Home | सुट्टी मे धम्माल | आजी-आजोबांची गोष्ट

आजी-आजोबांची गोष्ट

आजी घराच्या दारात उभी राहून त्यांचीच वाट बघत होती. खरं तर इतके दिवस आजोबा न परतल्यामुळे मनातून थोडीशी घाबरलीही होती. मात्र आजोबांना पाहिल्याबरोबर तिच्या तोंडाचा पट्टा लागलीच सुरू झाला. तेवढय़ात तिनं आजोबांच्या हातातली टोपली पाहिली आणि हावरेपणानं ओढून ती घरात गेली. जवळपास ओरबाडूनच तिने ती टोपली उघडली. पाहते तो आत खाद्यपदार्थ, कपडेलत्ते, सोनं-नाणं यांची चळत रचून ठेवली होती.

 

आता काय, आजीची नुसती चंगळ उडाली. किती खाऊ, किती लेवू अन् किती दाखवू, असं नुसतं होऊन गेलं तिला. पण हे टिकलं थोडेच दिवस. कारण बोलता बोलता आजोबांनी तिला चिमण्यानं आपल्याला दोन टोपल्या दिल्याची अन् आपण त्यातली छोटी टोपली निवडल्याची गोष्ट सांगितली. हे ऐकून आजीच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली. आता आपणच जाऊन ती मोठी टोपली हस्तगत करण्याचा बेत करून तिनं घर सोडलं.

 

आजोबांच्या मार्गानं आजी गेल्यावर तिलाही तो चिमणा भेटला. त्यानं काही आजीला आपल्या घरी बोलावलं नाही. आजी गोड गोड बोलून त्याच्या गळी पडली आणि त्याच्या घरी गेली. चार दिवस तिनंही चिमण्याचा पाहुणचार झोडला. परतताना चिमणा कोणतीच भेट देत नाहीसं पाहून आजीनंच त्याच्याकडे भेटवस्तू मागितली. चिमण्यानं वरवर काहीच न दाखवता पूर्वीप्रमाणेच आजीसमोर दोन्ही टोपल्या आणून ठेवल्या. अधाशीपणे आजीनं मोठय़ा टोपलीवर जणू झडप घातली. कार्यभाग झाल्यावर चिमण्याचा निरोपही न घेता, आजी घाईघाईनं आपल्या घरी परतली.

 

आजोबा घरी दारात उभं राहून तिची वाटच बघत होते. घरात प्रवेश केल्याबरोबर आजोबांच्या मूर्खपणाविषयी बडबड करीतच तिनं मोठी टोपली उघडली. अत्यंत उत्सुकतेनं आत तोंड घातलं-तो काय, एक भलामोठा साप फुस्स फुस्स करीत बाहेर आला. आजीची तर त्याला बघूनच भयानं बोबडी वळली आणि ती तत्क्षणी गतप्राण झाली.

 

आजोबा हे सारं बघत होते. आजीचा अशा प्रकारे अंत व्हावा याचं त्यांना अतिशय दु:ख झालं. पण जे झालं त्याला त्यांचा इलाज थोडाच होता? शेवटी त्यांनी निर्णय घेतला, झालं-गेलं विसरून जंगलात जायचं, चिमण्याच्या आश्रयानं राहायचं. आजोबांनी ठरवलं तसं केलं. त्यांचं उरलेलं आयुष्य सुखानं गेलं.

 

(समाप्त)

 (रेणू गावस्कर यांच्या शब्द पब्लिकेशन प्रकाशित गोष्टी जन्मांतरीच्या या पुस्तकातून साभार.)