परिवर्तन हा जीवनाचा नियम
मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. तशीच आरोग्याची महत्त्वाची गरज आहे शौचालय! तेही स्वच्छ! समाजाची हीच गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्थेची धर्मादाय कार्यालयात नोंदणी झाली आणि संस्थेची ती बांधीलकी झाली़.
आजचा माझा विषय आरोग्याच्या सर्वात जवळचा परंतु वेगळा, ज्याची चर्चा लोकांमधे होते पण नाक मुठीत दाबून. थोडक्यात काय तर कचरा पेटी असो किंवा शौचालय, ते माझ्या घरापासून दूर असावे, अशी सर्वाची मानसिकता असते. मग त्याला नेतेही अपवाद नसतात. असे म्हणण्याचे कारण असे की, नेत्यांकडे दोन गोष्टींची तक्रार घेऊन लोक जातात. एक म्हणजे, शौचालय आणि दुसरी झोपडपट्टी पुनर्विकास, यात आधी प्राधान्य कोणाला देतात ते पाहा!
मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. तशीच आरोग्याची महत्त्वाची गरज आहे शौचालय! तेही स्वच्छ! समाजाची हीच गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्थेची धर्मादाय कार्यालयात नोंदणी झाली आणि संस्थेची ती बांधीलकी झाली़ माझ्या पहिल्या लेखात सीमा रेडकर यांचा उल्लेख आला होता़ त्या मुंबई मलनि:सारण प्रकल्पच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत असलेल्या वस्ती शौचालयाच्या प्रकल्पांबाबत संस्थेत चर्चा करण्यासाठी आल्या होत्या.
महापालिका जागतिक बँकेच्या निधीतून बांधत असलेली शौचालये संस्था करत असलेल्या स्वच्छताकार्याला अधिक बळकटी कशी देतात हे सांगितले. शौचालयाचा आकार व इतर बाबी स्थानिक लोक व संस्था यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनासारख्या करून देण्यासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्थानिकांना एकत्र आणून त्यांचे प्रबोधन करणे व त्यांना या प्रकल्पात सामावून घेणे असे ठरल़े आम्ही नाक्यावर ज्या चाळीसमोर आमच्या बैठका घेत असू त्याच चाळीतील लोकांना आमच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमात सदस्य म्हणून घेतल़े या चाळीतील सर्व म्हणजे 14 कुटुंबांकडून होकार मिळाला़ मग आमचा दौरा इतर चाळींकडे वळला़ हा शौचालय स्वच्छता प्रबोधन कार्यक्रम म्हणजे आम्ही सर्व कामावरून घरी परतल्यानंतरचा आमचा ओव्हरटाइम असायचा. रोज 15 ते 20 घरे फिरण्याचा कार्यक्रम न चुकता ठरलेला़ या प्रकल्पात प्रत्येक कुटुंबाला एकदाच 500 रुपये भरून सदस्य होता येत होत़े परंतु झोपडपट्टीतील लोकांना हे पैसे एकरकमी भरणे परवडण्यासारखे नव्हते म्हणून आम्ही त्यांना 50 रुपये मासिक हप्ता ठरवून दिला होता. त्याप्रमाणे संस्थेत पैसे जमा होऊ लागले. नव्या शौचालयाचे बांधकाम म्हणजे जुनी तोडणे आणि हे करत असताना पहिली अडचण आली. काही लोकांनी त्यावेळच्या स्थानिक नगरसेवकांकडे याविषयी तक्रार केली़ परंतु यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही हे त्यांना पटवून दिल्यानंतर हा विरोध कमी झाला. तशी आम्ही त्यांची सोय करून दिली़ आम्ही लोकांच्या घरी फिरून पैसे जमवण्यामुळे वर्षभर लोकांच्या संपर्कात राहिलो. त्यामुळे वर्षभरात एकमजली शौचालयाचे काम पूर्ण करू शकलो. सदस्यसंख्या मर्यादित असल्याने बहुतेक लोक नाराज झाले तर ज्यांना सार्वजनिक शौचालय मोफत वापरायची सवय होती त्यांनी संस्थेची बदनामी सुरू केली. शौचालयासाठी वार्षिक/मासिक असे शुल्क आकारण्यात येत होते. त्यालाही लोकांनी विरोध केला. काही लोकांनी त्याविषयी महापालिकेत तक्रारी केल्या, गुंडांकडून धमक्या, मोर्चा आदी मार्गाचा या विरोधात वापर झाला. परंतु न डगमगता आम्ही त्याला उत्तर देत होतो़ शौचालय व्यवस्थित सुरू होत़े लोकांचे सहकार्य आम्हाला मिळत राहिल़े विशेषत: आमच्या संस्थेचे जवळचे हितचिंतक माजी नगरसेवक बाळा चव्हाण यांचा राजकारणविरहित असा सहयोग आम्हाला बहुमोल वाटला़ राजकारणासाठी आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा न करता त्यांनी वेळोवेळी कामात मदत केली़ या सोबत साथ होती ती सीमा रेडकर यांची. काही वर्षापूर्वी नाक्यावर उभे राहणारे आमचे टोळके आज नोंदणीकृत संस्था चालक (ट्रस्टी) झाले ते त्यांच्यामुळेच. संस्थेने समाजाचे कल्याण म्हणून या शौचालयाचा वापर कसा केला, हे सांगणे महत्त्वाचे आहे. कारण ‘परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे!’ परंतु आता एवढेच पुरे.
