धडाकेबाज काम करणारा नेता
धडाकेबाज काम करणारा, परिश्रमाने मोठा झालेला, अभ्यासू नेता अशा शब्दांत नारायण राणे यांचा उल्लेख करता येईल. राणे यांना मी शिवसेनेत असल्यापासून ओळखतो. 1985 मध्ये मी महापौर असताना राणे बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. प्रत्येक गोष्टीचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून त्यांनी प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण मिळवले आहे. महानगरपालिका आणि शासन या दोहोंच्या माध्यमातून काम करताना पालिकेतील कायद्यांचा राणे यांनी सखोल अभ्यास केला. विषय कितीही कठीण असो, तो आत्मसात करण्यासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. त्यांची आकलनशक्ती जबरदस्त आहे. अर्थसंकल्पावर अधिकारवाणीने बोलणे ही सोपी गोष्ट नाही. राणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी अर्थसंकल्पावर केलेली अभ्यासपूर्ण भाषणे हा सर्वत्र कौतुकाचा विषय झाला होता. अर्थसंकल्पासारख्या कठीण विषयावर अभ्यासपूर्ण टीकाटिप्पणी त्यांनी केली त्याची दखल शासनाला घ्यावी लागली.
नारायण राणे यांचा आत्मविश्वास दांडगा आहे, धडाकेबाज निर्णयक्षमता हे त्यांचे गुणवैशिष्टय़ आहे. त्यांना जो विषय पटलेला असतो तो कोणालाही न घाबरता मांडण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. घेतलेला कोणताही निर्णय आणि दिलेला कोणताही शब्द पाळण्याचा राणे यांचा स्वभाव सर्वपरिचित आहे. त्याचबरोबर घेतलेल्या निर्णयाची त्वरित अमलबजावणी करण्याची तत्परता त्यांच्यामध्ये आहे. कामे रेंगाळत ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. शासकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कृती करण्याची तत्परता त्यांनी सतत दाखवली आहे. राणे यांचे जीवन संघर्षमय आहे. संघर्ष करीत, अभ्यास करून मोठय़ा मेहनतीने मोठे झालेले ते नेते आहेत. त्यांच्यातील नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांबरोबरच त्यांचा धाडसी स्वभाव यामुळे त्यांनी राजकारणात सर्व पदे भूषवली आहेत. कोकणासहित राज्याच्या विकासासाठी काम करण्यावर त्यांचा भर असतो. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!