यांच्या निधनानंतर हेमंत पाटील यांच्यावर नाराज असणारा एक गट शिवसेनेत कार्यरत आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत शिवसेनेच्या अनेक गटांनी एकमेकांच्या विरोधात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान काम केले आहे. हेच
चित्र येत्या विधानसभा निवडणुकीतही दिसून येण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी आहे. राष्ट्रवादीत सूर्यकांता पाटील, श्रीनिवास गोरठेकर, वसंत चव्हाण, प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे, गंगाधरराव कुंटूरकर अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षावर प्रभाव आहे. राष्ट्रवादीच्या गटबाजीची चर्चा अनेकवेळा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचली आहे.
लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांना बोटावर मोजण्याइतपत स्थानिक नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांच्या पराभवाला काहीअंशी राष्ट्रवादीही जबाबदार असल्याचेही बोलले जात आहे. गोरठेकर, कुंटूरकर, वसंत चव्हाण यांच्यातील कलगीतुरा आताच रंगला आहे. तिघेही जाहीर सभा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
राष्ट्रवादी किसान भारतीचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांचा एक नाराज गट गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात कार्यरत आहे. किनवट, हदगाव, भोकर या तालुक्यांमध्येही राष्ट्रवादीतील गटतट विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये जाहीरपणे गटबाजी नसली तरी छुप्या पद्धतीने विरोध करणा-या आजी-माजी प्रतिनिधींची कमतरता नाही. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर सर्वच खूश आहेत. हा एक भाग असला तरी त्यांचा कारभार पाहणारे अमर राजूरकर, डी. पी. सावंत, श्याम दरक, ओमप्रकाश पोकर्णा या चौकडीमुळे काँग्रेसमधील अनेक जण नाराज आहेत. याच लोकांना वैतागून विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण जेठेवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भाविसचे महाराष्ट्र चिटणीस पदही मिळाले. असे अनेक उदाहरण काँग्रेसमधील छुपी गटबाजी वाढवण्यात मदत करत आहेत. एकेकाळी अशोक चव्हाण यांचे ‘राइट हँड’ असलेले आमदार प्रताप पाटील-चिखलीकर हेसुद्धा या चौकडीला कंटाळून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. एकीकडे काँग्रेसला मदत करणाऱ्या अपक्ष आमदारांना काँग्रेस सहकार्य करणार, असे सांगणारे चव्हाण चिखलीकरांचा निर्णय राज्य काँग्रेस कमिटी घेईल, असे सांगतात. यात सर्व काही आले. यंदा काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही तर जिल्ह्यात काँग्रेस उमेदवारांविरुद्ध ‘प्रताप’ करणारा ‘प्रतापी’ नेता विरोधकांना आपोआप उपलब्ध होणार आहे. याशिवाय आता चव्हाणांना तुम्ही जे सांगाल ते आम्ही मानणार, असे सांगणारे कार्यकर्तेही निवडणुकीच्या काळात काय रंग दाखवतील त्यावर जिल्ह्यात काँग्रेस उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
जिल्ह्यात भाजपचा प्रभाव आहे असे कोणत्याच आंदोलनादरम्यान दिसले नाही. मात्र खासदारकी लढवणाऱ्या संभाजी पवार यांच्यावर भाजपचा कुठलाही ‘मूळ’ कार्यकर्ता खूश नव्हता. तसेच माजी खासदार डी. बी. पाटील ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेत आहेत. अनेक भाजपचे नेते खासगीत ‘काय सांगावे’ असे दोन शब्द उच्चारून गप्प राहतात. यावरून जनतेला सर्व समजत आहे. शहरात एकूण ७५ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे तीन नगरसेवक आहेत. भाजपचे शहरप्रमुख प्रकाश कोंडगे आणि त्यांचे ‘कोंडाळे’ याबद्दलही मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीच आदर नाही.
मनसे जिल्ह्यात काही प्रभाव दाखवेल असे वाटत नाही. पण त्यांनी कुठे उमेदवार दिलाच तर तो इतरांवर काहीअंशी प्रभाव टाकू शकेल. मनसेचे अजय सरसर आणि संभाजी पावडे दोन विरुद्ध टोके आहेत. राज्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या तिसऱ्या आघाडीत सामील न होण्याचा अॅड. प्रकाश आंबेडकरांचा निर्णय जिल्ह्यात तिसऱ्या आघाडी करताच तापदायक ठरणार आहे. तिसऱ्या आघाडीतील उमेदवारांना भारिपचे कार्यकर्ते नक्कीच त्रास देणार. बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात ताळमेळ नसल्याने हा पक्षसुद्धा गटबाजीपासून मुक्त राहील, असे वाटत नाही.