मराठी रंगभूमीसंबंधी सेन्सॉरची भूमिका
मराठी रंगभूमीसंबंधी सेन्सॉरची भूमिका अतिशय आडमुठेपणाची आहे.
महात्माजी नेहमी असे म्हणत की, सामाजिक व्यवहारामध्ये जे शासन कमीत कमी हस्तक्षेप करते ते शासन आदर्शवत होय.
सेन्सॉरच नको म्हणण्यात धोके जरूर आहेत. एकतर सेन्सॉर नसेल तर हॉट नाटके अधिकाधिक रंगभूमीवर येतील हा सर्वात मोठा धोका! पण त्याला इलाज नाही. कारण कुठलीही नाटके अधिकाधिक रंगभूमीवर येतात, तेव्हा त्याला लोकाश्रय असतो हे गृहीत धरले पाहिजे. लोकाश्रय नसेल तर अशी नाटके रंगभूमीवर येणारच नाहीत. कारण नाटक हा व्यवसाय आहे. आणि तो आर्थिकदृष्टय़ा यशस्वी झाल्याशिवाय अशी नाटके निर्माण करणे निर्मात्याला परवडणार नाही. तेव्हा अशा नाटकांना लोकाश्रय आहे, हे मान्य केले पाहिजे.
आणि अशी नाटके लोक का पाहतात किंवा त्यांना इतक्या मोठय़ा संख्येने गर्दी का करतात ते समजावून घेतले पाहिजे. भारतीय समाजमन स्त्रीपुरुषांच्या लैंगिक संबंधाबाबत अतिशय सोवळे व भीरू आहे. मनमोकळेपणाने या संबंधाबाबत चर्चा करणे त्याला फार जड जाते.
हा गेल्या 300-400 वर्षातल्या भारतावर ज्यांना ज्यांनी राज्य केले, त्या परकीय राजवटींचा आपल्या समाजमनावर झालेला अतिशय हीन मानसिक परिणाम होय. इस्लाम किंवा ब्रिटिश राजवटही याबाबत अतिशय पोरकट धोरण आपल्या देशामध्ये रुजवत होती.
आज ब्रिटन किंवा संबंध युरोपमध्ये लैंगिक संबंधाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय निरोगी झाला असला तरी 300-400 वर्षापूर्वी युरोपमध्ये लैंगिक संबंधाबाबत तो समाज फारच कर्मठ होता. तिथेही सेन्सॉर होते. अशा साहित्यावर बंदी घातली जात असे, साहित्यिकांवर खटले भरले जात. त्यांना कठोर शिक्षाही होत असत.ही फार जुनी गोष्ट नाही. युरोप-अमेरिकेत फक्त 50 वर्षामागे अशा ललित साहित्यावर अनेक खटले भरलेले आहेत. त्याचा तपशील देत नाही, परंतु ही फक्त 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.
आज युरोपमध्ये कुठेही सेन्सॉर नाही. फूटपाथवर पोनरेग्राफीची पुस्तके ढिगा-यांनी पडलेली असतात. कोप-याकोप-यावर ब्ल्यू-फिल्म्स दाखविणारी शेकडो मिनि थिएटर्स आहेत. युरोपमध्ये गेलो असताना या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. आणि आश्चर्य म्हणजे ही मिनी थिएटर्स काही म्हातारे व आशियन्स वगळले तर वर्षानुवर्षे रिकामी असतात. फूटपाथवरच्या पोनरेग्राफीच्या पुस्तक ढिगा-यांकडे लोक ढुंकूनसुद्धा पाहत नाहीत. या संबंधींचे युरोपियनांचे कुतूहल पूर्ण निमालेले आहे.
आता भारतीय समाजमन त्या दिशेने विचार करते आहे. पण भारतीयांच्या दृष्टीने ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कारण भारतामध्ये हजार वर्षामागे आचार्य वात्स्यायन या महापुरुषाने ‘कामशास्त्र’सारखा उत्तम ग्रंथ लिहिला आहे. प्राचीन मंदिरांवर आमच्या श्रेष्ठ शिल्पकारांनी स्त्री-पुरुष संभोग आसनांची अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. असा प्रचंड निरोगी सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारतीयांना गेल्या 300-400 वर्षात परक्या राजवटींनी पूर्ण पांगळे आणि निर्बुद्ध अगतिकतेत ढकलून दिले आहे.
या सा-या गोष्टींचा आपल्या सांस्कृतिक विचारांवर घोर परिणाम झाला आहे. सेन्सॉर बोर्ड हे त्याचे विषारी फळ आहे.
हळूहळू भारतीय समाजमन अधिकाधिक निरोगी दृष्टीने या संबंधाकडे बघायला लागेल. तेव्हा या जुन्या परंतु अतिशय निरोगी वारशाचा आमचा समाज मोकळेपणाने स्वीकार करील. आणि मानवी जीवनातल्या या अतिशय आनंददायी कामप्रेरणेने जीवन अधिक समृद्ध करून घेईल असा भरवसा वाटतो. त्या वेळी या देशात एकेकाळी सेन्सॉर बोर्डे होती याची मनात खंतही वाटेल आणि हसूही येईल.