पक्षाच्या दिल्ली मुख्यालयाला वेध नव्या सुसज्ज इमारतीचे
नवी दिल्ली-अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राजधानी दिल्लीतील मुख्यालय ‘अकबर रोड’वर आहे, हे तेथे न गेलेल्यांनाही माहीत असते.. आता मात्र हा पत्ता बदलणार आहे. कोटला रोडवर लवकरच पक्षाच्या मुख्यालयाची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे!
या इमारतीचे भूमिपूजन पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते सोमवारी सकाळी होईल. या नव्या जागीच ध्वजवंदनही होऊन काँग्रेसच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातल्या कार्यक्रमांची सुरुवात केली जाईल. ‘इंदिरा भवन’ हे नाव नव्या मुख्यालयाच्या इमारतीला दिले जाईल.
दोन एकरांच्या भूखंडावर उभारल्या जाणा-या या सहा मजल्यांच्या इमारतीत, भूमिगत पार्किंगची सोय (बेसमेंट) असेल. पक्ष पदाधिका-यांसाठी स्वतंत्र कार्यालये, छोटय़ा बैठकांसाठी कॉन्फरन्स हॉल, मोठे सभागृह आणि वाचनालय देखील या इमारतीत असतील. इमारतीच्या सुरक्षेसाठी क्लोज्ड सर्किट कॅमेरे असतीलच, पण देशाच्या कुठल्याही भागातील काँग्रेस पदाधिका-यांऱ्यांशी संपर्क साधण्याची सोय ‘टेलिकॉन्फरन्सिंग’ द्वारे उपलब्ध असेल.
‘२४, अकबर रोड’ हा जुना पत्ता प्रत्यक्षात बदलला जाण्यासाठी आणखी किमान आठ महिने लागतील. आर्किटेक्ट ल्यूटनने वसवलेल्या बैठ्या बंगल्यांच्या भागात कोणत्याही राजकीय पक्षांची कार्यालये असू नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तो या स्थलांतरामुळे पाळला जाईल.
