अमेरिकेत नव्याने जाणा-यांच्या पाठीशी बीएमएम
फिलाडेल्फिया - अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी नव्याने जाणा-या मराठी बांधवांना सोसाव्या लागणा-या अडचणी लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार बृहन्महाराष्ट्र मंडळाने व्यक्त केला आहे. यासाठी अमेरिकेत केंद्र उभारण्याचा बीएमएमचा मनोदय असून भारतात असे केंद्र उभारण्यात राज्य सरकार मदत करील, असे आश्वासन शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी येथे दिले.
मंदीच्या काळात वा अन्य काही कारणाने नोकरी व रोजगार गमावणा-या मराठी अमेरिकन नागरिकालाही समाजातर्फे मदतीचा हात देण्याचीही योजना मंडळाच्या विचाराधीन आहे! बीएमएमचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी ही माहिती दिली. विश्व साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणारे धडाडीचे तरुण कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणा-या देवकुळे यांच्या अध्यक्षतेखालील नवी कार्यकारिणी शनिवारी निवडून आली. टोरंटोच्या लीना देवधरे यांची चिटणीसपदी तर लॉस एंजेलिसचे अजय दांडेकर यांची खजिनदारपदी निवड झाली. डॉ. श्याम नवाथे (अटलांटा), मिलिंद गोखले, दिलीप थत्ते (शिकागो), मंदार जोगळेकर (फिलाडेल्फिया) आणि कीर्ती रेगे (सिनसिनाटी) हे कार्यकारिणीचे इतर सदस्य आहेत. या कार्यकारिणीने बीएमएमचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अंतर्गत येणा-या ५१ मंडळांना कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास ती एका ठिकाणी देणारी वन स्टॉप यंत्रणा उभारणे, बीएमएमच्या अधिवेशनात स्थानिक गुणवत्तेला अधिक वाव देणे, नव्या पिढीच्या मुलांना मराठी शिकवणा-या शाळा वाढवणे, त्या उपक्रमाला विद्यापीठीय मान्यतेचे अधिष्ठान देणे, मराठीशी नाळच न जुळलेल्या युवकांना मराठीकडे आणण्यासाठी कार्यक्रम आखणे, ‘मैत्र’ हे तरुण मंडळींचे अधिवेशन भरवणे, अमेरिकेतील तरुणांच्या भारतातील एकाकी पालकांना आधार देणे, असे अनेक उपक्रम नव्या कार्यकारिणीने आखले आहेत. मराठी शाळेच्या उपक्रमाला राज्य सरकारतर्फे लागेल ती मदत दिली जाईल, अभ्यासक्रम ठरल्यावर पुस्तकेही छापून दिली जातील, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. राज्याचे अमेरिकेतील सांस्कृतिक केंद्र बीएमएमकडे सुपूर्द केले जात असल्याची घोषणाही त्यांनी केली.
राजकीय वापर नकोच
बीएमएमच्या व्यासपीठाचा कोणत्याही राजकीय पक्षाकडून गैरवापर होऊ देणार नाही, असे आश्वासन नवनिर्वाचित बीएमएम अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी रविवारी येथे दिले. फिलाडेल्फिया अधिवेशनात छायाचित्रकार म्हणून आमंत्रित केलेले शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मंचाचा राजकीय व्यासपीठाप्रमाणे वापर केला आणि ‘फ्रेण्ड्स ऑफ शिवसेना’ या राजकीय संघटनेची स्थापना केली, याबद्दल अधिवेशनाच्या प्रतिनिधींमध्ये उमटलेल्या संतापाला प्रथम ‘प्रहार’ने वाचा फोडली. या वृत्ताची तातडीने दखल घेऊन देवकुळे यांनी असा प्रकार पुन्हा होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले. बीएमएमचे व्यासपीठ हे अमेरिकेतील मराठीजनांच्या सांस्कृतिक-सामाजिक गरजांसाठी निर्माण करण्यात आले आहे. ते राजकीय व्यासपीठ नाही. अधिवेशनात फक्त राज्य सरकारच्या प्रतिनिधींना महाराष्ट्रातील जनतेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
