दिशादर्शक!
अंधार पडतो.
पडद्यावरची चित्रं हलू लागतात.
आपण समजुतदार भूमिकेत शिरून अंधारातील प्रत्येक खुर्ची लुभावण्याच्या प्रयत्नांना लागतो. आपण इतके समजुतदार का होतो? आपला सिनेमा इतका सर्वसमावेशक का असतो?
व्यावसायिकतेची गणितं अचूक सोडवण्याचा आपला हा अट्टहास असतो. कलाकृतीच्या भवितव्याची चिंता बाळगत त्यातील नैसर्गिक संवेदनांचा बळी देणं यालाच आपण व्यावसायिक खेळी म्हणतो आणि ही खेळी एक तडजोड म्हणून स्वीकारल्याची भूमिका आपण घेतलीय. प्रत्येक नव्या पिढीच्या नव्या शिलेदाराला ‘मदरइंडिया’ नाही तर ‘शोले’ निर्माण करायचाय. कारण एकच- दोन्ही कलाकृतींनी व्यावसायिकदृष्टय़ा अभूतपूर्व यश पाहिलंय. ‘मदर इंडिया’त अनेक भले-बुरे पैलू होते. मेहबूबखानच्या बटबटीत पटकथेमागे ग्रामीण भारतीयांना रिझवणे हा प्रमुख उद्देश होता. ग्रामीण भारतात ‘मदर इंडिया’ नामक चळवळ उभी करायची म्हणजे त्याचे लोण भारतभर पसरतील आणि सर्व थरांतील प्रेक्षक कलाकृतीकडे झेपावतील. मेहबूबखानच्या अपेक्षेपेक्षाही अधिक- हा उद्देश इतक्या मोठय़ा प्रमाणावर भारतात पसरला की, कलाकृतीचं यश आणि यशासमवेत आपसूक येणारा दबदबा ‘मदर इंडिया’ला ‘ऑस्कर’ प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला.
आपल्या भारतीय मनोरंजन उद्योगाचा पाया ‘पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंगा’ अशा सर्वसमावेशक समाजव्यवस्थेवर रचलेला आहे. आपल्याकडे भारतीय स्त्रीचं कणखर रूप दर्शवणारा ‘मदर इंडिया’ नामक ग्रामीणपट निर्माण होतो. परंतु आपल्याकडे ‘द गुड अर्थ’ (किंवा ‘ग्रेप्स ऑफ राथ’) सारख्या कादंबरींचा आधार घेऊन एखादी अजोड कलाकृती निर्माण होऊ शकत नाही, किंबहुना अद्यापि तरी निर्माण झालेली नाही.
वँग लाँग नामक एका चिनी शेतक-याची कथा पर्ल बकसारख्या प्रथितयश अमेरिकन लेखिकेने ‘द गुड अर्थ’मधून मांडली. कादंबरी १९३१मध्ये प्रकाशित झाली, त्याचबरोबर जगभरचे वाचक अक्षरश: भारावून गेले. मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) चा कार्यकारी निर्माता आयरव्हिंग थालबर्गने कादंबरी चित्रित करण्याचामनसुबा रचला, तेव्हा अमेरिकेत अनेक भुवया उंचावल्या. चिनी शेतक-याच्या दु:खाशी अमेरिकन प्रेक्षक स्वत:ला आयडेन्टीफाय कसा करणार? हा प्रश्न ‘एमजीएम’च्या उच्च अधिका-यांना पडला. मात्र १९३७ साली पॉल म्युनी, लुई रेनर जोडीचा ‘द गुड अर्थ’ प्रदर्शित झाला आणि एक अलौकिक कलाकृती निर्माणझाल्याचं जगभरच्या मनोरंजन संस्कृतीने पाहिलं. ‘द गुड अर्थ’मध्ये ओल्या मातीचा पुकारा होता. तोच पुकारा मेहबूबखानच्या ‘मदर इंडिया’त होता. मात्र ‘मदर इंडिया’तील नायिका राधा (नर्गिस) असंख्य ग्रामीण स्त्रियांची प्रतिनिधी बनली होती. अवाक होऊन भारतभरातील प्रेक्षकांनी नर्गिसचं पडद्यावरचं रूप पाहिलं.पडद्यावरील व्यक्तिरेखा ‘आयडेन्टीफाय’ करणं आणि पडद्यावरचा खेळ थक्क होऊन पाहात राहाणं, हे दोन परस्परविरोधी पैलू असले, तरी भारतीय सिनेमाचा प्रेक्षक या दोन्ही गोष्टी एका पॅकेजमध्ये मिळत असल्यागत त्या एकत्रितपणे पाहतो.
‘द गुड अर्थ’ला अमेरिकेत-युरोपात अप्रतिम प्रतिसाद मिळाला. त्यात ‘आयडेन्टीफिकेशन’चा भाग कमी आणि कादंबरीचं यश अधिक होतं. पर्ल बकला त्यासाठी १९३१मध्ये पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. साहजिकच ‘एमजीएम’च्या कलाकृतीचा पाया सिनेमा सेटवर जाण्यापूर्वीच घट्ट झाला होता. ‘मदर इंडिया’कडे आपल्या प्रेक्षकांनी अवाक होऊन पाहिलं. गावातल्या (परक्या) मुलीची अब्रू वाचवण्यासाठी अशिक्षित स्त्री आपल्या पोटच्या पोरावर गोळय़ा झाडते, ही ‘आयडियेची गंमत’ मेहबूबमधीलव्यावसायिक निर्मात्याला खुबीने सादर करता आली, हे ‘मदर इंडिया’च्या यशाचं रहस्य. सर्वसमावेशकतेच्या जवळ जाणारा ‘मसाला’ मेहबूबने त्यात ठासून भरला होता. आपल्याकडे असेच ‘मसाला’ भरून प्रत्येक तीन नाही तर चार वर्षांनी किमान दोन ‘गॉडफादर’ पडद्यावर दिसतात.
‘गॉडफादर’ पडद्यावर झळकणं म्हणजे काय, तर लेखक मारियो पुझो आणि दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांचा अनुक्रमे कादंबरी व सिनेमाध्यमासमवेतचा प्रयोग. तांत्रिकदृष्टय़ा उत्कृष्ट निर्मितीला घट्ट आणि संवेदनक्षम मानसिकता दर्शवणा-या व्यक्तिरेखांची साथ. ‘गॉडफादर’ म्हणजे पडद्यावर केवळ हिंसेचा नंगा नाच दाखवण्याचंसाधन नव्हे. पॅरामाऊंट पिक्चर्सने ज्या वेळेस ‘गॉडफादर’च्या निर्मितीचा घाट घातला, तेव्हा त्यांची बेताची आर्थिक स्थिती हा प्रमुख मुद्दा होता. त्यांना कमीत कमी खर्चात ‘गॉडफादर’ची निर्मिती करणं क्रमप्राप्त होतं. त्यासाठी त्यांनी अनेक दिग्दर्शकांचे दरवाजे ठोठावले आणि प्रत्येक दरवाजातून त्यांना नकार मिळत गेला. एका गँगस्टरचं कथानक मिळवून ‘पॅरामाऊंट’ला आपले खिसे भरण्यासाठी एक समीकरण जुळवून हवंय, अशीच हॉलिवूडच्या असंख्य दिग्दर्शकांची धारणा होऊन बसली. मुळातमारिओ पुझोच्या कादंबरीचा वेग अनेक दिग्दर्शकांना सिनेमाध्यमाच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचं वाटत होतं. कोपोलाकडे ‘पॅरामाऊंट’ने विचारणा केली, तेव्हा त्याने नकार देण्यापूर्वी कादंबरीची फक्त पहिली पन्नास पानं वाचली. त्यात काहीच गंमत वा आव्हान नसल्याचं त्याने ‘पॅरामाऊंट’ला कळवून टाकलं. मात्र तरीही ‘पॅरामाऊंट’ने कोपोलाच्या नकाराला उत्तर दिलं नाही. त्यानंतर जेव्हा तो कादंबरी वाचू लागला, तेव्हा त्यातील बारक्या बारक्या गोष्टींनी त्याचं लक्ष वेधलं. कथानक एका गुन्हेगाराचं असलं, तरी गुन्हेगार शेवटी कथानायक होता. कथानायकाचं एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाची सुख-दु:खं होती. कुटुंब राहात असणारा समाज आणि कथानायकाने प्रस्थापित साम्राज्य यांच्यात एक द्वंद्व होतं, सत्तेची लालसा होती. वारसा हक्काची अभिलाषा होती. कोपोला भारावला. त्यातून कोपोला आणि लेखक मारिओ पुझो यांना जोडणारा एक समान दुवा होतो, तो म्हणजे दोघेही जन्माने इटालियन अमेरिकन. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये वाचक म्हणून कोपोला अडकत गेला आणि त्याने या नोंदी एका डायरीत तशाच्या तशा लिहून ठेवल्या. पुढे मार्लन ब्रँडोपासून अल् पचिनोपर्यंत सर्व कलाकारांनी कोपोलाच्या डायरीची पारायणं केली. जागतिक सिनेमाध्यमाच्या इतिहासातील काही गिन्याचुन्या सर्वश्रेष्ठ अभिनयात मार्लन ब्रँडोचा ‘डॉन व्हिटो कॉलियनी’ मोडतो. आपल्या दिग्दर्शकांना मात्र ‘गॉडफादर’ या कलाकृतीपेक्षा ‘डॉन कॉलियानी’ या व्यक्तिरेखेने अधिक भुरळ घातली. स्टार सिस्टिमच्या ओझ्याखाली दबून आपण नेहमीच एखाद्या सुपरस्टारच्या चेह-यासोबत मार्लन ब्रँडोची भूमिका जोडण्याचा प्रयास करतो. प्रत्येक दशकातील सुपरस्टार्स ‘गॉडफादर’ रंगवण्याची स्वप्नं पाहतात आणि त्यांचे भक्तगण निर्माते-दिग्दर्शक त्यांचं हे स्वप्न सर्वसमावेशकतेचा मसाला कोंबून पूर्ण करतात. मुळात मारिओ पुझोच्या कादंबरीतील फाफटपसा-याआड जो ‘मसाला’ ठासून भरलाय आणि जो हुडकून काढण्याची ताकद फ्रान्सिस फोर्ड कोपोलामध्ये होती, त्या पैलूकडे आपण दुर्लक्ष करतो. भारतीय समाजव्यवस्थेच्या चौकटीत ‘गॉडफादर’ कसा बसेल, याकडे लक्ष केंद्रित होतं आणि भारतीय समाजव्यवस्था म्हणजे नक्की काय, तर विवाह, सणासुदीला नृत्य-संगीत, हिंदू-मुस्लिम व्यक्तिरेखांचा भाईचारा. हिंदूच्या घरात मुसलमानचं पोर वाढणार, पुन्हा मागल्या दाराने मुसलमानाच्या घरात हिंदूंचा राबता. मग नायिका-नायक यांचे भिन्न धर्म. मुळात ‘गॉडफादर’सारखी पटकथा बांधल्यानंतर त्यात रोमान्स करणारे वेगळे नायक-नायिका आवश्यक ठरतात. इथे मूळ संहितेला धक्का बसतो. सुभाष घईचा ‘विधाता’,मुकुल आनंदचा ‘अग्निपथ’, रामगोपाल वर्माचा ‘सरकार’ किंवा गेला बाजार फिरोज खानचा ‘धर्मात्मा’ यामुळे भारतीय सिनेमासृष्टी होती तिथेच राहिली. याउलट‘गॉडफादर’ हा नुसत्या हॉलिवूडच्या इतिहासात नव्हे; तर जागतिक सिनेमाच्या प्रवासात ‘माइलस्टोन’ मानला जातो. जगभरातील सिनेमाची परिभाषा ‘गॉडफादर’नेबदलली. फ्रान्सिस फोर्ड कोपोलाची दृष्टी लावून युरोप आणि आफ्रिकी देशांतला तरुण दिग्दर्शकदेखील गुन्हेगारी विषयाची हाताळणी करू लागला.
‘गॉडफादर’सारखं सिनेमॅटिक विश्व आपण का निर्माण करू शकत नाही? के. आसिफने तसा प्रयत्न केला होता. फ्रॉम नोव्हेर त्याने अकबर- सलीम- अनारकलीचा संघर्ष कागदावर चितारला. अशा व्यक्तिरेखा होत्या किंवा नव्हत्या, इतपत विचार करायला लावणारी पटकथा आसिफने उभारली. इतिहास नेमकं काय सांगतो, त्याहीपेक्षा आसिफने कलाकृतीत काय मांडलंय, हे लोकांनी उत्सुकतेने पाहिलं. आसिफने तब्बल अकरा वर्षं एकाच पटकथेच्या बांधणीत घालवले आणि तरीही त्याची एक नजर व्यावसायिक शक्यतांवर कायम होती. पटकथेला सर्वधर्मसमावेशकतेची सोनेरी किनार लावली जाणं हा त्याच व्यावसायिक खेळी (किंवा तडजोडीचा) एक भाग होता. सम्राट अकबराची पत्नी हिंदू होती, म्हणून तो कृष्णजन्माचा पाळणा हलवताना दाखवला जातो आणि संपूर्ण अकबर कुटुंब अगदी दिल्ली दरबारासह कृष्णजन्मोत्सवात सहभागी होतं. इतिहास काय सांगतो माहीत नाही. इतिहास असंही सांगतो की, अकबराने अनारकलीला भिंतीच चिणून मारली. आसिफला ते मंजूर नाही. अकबराची प्रतिमा डागाळणं त्याला कलाकृतीच्या (व्यावसायिक) दृष्टिकोनातून परवडणारं नाही. अकबर त्याच्या कथेचा नायक होता. नायक खलनायक असून कसं चालेल, म्हणून मग आसिफ अनारकलीला भिंतीत चिणण्याचं ‘नाटक’ दाखवतो आणि तिथून एका भुयारामार्गे ती देशाबाहेर गेलीय अशा दृश्याने क्लायमॅक्स संपवत कलाकृतीचा शेवट करतो. आसिफची कलाकृती भारतीय पडद्यावर अजरामर ठरते. ‘माइलस्टोन.’ फ्रॉम नोव्हेर एक इतिहास उभा राहतो. इतिहासकारांना काही वाटो, पण आसिफचं बोट धरून पुढच्या पिढय़ा सम्राट अकबर आणि सलील-अनारकली प्रकरणाकडे पाहतात. सलीमच्या आयुष्यात कोणी अनारकली नव्हतीच. हू केअर्स? आसिफने दाखवलंय तोच सलीम आणि तीच अनारकली आणि तेच भेटले.कृष्णजन्मोत्सवात त्यांची नजरानजर झाली. एक स्वतंत्र इतिहास रचला जाण्याइतकी कलाकृती भारतीयांच्या नसानसात भिनली. तोच इतिहास (आणखी दोन पिढय़ांनी)आशुतोष गोवारीकरने ‘जोधा अकबर’ नावे सादर केला. व्यावसायिक तडजोडीचं द्वंद्व इथेही होतं. आसिफ आणि आशुतोषमध्ये नवं विश्व उभारण्याची ताकद असणं, हा सर्वस्वीवेगळा विषय झाला. त्या दृष्टीने ‘स्वदेस’ आशुतोषचा जबरदस्त प्रयत्न मानला जावा. ‘लगान’नंतर ‘स्वदेस’ करायला वेगळं धैर्य लागतं. शाहरूख खानला घेऊन सिनेमे कोणीही करतं. त्याच्या चेह-यावर कॅमेरा लावून ठेवला आणि त्याने वेडेवेडे चाळे केले की, सिनेमे सुपरहिट झाले. खिशात पैसे आणि वितरक असतील आणि पाठीवर शाहरूखचा हात असेल, तर त्यासाठी कोणतेही श्रम पडत नाहीत. करण जोहर आणि फराह खानचे सिनेमे असे डुलक्या आणि झोपा काढत निघतात. ‘स्वदेस’ किंवा ‘चक दे इंडिया’ करायला मात्र वेगळी मानसिकता लागते.
‘स्वदेस’ कमालीचा संथ असल्याचा ठपका आशुतोषवर ठेवण्यात आला. प्रत्येक विषय विद्युतवेगाने क्लायमॅक्सपर्यंत कशाला पोहोचायला हवा? गोल्डीने ‘तेरे मेरे सपने’ केला आणि ‘तीसरी मंझिल’ आणि ‘जॉनी मेरा नाम’देखील आकारले. ‘तेरे मेरे सपने’ डॉ. ए.जे. क्रोनिनच्या ‘सिटाडेल’वरून बेतला होता. तो ‘जॉनी’ आणि ‘तीसरी मंझिल’च्या वेगाने कसा जाईल? ‘कागज के फूल’ किंवा ‘प्यासा’ अब्बास मस्तानच्या ‘रेस’ इतक्या वेगाने धावले, तर मग त्यांचं वेगळेपण ते काय?
‘लगान’ने भारतीय चित्रपटांना पुन्हा एकवार ऑस्करची दारं उघडली असली, तरी ‘स्वदेस’ने भारतीय चित्रपट प्रगल्भ झाल्याचं संपूर्ण जगाला दाखवून दिलं. एरवी भारतीय मातीतली वाटणारी एखादी कलाकृती प्रेक्षकांना क्षणिक भुरळ घालू शकते. मात्र त्याची मुळं परदेशात असल्याने आणि भारतीयकरण करण्याच्या नादात त्याची मुळंच छाटण्यात आली, तर मग काळाच्या ओघात ती टिकून राहण्याची शक्यताच शून्य. ‘रिएनकार्नेशन ऑफ पीटर प्राऊड’वरून सुभाष घईने ‘कर्ज’ बेतला होता. ‘रिएनकार्नेशन’मधली म्हातारी तिच्या नायकाला मारून टाकते, तो दुसरा जन्म घेतो, तिचा बदला घेऊ पाहतो, ती पुन्हा त्याचा बळी घेते. ‘कर्ज’मध्ये भारतीय प्रेक्षकांची
मानसिकता लक्षात घेऊन अखेरीला तरुण नायक म्हाता-या खलनायिकेचा सूड घेण्यात यशस्वी होतो, एवढा बदल करण्यात आला. ‘रिएनकार्नेश’..चा अवघा इम्पॅक्ट नष्ट झाला, मात्र व्यावसायिक दृष्टीने ‘कर्ज’ यशस्वी झाला.
दुसरं उदाहरण. शांताराबापूंचा ‘पिंजरा.’ श्रीधर गुरुजी नामक एका आदर्श शिक्षकाचं अध:पतन. १४ एप्रिल १९७२ रोजी ‘पिंजरा’ महाराष्ट्रभर झळकला आणि मराठीच्या कक्षेत तोमैलाचा दगड असल्याचं लगेचच अधोरेखित झालं. अर्थात, माइलस्टोन असणा-या या कथेचा जन्म १०३ वर्षांपूर्वी जर्मनीत झाला होता. १९०५मध्ये हेन्रीच मान नामक जर्मन लेखकाने ‘स्मॉल टाऊन टायरंट’ ऊर्फ ‘प्रोफेसर वुनरंट’ या नावाची कादंबरी लिहिली होती. एका गावात ‘ब्ल्यू एंजल’ नावाचा नाईट क्लब असतो. तिथे लोला नावाची कॅबरेआर्टिस्ट काम करत असते. एके दिवशी प्रोफेसर वुनरंटचे विद्यार्थी शाळा चुकवून कॅबरे पाहायला जातात. वुनरंट त्यांचा पाठलाग करत तिथे पोहोचतात आणि स्वत:च लोलाच्या जाळय़ात अडकतात. लोला गाव सोडून निघून जाते. पाठोपाठ वुनरंटही शाळा व गाव सोडून जातात, हे मूळ कादंबरीचं कथानक. त्यावरून प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक जोसेफ वॉर्न स्टर्नबर्गने एमिल जनिंग्ज व मर्लिन डिट्रिईचसह ‘द ब्ल्यू एंजल’ या इंग्लिश व जर्मन कलाकृतींची निर्मिती केली. (इतिहास असं सांगतो की, अॅडॉल्फ हिटलरची वक्रदृष्टी मर्लिन डिट्रिईचच्या रसरसत्या देहावर पडली होती. मर्लिन दाद देईना, तेव्हा हिटलरने तिच्या सर्व चित्रपटांना जर्मनीत बंदी घातली होती.) शांतारामबापू-अनंत माने जोडीचा ‘पिंजरा’ मराठी वळणाने जात असताना, त्यात बारीकसा बदल घडून आला. ‘पिंजरा’त सुडाने बेभान झालेली चंद्रकला (संध्याताई) एके दिवशी श्रीधर गुरुजीलाच बोर्डावर उभे करण्याची प्रतिज्ञा करते आणि स्वत:चा सूड उगवताना त्याच्याच प्रेमात अडकते. गुरुजींसोबत चंद्रकलादेखील उतरणीच्या प्रवासाला लागते. मूळ कादंबरीत किंवासिनेमात चंद्रकलाचं म्हणजे अर्थात नर्तकी लोला लोलाचं इतकं सुहृदयी आणि भावुक-प्रणयी चित्र नाही. ती बदचालीची आणि खलनायकी वृत्तीचीच दाखवली आहे. मराठीप्रेक्षकांसमोर अशी पाषाणहृदयी नायिका कशी उभी करायची, असा प्रश्न ‘पिंजरा’कर्त्यांना पडला असावा; परंतु त्यामुळे संपूर्ण व्यक्तिरेखा बदलून मूळ कथेचा ढाचा विस्कटला त्याचं काय?
मूळ कथानकाला धक्का बसूनही त्याचा परिणाम कायम राहतो किंवा नाही, हा पुन्हा चर्चेचा-वादाचा मुद्दा झाला. बिमल रॉय-ऋत्विक घटक जोडीने ‘मधुमती’ लिहिला. संपूर्ण चित्रण झाल्यावर निवडक प्रेक्षकवर्गासमोर त्याचे रशेस दाखवण्यात आले. क्लायमॅक्समध्ये खलनायकाविरुद्धच्या लढय़ात नायकाच्या मदतीला चक्क मृत नायिकेचा आत्मा येतो आणि खलनायकाचा खातमा होऊन नायकाचा विजय होतो. आत्मा नाहीसा होतो. (आत्मा- भूत यासारखी अतर्क्य गोष्ट मांडूनही त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला नसल्याने, त्याचप्रमाणे टेलिव्हिजनही नसल्याने निदर्शनाच्या निमित्त पब्लिसिटी मिळण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. तेव्हा बिमल रॉयचा सिनेमा अडवण्याचा प्रयास झाला नाही.) दोन घटका मनोरंजन म्हणून त्याकडे पाहायचं आणि सिनेमा संपल्यावर सोडून द्यायचं, असा सरळसोट प्रामाणिक उद्देश होता आणि तरीही आत्मा पाहिलेली व्यक्ती अखेरीस जिवंत ठेवायची, हे बिमल रॉयसकट काही प्रेक्षकांच्या मनाला पटलं नाही. त्यांनी ही गोष्ट बिमल रॉय तसंच लेखक ऋत्विक घटकच्या निदर्शनास आणून दिली. तिथल्या तिथे दोघांनी क्लायमॅक्स बदलून नायकाचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या पंधरा मिनिटांचं चित्रण पुन्हा करण्यात आलं, अर्थात त्यामुळे ‘मधुमती’च्या एकसंध परिणामात काडीमात्र फरक पडला नाही. बी. आर. चोप्राच्या ‘नया दौर’वरून आशुतोषच्या ‘लगान’ची पटकथा प्रेरित होती. ‘लगान’, ‘नया दौर’पेक्षा कांकणभर अधिक सरस होता.आपल्या सिनेमासृष्टीला युद्धपट दाखवणं जमत नाही. ‘लगान’ किंवा ‘चक दे इंडिया’सारखे तुरळक अपवाद वगळता इथे ‘स्पोर्ट्स’ फिल्म्स जेमतेम तयार होतात. त्यांचे ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन’ किंवा ‘प्रोसायडॉन अॅडव्हेंचर्स’ किंवा ‘द टॉव्हरिंग इन्फनरे’ नाही तर जेम्स कॅमरूनचा ‘टायटॅनिक’ बघा. एकेका कलाकृतीच्या प्रदर्शनासहित हॉलिवूडची सिनेमासृष्टी प्रगतीपथाकडे गेलीय. आपला ‘बर्निग ट्रेन’!
‘डिझास्टर मूव्ही’ पाहायला जायचं आणि राहुल देव बर्मनने दिलेली उत्तम कव्वाली गात परत यायचं. ट्रेन थांबत नाही, तेव्हा स्टेशनवरून देण्यात येणारी सूचना प्रवाशांपर्यंत पोहोचलीय, हे दर्शवण्याकरिता डब्यातून लाल कापड फेकण्याची वेळ येते. लाल कपटा, कापड काही मिळत नाही, तेव्हा पान खात कव्वाली गाणारी बाई (आशा सचदेव) आपल्या अंगावरची साडी उतरवून स्टेशनवर फेकते. इतक्या आचरटपणानंतर विषयाचं गांभीर्य ते काय राहणार?
काल-परवापर्यंत कम्पल्सरी कुर्ता घालणारा आणि कॅमेरा गळय़ात अडकवून ‘स्टोरी’साठी वणवण फिरणारा पत्रकार पडद्यावर दिसत असे. ‘सच्चे का बोलबाला’नावाच्या सिनेमात संपादकाच्या भूमिकेतला देव आनंद स्वत:च्या केबिनमधील खिडकीखाली रस्त्यावर बसलेल्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे खपाचे आकडे विचारतो.यानंतर आपल्याकडे ‘लगान’, ‘स्वदेस’ किंवा ‘सत्या’, ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या कलाकृती निघतायत ही आश्चर्याची गोष्ट मानायला कोणाचीच हरकत नसावी. ं ं ं