विसर्जनातील पाप-पुण्य
सामाजिक कार्य करताना विरोध, अपमान, हिरमोड समाधान या गोष्टी नेमाने येतात. त्याचा ‘दिल से’ वापर कसा करून घ्यावयाचा हे प्रत्येक कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं
प्रिय वाचकहो, सर्वप्रथम आपणास गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
सामाजिक कार्य करताना विरोध, अपमान, हिरमोड समाधान या गोष्टी नेमाने येतात. त्याचा ‘दिल से’ वापर कसा करून घ्यावयाचा हे प्रत्येक कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं असो,
मुंबईच्या तत्कालीन महापौर डॉ़ शुभा राऊळ या संस्थेच्या व्यायामशाळेच्या उद्घाटनानिमित्त संस्थेत आल्या होत्या़ संस्थेने केलेलं पर्यावरणविषयक कार्य त्यांना आवडलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की, मुंबई महापालिकेच्या ‘श्रींच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात’ या उपक्रमात आपल्या संस्थेनेही सहभागी व्हायला हवं. तेव्हा आम्ही हा प्रकल्प विभागात राबवायचं ठरवलं. त्रिरत्न प्रेरणा मंडळाचं हे आवाहन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. सागराचे पर्यावरण वाचवण्याकरता मदत करा, अशा विनवण्या केल्या. काहींनी त्याला नकार दिला तरी जवळपास 30 ते 35 लोकांनी श्रींच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी संस्थेत नाव नोंदवलं. आम्ही सकारात्मक नावांची यादी बघून सुखावलो़ चार दिवसात आम्हाला कृत्रिम तलाव बांधायचा होता. त्यामुळे आम्ही जोमाने कामाला लागलो़ परंतु तलावासाठी जागा मिळेना. ज्या ठिकाणी हा उपक्रम करायचा होता, ते क्रीडांगण होतं. त्यामुळे तलावाच्या खड्डय़ांचा त्रास खेळाडूंना होणार होता. आम्ही आमची ही समस्या महापालिका एच-पश्चिम विभागाच्या विभाग अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. विभाग अधिकारी जी़ आर राठोड यांनी खास बाब म्हणून आमच्या कृत्रिम तलाव योजनेला सहकार्य करण्याचे आदेशच आपल्या कार्यालयाला दिल़े आपण गणेश विसर्जन आपल्याच विभागात करू परंतु ते तलावात न करता विहिरीत करू, असा सल्लाही दिला़
गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी दुपारीच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी पाण्याच्या टाक्या, सिमेंट व इतर सामानासह क्रीडांगणात हजर झाले. क्रीडांगणाच्या एका कोप-यात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विहीर तयार करण्यात आली. दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन या विहिरीत होणार असल्याने आम्ही गणेशमूर्तीची वाट पाहत बसलो. परंतु दुपारपर्यंत एकाही मूर्ती येथे विसर्जनासाठी आली नव्हती. समुद्रात गणेशाचं विसर्जन केल्याने पुण्य लाभतं, असं मत अनेकांनी मांडल्याने आमचा हिरमोड होत होता. मात्र चारच्या सुमारास येथे विसर्जनासाठी गणेशमूर्ती येत असल्याचं आम्हाला दिसलं. मग आम्हाला हुरूप आला. श्रीगणेशाचं व त्यांचं आगत्याने स्वागत केलं. आरती करून विसर्जन झाल्यावर संस्थेकडून तुळशीचं रोप व कापडी पिशवी देऊन त्यांचा सत्कार केला़
अशी आमच्या 2008च्या या उपक्रमाची अडखळत सुरुवात झाली. तेव्हा नावनोंद झालेल्या 35 गणेशमूर्तीपैकी 16 मूर्तीचं विसर्जन कृत्रिम विहिरीत झालं. त्यानंतर 2009 मध्ये 37 गणेशमूर्तीचं विसर्जन झालं. त्यामुळे यंदा 100 मूर्तीच्या विसर्जनाचं आमचं उद्दिष्ट आहे. आज जेव्हा मी संस्थेच्या लॉगबुकवरील लोकांचे अभिप्राय वाचतो, तेव्हा कळतं की अनेक असे समाजस्नेही आहेत की ज्यांना समाजासाठी केलेलं नवीन काम अधिक भावतं. त्यामुळेच पाप-पुण्याचे संवाद मागे पडत चालले आहेत व पर्यावरणाची सेवा ही काळाची गरज वाटू लागली आह़े असंच एक नावीन्यपूर्ण काम समाजस्नेहाच्या माध्यमातून पुढील स्तंभात़
