Home | वारसा बाबासाहेबांचा | अंधा-या वस्तीत भीमाने लावलाय दिवा..

अंधा-या वस्तीत भीमाने लावलाय दिवा..

मुंबई:साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही.. कवीवर्य सुरेश भट यांनी लिहिलेल्या या काव्य ओळींचा प्रत्यय शिवाजी पार्कवर येत होता.. क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकरांच्या ५३ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या भीमसागराकडे अरबी समुद्रही जणू कुतुहलाने पाहात होता.

पांढऱ्या शुभ्र साडय़ा नेसलेल्या तीन आजीबाई गर्दीतून वाट काढत एकमेकींना आधार देत काही तरी शोधत होत्या, कुठून आलात विचारले असता त्या म्हणाल्या, आधी माझं काम करा अंधा-या वस्तीत भीमानं लावलाय दिवा हे गाणे ऐकू येतेय ना, तेथे घेऊन चला. तिथे नेल्यावर त्या गाण्याची कॅसेट घेऊन झाल्यानंतरच त्यांनी सांगायला सुरुवात केली. ६५ पेक्षा जास्त वयाच्या सोनाबाई, कौशल्याबाई, व्दारकाबाई नागपूरहून चैत्यभूमीवर दाखल झाल्या आहेत. २५ वर्षापासून त्यांचा हा नेम चुकलेला नाही. त्या म्हणतात, बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर बरं वाटतं. बाबासाहेबांनी आमच्या अंधारलेल्या वस्त्यांत दिवा लावलाय. बाबासाहेब नसते तर आम्ही अंधारातच चाचपडत राहिलो असतो. म्हणूनच अंधा-या वस्तीत भीमाने लावलाय दिवा या गाण्याची कॅसेट घेतली.

७२ वर्षाच्या व्दारकाबाई म्हणतात, बाबासाहेब मिलिंद महाविद्यालयाच्या भूमिपूजनासाठी येथे आले तेव्हा त्यांना मी जवळून पाहिलंय, मी ११ वर्षाची होते. इथे आल्यानंतर त्यावेळच्या स्मृती आठवतात. आम्ही बाबासाहेबांच्या सर्व क्रांतीस्थळांना भेटी देतो. आम्ही तिघी सोबत असतो.

कौशल्याबाईंच्या घरी अडचण असूनही त्या आल्या आहेत. इथे येण्यासाठी बाबासाहेबांच्या स्मृतीच बळ देतात. त्या जोरावर आम्ही कुणालाही भीत नाही. येताना आमची गाडी नाशिकला थांबली होती. तेव्हा सुटाबुटातले तिघे आमच्या डब्यात चढले, आमच्याकडे बघत जयभीम बोलो किधर भी चलो असे हिणवत या वयात कशाला येता? या वयात उरली सुरलेली हाडं जमीनवर टेकायची, तिकीट काढलंय का? आंबेडकरांच्या नावे किती सवलती घेणार ..असे म्हणत त्यांनी आम्हाला तिघांना काठीने झोडपून दुस-या डब्यात हाकलले. पण म्हणून काय झालं? अनेक खस्ता खात आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे आणणारे बाबासाहेब आमचा बापच. एकवेळ जन्म देणा-या बापाबद्दल बोललेले सहन करू, पण बाबासाहेबांबद्दल वाईट बोललेले सहन होणार नाही.

औरंगाबादहून आलेले सुखदेव बनसोडे एका पायाने अधू आहेत. ते ७ वर्षापासून इथे न चुकता येतात. त्यांच्याबरोबर तीन मुले, पत्नीसह मुलीचे कुटुंब असे सगळे आहेत. ते तीन दिवसांपूर्वी आलेत. पत्नी विमल व मोठा मुलगा मोलमजुरी करतात. येथे येण्यासाठी १ महिना मोलमजुरीतून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ते येथे आलेत.इथे आल्यानंतर बाबासाहेबांचे विचार ऐकल्यानंतर मन भारावून जाते. यापुढे कितीही शतके उलटली तरी ही गर्दी कमी न होता वाढतच जाईल,असे ते आत्मविश्वासाने सांगतात.

चैत्यभूमीचं दर्शन घेऊन गर्दीतून काठी टेकत मार्ग काढणा-या जालन्याहून आलेल्या ८५ वर्षाच्या अनुसया सूर्यभानसर या आजीही १५ वर्षापासून येताहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणारच, असा त्यांचा निर्धार आहे. त्यांनी येथे येण्यापूर्वी महाडच्या चवदार तळ्यालाही भेट दिली. ‘‘बाबासाहेबांना मी पाहिलेय. त्यांचे विचार ऐकलेत. त्यामुळे इथे आल्यानंतर अंगात ताकद येते. उत्साह वाढतो. मात्र इथेही नेत्यांच्या वेगवेगळ्या चुली दिसल्या की संताप येतो!’’ उत्तर प्रदेशातून आलेले हिरालाल म्हणतात, ‘‘आम्ही इथे आल्यानंतर मराठीत बोलायला शिकलोय. सर्व भाषांचा अभिमान असायला हवा. बाबासाहेबांना भाषावाद मान्य नव्हता. आज जो चालला आहे, तो केवळ राजकारणासाठी चाललेला खेळ आहे.’’