ऑगस्ट क्रांती मैदानात आज काँग्रेसजनांची मांदियाळी
सोमवारपासूनच (२८ डिसेंबर) वर्षभरातल्या विविध उपक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. विविध दिनविशेषांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना फळवाटप, ग्रामस्वच्छता, रक्तदान शिबिरे, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, राष्ट्रभक्तीपर जनजागृती कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, सदस्य नोंदणी वाढवणे, काँग्रेसचा संदेश गावोगावी पोहोचवणे असे उपक्रम पुढच्या २८ डिसेंबर २०१० पर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतपराय, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी या काँग्रेसनेत्यांबरोबरच, रूढार्थाने काँग्रेसशी नाव जोडले न गेलेले भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद तसेच थोर आदिवासी स्वातंत्रसेनानी बीरसा मुंडा यांनाही काँग्रेसतर्फे मानवंदना देण्यात यावी, असे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कळवले आहे.
वर्षभरात राज्य पातळीपासून तालुक्यांपर्यंत कायकाय कार्यक्रम घेता येतील, याच्या सूचनाही काँग्रेसच्या केंद्रीय समितीने सर्व राज्यांना याआधीच पाठवल्या आहेत. कार्यक्रमांचे स्वरूप ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९ सदस्यांची समिती कार्यरत होती. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, पक्षाचे सरचिटणीस व युवा नेते राहुल गांधी यांचा समावेश या समितीत होता.