औद्योगिक उत्पादन पुन्हा गारठले
नवी दिल्ली- खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राची सुरू असलेली निराशाजनक कामगिरी डिसेंबरमध्येही कायम आहे. या महिन्यात औद्योगिक उत्पादन 1.8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नोव्हेंबरमध्ये 5.1 टक्क्यांपर्यंत भरारी घेणा-या आयपीपीने पुन्हा खालचा स्तराकडे वाटचाल सुरू केल्यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2011 मध्ये आयआयपी 1.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या महिन्यात निर्देशांक 5.9 टक्क्यांवर होता. तर डिसेंबर 2010 मध्ये निर्देशांक 8.1 टक्क्यांवर होता. गेल्या काही महिन्यांपासून औद्योगिक क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे रिझव्र्ह बँकेलाही आगामी पतधोरणात व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
वाढत्या व्याजदराने आणि मंदीने औद्योगिक क्षेत्राला हैराण केले आहे. त्यामुळे आर्थिक विकासही मंदावला असून चालू आर्थिक वर्षाच्या विकासदराचा अंदाज केंद्र सरकारला कमी करावा लागला आहे.
आयआयपीतील महत्त्वाचा घटक असलेल्या कारखाना उत्पादनामध्ये या महिन्यात मोठी घट झाली. या महिन्यात कारखान उत्पादन निर्देशांक 1.8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. खाणकाम उत्पादनामध्येही घसरण झाली असून खाणकाम निर्देशांक 3.7 टक्क्यांवर आहे. डिसेंबर 2010 मध्ये खाणकाम उत्पादन 5.9 टक्क्यांवर होते. मात्र ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ झाली असून उत्पादन 5.3 टक्क्यांवर गेले आहे. डिसेंबरमधील आठ प्रमुख क्षेत्रांच्या निराशाजनक कामगिरीचा विपरीत परिणाम आयआयपी निर्देशांकावर झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या महिन्यात आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर 3.1 टक्क्यांवर होता. यामध्ये कच्चे तेल, पोलाद आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती.
ग्राहकोपयोगी वस्तूंची वृद्धी दुहेरी आकडय़ामध्ये आल्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण आहे. या आकडेवारीमुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट होते.- आदिती नायर, अर्थतज्ज्ञ, इक्रा
आयआयपीची आकडेवारी निराशाजनक आहे. तरीही येत्या दोन महिन्यांमध्ये उत्पादनामध्ये सुधरणा होईल. - प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री
