Home | सीसीडी | गली गली प्यार है

गली गली प्यार है

व्हॅलेंटाइन्स डेचं काउंटडाऊन सुरू झालंय. तो कसा आणि कुठे साजरा करायचा याचं प्लानिंगही सर्वत्र जोरात सुरू आहे. फिरायला कुठे जायचं, हा त्यादिवशी सतावणारा हमखास प्रश्न. जवळचाच एखादा स्पॉट निवडायचं म्हटलं तर घरातलं, शेजारपाजारचं कुणी भेटण्याची भीती. कॉलेजच्या जवळपासचं ठिकाण निवडायचं म्हणजेच आपलेच मित्रमैत्रिणी (मुद्दाम) कंपनी देण्याचा धोका. असं असलं तरी या दिवशी यहां प्यार हैम्हणत शहराची गली गलीगजबजून जाईल.  

बँड स्टँड

मुंबईतला सर्वात फेमस, कूल स्पॉट म्हणजे वांद्रय़ातूला बँडस्टँड. भग्न तरीही सौंदर्यपूर्ण भग्नावस्थेतल्या प्राचीन किल्ल्याचा अवशेष असलेच्या या बँडस्टँडकडे प्रेमी युगुलांची पावलं आपोआपच वळतात. इथल्या मोठमोठय़ा दगडांवर बसून सागराकडे एकटक बघत भविष्याची स्वप्नं रंगवण्यात या जोडय़ा गुंग असतात. संध्याकाळी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन येणारा वाऱ्याचा झोत प्रियकराच्या हातात हात गुंफून अनुभवणं निव्वळ रोमँटिक. बँड स्टँड हे ठिकाण थोडय़ा वेळासाठी का होईना आजूबाजूच्या जगाचा विसर पाडायला लावतं, असं प्रेमवीरच सांगतात. व्हॅलेंटाइन्स डेला इथे गर्दी नसली तरच नवल.     

फाइव्ह गार्डन

 माटुंग्याच्या फाइव्ह गार्डन्समधली गर्दी पाहिली की इथे बांधलेल्या सीट्स आता कमी पडू लागल्यात असं वाटायला लागतं. एरव्हीही पार्टनरची मनधरणी करायची असो की कडाक्याचं भांडण, हे ठिकाण सोयीचंच. झाडांच्या सावलीत कट्टय़ावर बसून पार्टनरसोबत गप्पाटप्पा करायला हे ठिकाणही खासच.  

नरिमन पॉइंट

 हा मीटिंग पॉइंट तसा सगळ्यांच्याच परिचयाचा. व्हॅलेंटाइन डे असो वा नसो समुद्राच्या सोबतीने गुजगोष्टी करण्यात गुंतलेल्या प्रेमवीरांची इथे नेहमीच वर्दळ असते. त्यात हा दिवस तर त्यांच्यासाठी आणखी खास. त्यामुळे नरिमन पॉइंटच्या समोरच्या गल्ल्याही या दिवशी गजबजलेल्या दिसतील.  प्रियदर्शिनी पार्क (पीडीपी) वाळकेश्वरपासून जवळच असलेल्या प्रियदर्शिनी पार्कला पीडीपीहे नाव प्रेमीयुगुलांनीच बहाल केलेलं. इथल्या नारळाच्या बागेत, वाळूवर आणि समुद्राच्या पाण्यातून रमतगमत चालणं किंवा मजामस्ती करणं हा या प्रेमवीरांचा अधिकारच. समुद्रापासून हाकेच्या अंतरावर बांधलेल्या इथल्या सीट्सवर हातात हात गुंफून नि:शब्द बसून समुद्राची गाज ऐकण्यात पार्क बंद होण्याची वेळ कधी होते हे कळतही नाही.     

जुहू बीच

 जुहू बीचच्या अथांग समुद्राच्या लाटांच्या सोबतीने आपल्याच विश्वात रंगून गेलेल्या प्रेमवीरांच्या जोडय़ांचा इथेही वावर असतो. उघडय़ा पायांनी वाळूवर चालत रोमँटिक व्हायचं असो की नारळपाणी, भेळपुरी, आइस्क्रीमसारख्या पदार्थाचा फडशा पाडत दिवस एन्जॉय करायचा असो जुहू बीच इज द बेस्ट ऑप्शन.   

कॅफे/ डिस्को

 

अ लॉट कॅन हॅपन्ड् ओव्हर कॅफे, हे तर सीसीडीचं स्लोगनच आहे. इथल्या मंद लयीतील संगीतासोबत कॉफीचा आस्वाद घेत हितगूज करण्याचा आनंद आगळाच आहे.  डिस्को, पबमध्ये म्युझिकच्या ठेक्यावर पार्टनरसोबत ताल धरणं अधिक पसंत करतात.

  

सिनेमा हॉल/ मल्टिप्लेक्स

 आपल्या प्रेमाच्या माणसासोबत एखादा फ्लॉप सिनेमा पाहण्यातही आनंद असतो. सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्सच्या कोपऱ्यात नजर टाकली तर याची प्रचिती येतेच. बाहेर हिंडायचा कंटाळा आला असेल तर चार भिंतींच्या आत एका जागेवर बसून काळोखात पिक्चर बघण्याचा (!) पर्याय सर्रास निवडला जातो.

गोराई बीच

 

बोरिवलीत ही आणखी एक परफेक्ट प्लेस. एरवीही कॉलेजिएट्स आणि यंगस्टर्सच्या गर्दीने हा परिसर गजबजलेला असतो. गोखले, सेंट रॉक्स आणि सायली इंटरनॅशनल कॉलेजमधील बहुतेक जण बोटिंगसाठी याठिकाणी आवर्जून जातात. जवळ लहान-मोठे अनेक रेस्तराँ असल्याने व्हेज-नॉनव्हेज फूडचीही चंगळच असते. 

  

हिरानंदानी गार्डन

 वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससारखाच हिरानंदानी गार्डनचा परिसरही म्हटला तर तुरळक गर्दीचाच. हं.. फक्त परिसरातलं कुणी या ठिकाणी ऑफिसला जात नाही ना, एवढं एकदा तपासून घ्यायचं. अन्यथा आपल्या परिचयातील कुणी इथे भेटणं तसं अशक्यच. इथल्या गार्डनमध्ये पोलिस काका फिरकण्याचेही चान्सेस नाहीत. त्यामुळे हिरानंदानी गार्डन हा प्रेमवीरांसाठी एक चांगला पॉइंट सिद्ध होतोय.  

नॅशनल पार्क

 

लोकवस्तीपासून काहीसं दूरवर असलेल्या, निसर्गानुभूती देणाऱ्या नॅशनल पार्कला प्रेमीयुगुलांची विशेष पसंती असते. बोरिवली नॅशनल पार्कजवळच्या एकसारख्या दिसणा-या 100 गुंफाही प्रेमीयुगुलांचं नेहमीच आकर्षण राहिल्या आहेत. प्रेमाला विरोध करणा-यांचा मोर्चा बोरिवली नॅशनल पार्कवर धडकू शकत नाही, या आशेने प्रेमाच्या सीमेपार आरपार ओलांडणारेही बरेच कपल्स दिसतात. शहरी गजबजाटापासून दूर असलेला शांत, निसर्गरम्य हिरवळीचा परिसर म्हणजे छोटा काश्मीर. आरे कॉलनीजवळील हे एक निसर्गरम्य स्थळ. विशेष म्हणजे इथे बोटिंग करणं शक्य आहे. सोबत पेटपूजेची सोयही आहे. वन डे पिकनिकसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 

  

बीकेसी

 

कार्पोरेट एरिया असूनही बीकेसीतील सुनसान रस्त्यांवर फिरताना एकांत, शांतता अनुभवायला मिळते त्यामुळे ही जागा कपल्सना विशेष प्रिय असते.