Home | शिकागो | नोकरी एका क्लिकवर

नोकरी एका क्लिकवर

नोकरी मिळवण्यासाठीची पोस्टाने अर्ज पाठवणं, त्याच्या उत्तराची वाट पाहणं ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय वेळकाढू आणि खर्चिकही आहे. योग्य वेबसाइट्सची माहिती असेल तर इंटरनेटवरूनही आपल्याला हवा तसा जॉब शोधता येतो. हल्ली नोकरी शोधण्यासाठी त्याचप्रमाणे करिअरग्राफ उंचावण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. अर्थात, त्यासाठी जॉब सांगणाऱ्या वेबसाइट्सची विश्वासार्हता तपासून घेणं मात्र महत्त्वाचं असतं. आपला  इंटरनेटच्या जगात विविध क्षेत्रांतल्या जॉब्सची माहिती देणा-या अनेक साइट्स असतात. त्यांची योग्य माहिती करून घेतली तर अधिक व्यापकपणे जॉब सर्च करता येऊ शकतो.

 

गुगल, लिंकइन, ट्विटर इतकंच काय फेसबुकवरूनही नोकरी शोधता येते. अकाऊंट उघडून या साइट्सवर सर्च केल्यास संबंधित क्षेत्रातील, हव्या त्या शहरात-देशात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध असल्याचं लक्षात येईल. आपल्या करिअर संबंधी किंवा इंटरेस्ट संबंधी कोणत्या प्रकारच्या नोक-या उपलब्ध आहेत, त्यासाठी शैक्षणिक पात्रता,  किती वर्षाचा अनुभव गरजेचा आहे वगैरे माहिती अनेक कंपन्यांच्या वेबसाइट्सवरही दिलेली असते. तुम्ही त्यात फिट होत असाल तर योग्य प्रकारात अर्ज करू शकता. या साइट्सवर रेझ्युमे थेट पाठवण्याची सोय असते. इच्छुक कंपन्याही हा डेटाबेस रोजच्या रोज पाहात असतात. एखाद्या पदासाठी तुम्ही योग्य उमेदवार असल्याचं वाटल्यास, कंपनी तुम्हाला बोलावून घेते. त्यासाठी रेझ्युमे नेमका हवा. अर्जाबरोबर तुमचा शैक्षणिक प्रमाणपत्रंही अटॅच करून पाठवू शकता. म्हणजे संबंधित अधिकारी ताबडतोब निर्णय घेऊ शकतो. अर्जावर कोणत्याही योग्य पदासाठीअसं लिहून एखाद्या कंपनीला पाठवणं अगदी चुकीचं आणि अयोग्य आहे. तुमची पात्रता आणि त्यानुसार तुम्ही अर्ज केलेलं नेमकं पद याचा ठळक उल्लेख असणं आवश्यकच आहे. अन्यथा, तुमचा अर्ज विचारात घेतला जात नाही.

सोशल नेटवर्किंग साइट्सचा उपयोग कसा कराल?

 एखाद्या विशिष्ट शहरात नोकरी हवी असल्यास तशा साइट्स उपलब्ध आहेत. फक्त त्यांची विश्वासार्हता पडताळून घेणं महत्त्वाचं आहे. उदा. http://www.mumbaijobs.com, http:/www.jobschennai.com प्रमाणे इतर शहरांच्या आणि देशांच्याही साइट्स उपलब्ध असतात.  केवळ नोकरीसाठीच उपयोग करता येईल, असं प्रोफेशनल अकाऊंट ट्विटरवर उघडावं. ते करताना तुमचं प्रोफेशनल स्किल सूचित करेल अशी टॅगलाइन लिहायला विसरू नये. त्यानंतर संबंधित विविध कंपन्या आणि व्यक्तींचा पाठपुरावा करावा. त्यासाठी ट्वेलो (प्रोफाइल सर्च करायला मदत करणारं टूल), ट्विटलेटर (जे तुम्हाला फॉलो करतात त्यांना अ‍ॅटोमॅटिकली फॉलो करता येतं) किंवा टय़ूबल (फॉलोअर्स लिस्टमधून अधिकाधिक लोकांना शोधण्यासाठी मदत करते) यांसारख्या ट्विटलवरील टूल्सचा उपयोग जरूर करावा.  

संपर्क मर्यादा वाढवण्यासाठी www.linkedin.com ही अतिशय उपयुक्त साइट आहे. याशिवाय लिंक्डइन अ‍ॅन्सर्स आणि लिंक्डइन ग्रुप ही दोन फिचर्स टूल्स तुम्हाला एकाच इंडस्ट्रीतील अधिकाधिक प्रोफेशनल लोकांशी संपर्क वाढवायला मदत करणारी आहेत.

 

आपल्या माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी अशा साइट्सवर खासगी माहिती देण्यापूर्वी तिची विश्वासार्हता नीट तपासली पाहिजे. कंपनीची साइट बोगस नाही, हे ओळखण्यासाठी पुन्हा इंटरनेटचीच मदत होईल. त्यासाठी नेटवरून मॅकअ‍ॅफी साइटअ‍ॅडव्हायजरहा प्रोग्रॅम डाउनलोड करा. तो डाउनलोड केल्यावर कम्प्युटरच्या तळाला उजवीकडे एक छोटासा हिरवा पट्टा दिसेल. साइट बोगस असल्यास हा रंग लाल होईल आणि खरी असेल तर हिरवाच राहील. हे रोजच्या वापरातील इंटरनेटसाठीही उपयुक्त ठरतं.

रेझ्युमेसाठी फॅशनेबल, बोल्ड, इटॅलिक फाँट वापरण्याऐवजी तो वाचणा-या माणसाला वाचणं सोपं जाईल, असे न्यू टाइम्स रोमन किंवा एरियल यांसारखे साधे फाँट वापरावेत. रेझ्युमेची स्टाइल किंवा थीम कोणती असावी, हे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच ठरवता येतं. त्यासाठी फाइल, एडिट व्ह्यूच्या ओळीत फॉरमॅटवर क्लिक करा आणि नंतर थीमवर क्लिक करा. त्यातील असंख्य नमुन्यांपैकी एखादा चांगला निवडून ओके करा.

अर्जाचा पाठपुरावा

 

नोकरीसाठी नेटवर्किंग साइटवरून केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करणं आवश्यक असतं. ज्या कंपन्यांत अर्ज करायचा आहे, त्यांची एक लिस्ट तयार करावी. त्यामुळे अर्ज पाठवण्यासाठी नेमक्या संस्थांची निवड करणं सोपं होईल. आपल्या अर्जाची दखल घेतली गेली आहे का, तो कोणाकडे गेला आहे, ज्या पोस्टसाठी अर्ज केला आहे, त्या पोस्टची सद्यस्थिती काय आहे, अर्ज केल्यानंतर या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातूनही ते फायदेशीर ठरू शकतं.

रेझ्युमे कसा असावा?

 

नोकरीसाठी अर्ज पाठवताना सर्वात महत्त्वाचा असतो तो मुद्देसूद रिझ्युमे. तो योग्य पद्धतीने तयार केला गेला पाहिजे. प्रत्येक नोकरीसाठी एकाच प्रकारचा रेझ्युमे तयार करून चालत नाही. तुम्ही एखाद्या स्पेशलाइज्ड उद्योगात काम करत असाल तर रेझ्युमेतली माहितीही तशीच हवी. उदा. जर तुम्ही टीव्ही चॅनेलसाठी रिझ्युमे तयार केला असेल तर तो रेडिओ चॅनेलसाठी चालणार नाही किंवा आयटी उद्योगासाठी तयार केलेला रिझ्युमे ऑटो उद्योगासाठी चालणार नाही. म्हणूनच स्पेशलाइज्ड रेझ्युमे तयार करायला शिकलं पाहिजे.

 http://www.bestsampleresume यांसारख्या साइट्सवर रेझ्युमेंचे असंख्य नमुने, त्याबद्दलच्या टिप्स उपलब्ध असतात. त्यानुसार रेझ्युमे तयार करावा. शेवटी रेझ्युमे जितका आकर्षक तितकी नोकरीची संधी अधिक.