सेन्सेक्समध्ये 82 अंकांची घट
मुंबई- युरोझोन कर्जसंकटाबाबत वाढती अनिश्चितता आणि औद्योगिक उत्पादनामध्ये झालेल्या घसरणीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी केलेल्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 82.06 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 17,748.69 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 30.75 अंकांची घट होऊन निर्देशांक 5,381.60 वर स्थिरावला. गेले सहा आठवडे सेन्सेक्समध्ये वाढ झाली आहे.
डिसेंबरमध्ये 1.8 टक्क्यांनी औद्योगिक उत्पादनामध्ये झालेली मामुली वाढ आणि नोव्हेंबरच्या तुलनेत झालेली घट याचा एकूणच फटका शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या खरेदीवर झाला. यामुळे एकूण 13 पैकी 12 क्षेत्रांमधील कंपन्यांनी लाल निशाण फडकावले. केवळ धातू या एकमेव क्षेत्राच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली. यामध्ये डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये तोटा नोंदवलेल्या टाटा स्टीलने आघाडी घेतली होती. त्यातच युरोझोनमधील कर्जसंकटाबाबतच्या कायम असलेल्या अनिश्चिततेनेही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर नकारात्मक छाप सोडली.
बाजार बंद होण्यापूर्वी सेन्सेक्सने 17,890.11 चा उच्चांक आणि 17,627.14 हा नीचांक नोंदवला. युरोपमधील अर्थमंत्र्यांनी ग्रीकला दुसरे मदतीचे पॅकेज देण्याच्या निर्णयाला रेड सिग्नल दिल्याने फ्रान्स, जर्मनी आणि यूकेच्या बाजारात झालेल्या घसरण झाली. तर आशियातील बाजारातही घसरण झाली.
"सुरुवातील घसरण झाल्यानंतर दुपारनंतर बाजाराने पुन्हा तेजीचा रस्ता पकडला होता. मात्र, त्यानंतर आयआयपीच्या निराशाजनक आकडेवारी आणि युरोपमधील घडामोडींनी बाजारामधील गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण निर्माण केले."- मिलन बाविशी, संशोधन प्रमुख, इन्व्हेंचर ग्रोथ अँड सेक्युरिटिज
