Home | अग्रलेख | बोलबच्चननामा!

बोलबच्चननामा!

शिवसेना,भाजप आणि रिपब्लिकन महायुतीचा वचननामा वाचताना वचन या शब्दाचा अर्थच बदललेला दिसतो. वचन हे पाळण्यासाठी असते, पण सेना-भाजप युती ते टाळण्यासाठी आहे, असे समजत असावी. पण युतीची ही बोलबच्चनगिरी आता फार काळ चालणार नाही. वास्तविक पाहता निवडणुकीच्या आधी मतदारांना भुलवण्यासाठी सगळेच पक्ष जाहीरनामे प्रसिद्ध करीत असतात, परंतु शिवसेना इतिहासात रमणारी संघटना असल्यामुळे ऐतिहासिक संदर्भानिशी शाब्दिक कसरती करून लोकांना भुलवण्यात वाकबगार आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकीसाठीही युतीचा जाहीरनामा नव्हे तर वचननामा प्रसिद्ध होतो. एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनांची कशी झुणकाभाकर झाली, ते महाराष्ट्राने यापूर्वी अनुभवले आहे. झुणका एकाच्या, भाकर दुस-याच्या आणि स्टॉलच्या जागा तिस-याच्या घशात असे चित्र दिसले. त्यांच्या या वृत्तीमुळेच त्यांच्याकडे पुन्हा सत्ता देण्याची चूक महाराष्ट्रातील जनतेने केली नाही. काँग्रेसअंतर्गत सत्तासंघर्षामुळे मुंबईत मात्र यापूर्वी राजकीय गणिते त्यांना सोयीस्कर जुळत गेली आणि सलग तीन वेळा सत्ता मिळाली. भूतकाळातील चुकांपासून बोध घेऊन दोन्ही काँग्रेस पक्षांनी यावेळी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि युतीच्या पायाखालची वाळू सरकली. स्टार माझाआणि नेल्सनया संस्थांनी केलेल्या जनमत चाचणीतूनही ते स्पष्ट झाले असून मुंबईतून शिवसेनेचे साम्राज्य खालसा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेचे -हासपर्व सुरू झाले आहे, ते निवडणुकीनंतर अधिक वेगाने होत जाईल. त्यांनी कितीही वचने दिली तरी त्यांच्या रंगीत कागदांवर छापलेल्या बोलबच्चनगिरीला आता मतदार भुलणार नाहीत. कारण युतीच्या कारकीर्दीतील हालअपेष्टा लोकांनी सोसल्या आहेत. मुंबईचे युतीने कसे वाटोळे केले, यावर गेल्या काही महिन्यांत अनेक प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याची स्वप्ने दाखवून नुसत्या बढाया मारायच्या आणि प्रत्यक्षात कामे करताना निव्वळ खाबूगिरी करायची, ही त्यांची रीत आहे. सतरा वर्षाच्या राजवटीत ठोसपणे मार्गी लावलेली एकही सांगण्यासारखी गोष्ट त्यांच्याकडे नाही, तरीही निवडणुकीआधी काही महिने करून दाखवलेम्हणून ढोल वाजवले. पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य या प्राथमिक सुविधांच्या बाबतीत देशाची ही आर्थिक राजधानी एखाद्या तालुक्यापेक्षाही मागास असल्याचे दिसून आले. मुंबईकरांना पिण्याचे शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवण्याच्या यापूर्वी तीन वेळा दिलेल्या वचनांचे काय झाले, याचा जाब विचारण्याची गरज आहे. मुंबईतील खड्डे हा तर अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय असून त्यामधून कंत्राटदारांशी साटेलोटे आणि टक्केवारीचा भ्रष्ट व्यवहारही जनतेसमोर आला. केवळ टेंडरमध्ये गुंतल्यामुळे विकासाकडे लक्ष पुरवता आले नाही. महापालिका रस्ते दुरुस्तीसाठी आहे, की खड्डे पडणारे रस्ते बनवणा-या कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे,अशी शंका येण्याजोगी परिस्थिती मुंबईकरांनी अनुभवली. युतीच्या वचननाम्याचा फोलपणा दाखवण्यासाठी केवळ कच-याचे उदाहरणही पुरेसे ठरणारे आहे. 2002 मध्ये 24 तासांत कचरा उचलणे आणि आवश्यक तेथे दिवसांतून दोन वेळा कच-याचे उच्चाटन करण्याचे वचन दिले होते. 2007 च्या वचननाम्यातही मुंबई कचरामुक्त करण्याशी बांधिलकी असल्याचे सांगताना दिवसांतून दोनदा कचरा उचलण्याचा पुनरुच्चार केला होता. आणि आता 2012 च्या वचननाम्यातही कचरा उचलून नेण्याच्या व सफाईच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून मुंबई अधिक स्वच्छ ठेवण्याची योजना राबवण्याचे वचन आहे. एवढी वचने देऊनही मुंबईतला कचरा हटत नाही आणि त्यात पुन्हा यांनी वचननाम्याच्या कच-याची भर घातली आहे. वचननाम्यातील मराठी अस्मितेचे मुद्दे म्हणजे भंपकपणाचा कळस आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला मराठी दिनराज्य सरकारतर्फे अनेक वर्षापासून साजरा केला जातो, परंतु ते युतीच्या गावी नाही. म्हणूनच महापालिकेच्या वतीने मराठी दिनसाजरा करण्याचे वचन देण्यात आले आहे. खरेतर आतापर्यंत महापालिकेतर्फे मराठी दिनसाजरा केला जात नव्हता, त्याबद्दल मराठीच्या नावावर मतांचे राजकारण करणा-यांनी माफी मागायला पाहिजे. त्याहून गंभीर बाब म्हणजे युतीच्या काळातच मुंबईतील शंभरावर मराठी शाळा बंद झाल्या, त्याबद्दल जराही शरम न बाळगता ते पुन्हा मराठी शाळा वाढवण्यासाठी मोहीम राबवण्याचे वचन देतात. शाळा इमारतींची दुरुस्ती तसेच संगणक प्रयोगशाळांबाबतही गेल्यावेळी दिलेली वचने न पाळता आल्यामुळे यावेळी ती पुन्हा देण्यात आली आहेत. एकूण परिस्थिती पाहता, मुंबई महापालिकेत 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा राज ठाकरे यांचा आरोप अगदीच हवेतला म्हणता येत नाही. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. ही कोंबडी वांद्रय़ाच्या कलानगरमधील घरातून बाहेर काढण्याचे शरद पवार यांचे आवाहन म्हणूनच अधिक संयुक्तिक ठरते.