Home | फियान फॅक्टर | फियानमुळे पोलिसांवर पुन्हा ताण

फियानमुळे पोलिसांवर पुन्हा ताण

मुंबई: मनसेच्या शपथनाट्यामुळे राज्यात निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिस यंत्रणा पुरती जेरिस आली होती. त्यातच फियान चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा इशारा मिळाल्यानंतर बुधवारी पोलिसांना सतर्कतेचे आदेश देऊन सुट्टया रद्द करण्यात आल्या. समुद्र किना-यावर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. क्षणाचीही उसंत न घेता एकापाठोपाठ येणा-या मानवनिर्मित तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करताना मात्र पोलिसांची त्रेधातिरपीट उडत आहे.

निवडणुकीनंतर कुटुंबीयांसमवेत काही वेळ घालवता येईल, या पोलिसांच्या भाबड्या आशा विधानसभेत शपथविधीच्या वेळी मनसे आमदारांनी गदारोळ केल्यामुळे धुळीस मिळाल्या. राज्यभर हिंसक पडसाद उमटल्यामुळे अनेकांना सुट्टीवर जाता आले नाही. त्यानंतर सार्वजनिक जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच अवकाळी पावसाने राज्याला झोडपले. त्यातच हवामान खात्याने फियान चक्रीवादळाची भीती वर्तवल्यामुळे पोलिसांना पुन्हा कामावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे दोन दिवसाआधीच सुट्टय़ांचे नियोजन केलेल्या पोलिसांच्या आकांक्षा अवकाळी पावसासोबतच वाहून गेल्या. फियान नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा इशारा दिल्यामुळे बुधवारी दुपारनंतर मुंबईतील विविध कार्यालयात भयाण शांतता पसरली होती. नैसर्गिक आपत्तीत हानी होऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस, तटरक्षक दल, क्विक रिस्पॉन्स टीम आदी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. ही सगळी मंडळी दिवसभर किनारपट्टीवर नजर ठेवून बसली होती. सुरक्षिततेचे उपाय म्हणून कोणालाही किना-याजवळ येऊ दिले जात नव्हते. परंतु, तरीही बघ्यांची गर्दी काही केल्या कमी होत नव्हती.

वरळी, नरिमन बाग, वर्सोवा, जुहू मिठी, कुलाबा, कोळीवाडा, सागर कुटीर, सात बंगला आणि सांताक्रुझ येथे अतिदक्षतेचा इशारा पोलिसांतर्फे दिला होता. पोलिस दिवसभराच्या छोट्या मोठ्या घटनेवर नजर ठेवून होते. भाविकांना हाजी अली दग्र्यात जाण्यास मज्जाव केला जात होता. या सर्व ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सीलेगची कामगिरी

जमीन तसेच पाण्यात चालणा-या चार सीलेग बोटी नुकत्याच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या. त्यामुळे समुद्र तसेच किना-यावरील हालचालींवर लक्ष ठेवणे सुलभ झाले आहे. चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे या बोटी देखरेख करण्यासाठी सतत किनाऱ्यावर फिरत होत्या. समुद्रात फेरफटका मारण्याबरोबरच किनाऱ्यालगत असलेल्या ठिकाणावर सहजरीत्या पोहचता येत असल्यामुळे अशा संकटसमयी सीलेग महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.