Home | संपादकीय | अण्णांचे सीमोल्लंघन

अण्णांचे सीमोल्लंघन

राळेगणसिद्धीचे ग्रामसभाघोषित महात्माअण्णा हजारे राजकारणी नाहीत. पक्षीय राजकारणात उतरण्याऐवजी राजकारणाला दिशा देण्याचे महान कार्य ते करीत आहेत, म्हणूनच राळेगणसिद्धीकरांनी ग्रामसभेत अण्णांच्या उपस्थितीत ते नको- नकोम्हणत असताना महात्मा पदवी त्यांना जाहीर केली. आपण एकविसाव्या शतकात असून, नवा इतिहास घडवत आहोत. त्यामुळे विसाव्या-एकोणिसाव्या शतकातील महात्मा, कर्मवीर, क्रांतिवीर, सम्राट, बादशहा आदींचे विसर्जन करून नवे नायक निर्माण करणे, ही काळाचीच गरज आहे. शिक्षणाच्या बाजारपेठेत पदव्याही विकत घेणा-या स्वयंघोषित कर्मवीरांचे पीक गेल्या काही वर्षात इतके उदंड आले की, आता शाळकरी मुलांना कर्मवीर कोण?’ असे विचारले तर ते भाऊराव पाटलांऐवजी आपल्या गल्लीतील शाळेच्या मालकाचे नाव सांगतात! अण्णांचे तसे नाही. ते स्वयंघोषित महात्माही नाहीत. ते समाजसेवक आहेत. ते समाज घडवण्यासाठी अहोरात्र झटतात. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गेल्या पाऊणशे वर्षातील सर्व सरसंघचालक राजकारणापासून अलिप्त राहून समाज घडवण्याचे निर्भेळ कार्य करतात, तरी एकेकाळच्या जनसंघाचे आणि आताच्या भारतीय जनता पक्षाचे नेते नागपूरकरांचे आशीर्वाद घेऊनच राजकारण करतात. त्यामुळे संघाचे मठाधिपती अकारण बदनाम होतात. अण्णांकडे तसा दुटप्पीपणाही नाही. त्यांनी युद्ध पुकारले, ते केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध.25 वर्षापूर्वी अण्णांनी अहमदनगर जिल्ह्यातून समाजकार्याचे रणशिंग फुंकले. तेथील शेतक-यांना रेशनकार्डपासून सातबारा उता-यापर्यंत किंवा शेतातील पंपासाठी वीजजोडणीपासून सरकारी अनुदानापर्यंत कोणतीही गोष्ट चिरिमिरी दिल्याशिवाय मिळत नव्हती. अण्णांमुळे या परिसरातीलच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले असावे, असा किरण बेदी, अरविंद केजरीवाल, शांतीभूषण प्रभृतींचा ठाम विश्वास असावा. म्हणूनच त्यांनी भ्रष्टाचाराचे मूळ असलेल्या काँग्रेसवर आणि मनमोहन सिंग  सरकारवर एकच घाव घालण्याचा विडा उचलला. त्यांच्या जाहीरनाम्यानुसार जनलोकपालाची प्रतिष्ठापना झाली की, भारत हा जगातील आदर्श, स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त देश होणार आहे. या एककलमी आंदोलनाचे नेतृत्व अण्णांकडे आहे आणि काँग्रेस वगळता सारे राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत. अर्धी लढाई जिंकल्याची घोषणा करून अण्णांनी उपोषण मागे घेतले होते. आता हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आले तरी उरलेला अर्धा विजय अण्णांच्या पाठीराख्या क्रांतिवीरांना मिळणार नसावा. म्हणून त्यांनी शस्त्रसंधी मोडून काँग्रेसविरुद्ध युद्ध पुकारण्याचे ठरवले. भारतीय जनता पक्षाच्या उपवर आणि इच्छुक पंतप्रधानांनी नुकतेच मुदतपूर्व निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. त्यांना मार्गदर्शन केले जात नसल्याचा नागपूरकरांचा दावा असतो. अण्णा असे ताकाला जाऊन भांडे लपवणारे नाहीत. जनलोकपाल विधेयक आणण्याची इच्छा नसलेल्या काँग्रेसला मतच न देण्याचे थेट आवाहन त्यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला केले आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि डाव्या-मधल्या- कडेच्या तसेच खुद्द सत्तारूढ आघाडीत असूनही केवळ देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कधीही काँग्रेसचा पराभव करण्यास उतावीळ असलेल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे मुदतपूर्व निवडणुका अटळ ठरतील आणि काँग्रेसविरहित सत्तेची - या सर्वाच्या मते पहिली’ - क्रांती देशाला पाहायला मिळेल. जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांतीबेदी- केजरीवालांप्रमाणे अण्णांनाही मान्य नव्हती. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढय़ानंतरची ही दुसरी क्रांती असल्याचे त्यांनी म्हटले होते. नव्या पंतप्रधानांबरोबरच जनलोकपालही शपथ घेतील, तेव्हाच ही क्रांती सुफळ संपूर्ण होईल. अण्णांच्या स्वप्नाच्या उत्तरार्धात राजघाटावर शपथविधी सोहळा पार पडेल, तेव्हा सुखराम-कलमाडींपासून येडियुरप्पादी निर्लेप नेत्यांच्या, आजी-माजी सहका-यांच्या उपस्थितीत अण्णांना महात्मा ही पदवी समारंभपूर्वक बहाल केली जावी. जयप्रकाशांप्रमाणे अण्णांचा विसर पडू देऊ नये, एवढेच!