Home | दिल से | स्वच्छतेचं महत्त्व

स्वच्छतेचं महत्त्व

image

‘माझ्या संस्थेने समाजात केलेलं समाजसेवेचं काम समजून घेऊन जर समाजात बदल घडवण्यास काही तरुण तयार झाले तर ते समाजाचं भाग्यच असेल़’ म्हणून संस्थेच्या कार्याबाबत लिहायचं असं मी ठरवलं

सांताक्रूझ पश्चिम येथील त्रिरत्न प्रेरणा मंडळातून गेली आठ वर्ष सरकारी खात्यांना पत्र लिहीत होतो. आज आपल्यासमोर वृत्तपत्रात लिहायचं आहे. हे थोडं जोखिमेचंच काम आह़े  पण विचार केला तेव्हा असं ध्यानात आलं की, माझ्या संस्थेने समाजात केलेलं समाजसेवेचं काम समजून घेऊन जर समाजात बदल घडवण्यास काही तरुण तयार झाले तर ते समाजाचं भाग्यच असेल़ म्हणून संस्थेच्या कार्याबाबत लिहायचं असं मी ठरवलं.

संस्था, तिची स्थापना आणि याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. त्रिरत्न प्रेरणा मंडळ, ही आमची संस्था 17 वर्षापूर्वी अस्तित्वात आली, ती क्रिकेट खेळणारे मंडळ म्हणूऩ  क्रिकेट खेळता खेळता आम्ही आमच्या नाक्यावर प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन त्याचबरोबर शिवजयंती/आंबेडकर जयंती असे कार्यक्रम करत होतो. नाक्यावर असलेलं सार्वजनिक शौचालय, त्याच्याच जवळ असलेलं 7-8 कचरापेटय़ांचं आगाऱ  त्यातून नेहमी वाहणारा कचरा आणि सार्वजनिक शौचालयाजवळ लहान मुलांनी केलेली घाण यामुळे 40 फुटांचा रस्ता जेमतेम 20 फूट राहिला़  त्यामुळे या रस्त्याने जाताना नाक मुठीत घेऊन अक्षरश: उडय़ा मारत जावं लागायचं अशा परिसराचं कार्यक्रमांच्या निमित्ताने रूपच पालटायचं आणि हा परिसर चार-पाच दिवस स्वच्छ दिसायचा. जयंतीनिमित्त खेळाच्या स्पर्धा, लहान मुलांचे नृत्याचे कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम व स्पर्धा आणि लोकांची करमणूक म्हणून नाक्यावर चित्रपट़ असा आमचा जयंतीचा रंगारंग कार्यक्रम असायचा.

ज्याप्रमाणे प्रमुख वक्ते/पाहुणे बदलायचे, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाच्या 12 ते 15 जणांच्या टोळक्यातदेखील दर पाच वर्षानी निवडणुका व्हायच्या़  डिसेंबर 1999 सालची मंडळाची निवडणूक मला विशेष वाटली. कारण मला त्रिरत्न प्रेरणा मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. याच वर्षी महापालिकेच्या वस्ती शौचालय प्रकल्पासाठी कार्यरत असणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती सीमा रेडकर यांच्याशी माझी भेट झाली़  रेडकरबाईंच्या स्वच्छतेबाबतच्या मार्गदर्शनामुळे आमच्या संस्थेच्या धर्मादाय नोंदणीचं काम 2002 सालात पूर्ण झालं.  या रेडकरबाईंच्या वस्ती स्वच्छता व त्रिरत्नच्या प्रगतीसाठी असणा-या जिव्हाळ्याबद्दल पुढे सांगेनच़

नाक्यावर होणारे इतर सामाजिक कार्यक्रम व त्या निमित्ताने महापालिकेच्या सहकार्याने करण्यात येत असलेली नाक्यावरची साफसफाई हे रेडकरबाईंना जास्त भावलं. त्यांनी आम्हाला हे समजावलं की, मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारी वस्ती शौचालयं ही तुमच्या प्रगतीचा मार्ग असतील. आम्हाला रेडकरबाईंच्या भाकिताने नवी दिशा दाखवली. त्यानंतर आम्ही प्रकल्पावर एकत्र काम करायला सुरुवात केली. पर्यावरण, शिक्षण, उद्योजकता, क्रीडा, कला व संस्कृती ही संस्थेची उद्दिष्ट बनली.

आज संस्थेतील प्रत्येक सदस्य चांगली नोकरी आणि व्यवसायाला आह़े  स्वत:चं कुटुंब सांभाळताना समाजसेवेचं व्रत त्यांनी कायम ठेवलं आहे. जेव्हा जेव्हा मला भूतकाळ आठवतो, तेव्हा या आठवणीही जाग्या होतात. एकेकाळी जो नाका गलिच्छ होता, आज त्याच नाक्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा व मुंबई महापालिकेचा पुरस्कार मिळला आहे.

या वस्ती शौचालयासाठी जनजागृती करताना आम्ही संस्थाचालक एखाद्या भिक्षेक-याप्रमाणे दारोदारी फिरलो. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. त्याचंच हे फलित आहे, असं मी मानतो. असे बरेच अनुभव मला सांगायचे आहेत. विशेषत: पर्यावरण वाचवा या आणि इतर प्रत्येक विषयावर मी पुढच्या भागात लिहिणार आहे.