Home | नी हावो ड्रॅगन | अत्त दीप भव!

अत्त दीप भव!

चीनमधला आमचा अभ्यास दौरा अंतिम टप्प्यात पोहोचला. भारतात जाण्यासाठी अवघे 24 तास उरले होते. चीन सरकारने आमचा हा दौरा अविस्मरणीय व्हावा, यासाठी गौतम बुद्धांच्या जगप्रसिद्ध डाझू मूर्तीच्या गुंफांचा पर्यटन अभ्यास दौरा आयोजित केला. आतापर्यंत आम्ही केवळ चीनमधल्या आधुनिक ठिकाणांनाच भेटी दिल्या होत्या. भारत आणि चीन यांच्यातील सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचा बौद्ध धम्म होय. दोन हजार वर्षापूर्वी संपूर्ण चीन बुद्धमय होता. संपूर्ण पूर्व आशिया बुद्धं शरणम् गच्छामीच्या मंत्रात मुग्ध होता.

 

आम्ही च्याँगक्विंगहून डाझू गुंफांकडे निघालो. तब्बल तीन तासांच्या प्रवासानंतर डोंगररांगांत पोहोचलो. अतिशय घनदाट झाडींच्या मधून आमची बस एका डोंगराच्या माथ्यावर पोहोचली. डोंगरावरून आम्ही पश्चिम दिशेस थोडं चालल्यावर डाझूच्या पर्वतरांगा लागल्या. एका रांगेतून दुस-या रांगेत जाताना, डोंगरातील दगडांवर अनेक चित्रं रेखाटलेली दिसली. 20 मिनिटांनंतर आम्ही जागतिक सांस्कृतिक वारशात सहभागी असलेल्या डाझू गुंफेच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो.

प्रवेशद्वाराजवळ दोन बौद्ध भिक्खू आहेत. जसजसं पुढे जात होतो, तसतसं भारतातून बौद्ध धम्म चीनमध्ये कसा आला, याचा इतिहास रेखाटलेला होता. आमचा गाईड बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये चीन आणि येथील लोक कसे समरस झाले आहेत, हे सांगत होता. मी बौद्ध धर्माची चीनमधील उपस्थिती, प्रभाव, इतिहास आणि परंपरेच्या समृद्ध भूतकाळाने प्रभावित झालो. थोडय़ाच वेळात आम्ही एका भव्य गुहेत शिरलो. क्षणभर मला वेरुळमधील एखाद्या गुंफेत तर आलो नाही ना, असं वाटलं.

बुद्धांच्या स्थितप्रज्ञ, चैतन्यदायी मूर्तीसमोर एक भिक्खू नमस्कार मुद्रेत होता, तर उजव्या बाजूला बुद्धांच्या सलग 12 मूर्ती ओळीत होत्या. एका मूर्तीत ध्यानमग्न बुद्ध, दुस-या मूर्तीत भिक्षूस उपदेश देणारे बुद्ध, तिस-यात आशीर्वाद देणारे बुद्ध अशा मूर्ती आहेत. क्षणभर वाटलं, डोळे मिटून बुद्धं शरणम गच्छामीच्या ध्यानात मग्न व्हावं. एका मूर्तीकडे टक लावून पाहू लागलो. दोन मिनिटांच्या दृष्टिभेटीनंतर एका आवाजानं माझं ध्यान भंग पावलं. आवाज कानांवर येत होता, अत्त दीप भव! जणू माझ्याशी बुद्धच बोलले. खरंच बुद्ध बोलले की मला भास झाला, काहीच कळत नव्हतं. क्षणात मनाला सावरलं. पण मनात मात्र अत्त दीप भवचा आवाज घुमत होता.

 

दोन तास डाझू गुंफांच्या अनेक कलाकृती पाहत होतो, पण कानांतून अत्त दीप भव हे तीन शब्द घुमत होते. दहा दिवसांच्या चीन दौ-यात आम्ही विविध गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. संवादातून जाणून घेतल्या. मेंदूच्या हार्डडिस्कवर प्रभावित झालेल्या गोष्टींची चक्क कॉपी करून घेतली. पण आता मायदेशी परतत असताना, बुद्धांनी जगाला दिलेला संदेश हाच एकमेव आशेचा किरण आहे, हे पटलं.

 

गेल्या 10 दिवसांत मला भेटलेला चीन खूपच आगळावेगळा आहे. एकविसाव्या शतकात सगळं प्रशासकीय कामकाज मँडरिन या चिनी भाषेतच चालतं. बुद्ध, कन्फ्यूशिअस यांचा समृद्ध वारसा असलेल्या देशात 1966 मध्ये सांस्कृतिक महाक्रांतीद्वारे धर्माचा प्रभाव कमी करून साम्यवाद हाच धर्म बिंबवण्यात आला. 1978 मध्ये साम्यवादी तत्त्वज्ञान झुगारून देऊन उदारीकरणाद्वारे चक्क भांडवलशाही स्वीकारली. त्यातूनच नव्या आर्थिक महासत्तेचा पाया रचलेला आहे. तर 1989 मध्ये त्यानमेन चौकात लोकशाही स्थापनेच्या मागणीसाठी जमलेल्या तरुणांना रणगाडय़ांनी तुडवण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये 48 सुवर्णपदके घेऊन क्रीडा क्षेत्रात सिंहगर्जना करणाऱ्या चीनच्या यशाचं रहस्य काय, हे मात्र जगाला अजूनही उमगलेलं नाही.

 

60 वर्षात संकटांची शृंखला, नैसर्गिक आपत्ती, पेचप्रसंग, लढाया, स्थित्यंतरं, धाडसी निर्णयांनी ड्रॅगनचा इतिहास, विचार आणि कृती लाल रंगानं माखलेली आहे. तरीही 22 प्रांतांचा प्रचंड विस्तीर्ण भूभाग असलेला, भव्य स्वप्न पाहणारा, जगाला कवेत घेणारा चीन राष्ट्र म्हणून उभा आहे.

 

चीनच्या समृद्ध इतिहासाला आधुनिकतेची किनार आहे. 1978च्या उदारीकरणानंतर डेंग झ्याव पिंगने विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला. आज पदोपदी चिनी परंपरेबरोबरच अमेरिकी संस्कृतीचा प्रभाव चिनी समाजमनावर आहे. चीनचा सर्वाधिक आर्थिक व्यवहार अमेरिकेशी आहे. दरवर्षी 340 अब्ज डॉलरचा हा व्यवहार आहे. प्रचंड मनुष्यबळ असतानाही, यांत्रिकीकरणाकडे चीनचा कल आहे. मालाची मागणी नसतानाही प्रचंड उत्पादन करणारा करणारा चीन हा एकमेव देश आहे. माल उत्पादित झाल्यानंतर मार्केटमध्ये स्पर्धात्मक किंमत ठेवून वस्तू विकणारा चीन हा एकमेव देश आहे. त्यामुळे चिनी वस्तूंशी कोणीच स्पर्धा करू शकत नाही.

 

अमेरिकेशी व्यापाराच्या संधी उपलब्ध झाल्याने चीनमध्ये पैशाचा ओघ वाढू लागला. अमेरिकी सरकार आणि लोकांना खुश करण्यासाठी चिनी लोकांनी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली आहे. अस्सल चिनी भाषेशिवाय कुठलीच भाषा न येणा-या चीनमध्ये आता हॅलो, प्लीज, थँक यू, होल्ड ऑन, वेट हे इंग्रजी शब्द कानी पडू लागले आहेत. चिनी खाद्यसंस्कृतीच्या बाहेरचा एकही पदार्थ माहीत नसतो.

 

चिनी माणूस आवडीने मॅकडोनॉल्ड, केएफसी  या अमेरिकी हॉटेलांत जाऊन पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला आहे. ब्रिटिशांनी दाखवलेल्या अफूच्या मार्गापासून चिनी माणूस सिगारेटच्या महामार्गावर चालतो आहे. युवा पिढी सिगारेटच्या रेषा हवेत सोडतच पुढे जात आहे.

 

एवढंच नाही तर शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांची वसाहत असणा-या चीनमध्ये वाहनं उजव्या बाजूने चालतात तर, डाव्या बाजूला गाडीचं स्टेअरिंग आहे. त्यामुळे चिनी रस्त्यावरून धावणा-या गाडय़ांना अमेरिकन सुसाट वेगाची हवा लागलेली जाणवते. पाच दिवस मन लावून काम करा, हा फंडा चिनी युवापिढीने स्वीकारला आहे. संपूर्ण वस्त्र परिधान केलेल्या चिनी पोशाखापेक्षा अगदी मिनी स्कर्ट, फ्रॉक्स, जीन्स, टी शर्ट, बिकनी, टॉप्स या फॅशनेबल अमेरिकन कपडय़ांनी अवघ्या चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. सायंकाळी सात वाजताच तरुणाईचे पाय बार 88, मोटेल 168 या साखळी हॉटेलांकडे जातात. अमेरिकन, पॉप, रॉक, जॅझ गाण्यांच्या गीतावर चिनी तरुणाई बेधुंद होऊन नाचते. वाटतं आपण अमेरिकेतच आहोत. दारूची नशा उतरेपर्यंत रात्रीचे दोन कधी वाजतात, हे कळतच नाही. त्यामुळे ऐंशीच्या दशकात जन्मलेली पिढी चिनी माणूस यंत्रात अमेरिकन सॉफ्टवेअर टाकल्यासारखी वाढत आहे. माझ्या समवयस्क चिनी युवकांनाही अमेरिकन ड्रिम्स प्रत्येक रात्री पडत आहेत. त्यांना वाटत जणू पुढील वर्षी आपण अमेरिकेत जावं आणि पुन्हा कधीच परतू नये.

 

एक पार्टी, एक कुटुंब, एक मुल आणि एकच अमेरिकन स्वप्न अशा भावविश्वात एकविसाव्या शतकातील चीन वावरतो आहे. साम्यवादी पिंजऱ्यातील स्वातंत्र्यात चिनी पिढी जरी खूश दिसत असली, तरी अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता चिनी लोकांना सातत्याने खुणावते. साम्यवादी, हुकूमशाही (नव्हे नव्हे चिन्यांच्या मते लोकशाही) व्यवस्था चिनी युवकांना किती काळ रोखेल, हे भविष्यकाळच सांगेल. परंतु, अमेरिकन फूड, डान्स, पोशाख आणि स्वप्नातून चिनी माणूस संस्कृती बदलतानाच दिसतोय. स्थित्यंतराच्या कालखंडात मीडिया आणि व्यक्तिस्वातंत्र्य नसलं तरी चिनी युवकांचं भावविश्व अमेरिकन झालं आहे.

 

आपल्या इथंही अमेरिकन संस्कृतीचा नंगानाच चालतो हा आक्षेप आहे. परंतु, चिनी लोकांच्या तुलनेने आपण इथेही मागं आहोत हेच जाणवतं. गेल्या दहा दिवसांत चीनची अर्वाचीन संस्कृती ते आधुनिक परंपरा जवळून पाहता आली. आमची बस जेव्हा शांघाय एअरपोर्टच्या पोर्चमध्ये जाऊन थांबली, तेव्हा माझं मन दाटून आलं. आमच्या अभ्यासदौ-यातील आदिती बिश्त, सौम्या नायक या दोन युवतींना तर अश्रू रोखता आले नाहीत. आम्हाला चिनी लोकांनी आणि संस्कृतीनं असा लळा लावला की चिनी भूमीवरून जाऊच नये. परंतु, आता पुन्हा ड्रॅगनच्या देशी येत राहण्याचा दृढ संकल्प करूनच विमानतळाच्या आत शिरलो.

 दहा दिवसांपूर्वी चीनच्या भूमीवर जाताना नी हावो ड्रॅगन म्हणताना मनात कुतूहल आणि उत्सुकता होती. दहा दिवसांच्या चीन दर्शनानंतर ड्रॅगनला च्या चेन (बाय बाय) म्हणताना ऊर भरून आला आहे. चीनच्या प्राचीन आणि आधुनिक इतिहासाला पुन्हा पुन्हा समजून घेण्याचा संकल्प मी केला आहे. एअर इंडियाच्या ए 1 349  या विमानात बसताना अत दीपो भव हा बुद्धांचा संदेश माझ्या कानावर पुन्हा पुन्हा घुमतो आहे.