'चीनी व्यापा-याविरोधात खटला दाखल करणार'
बीजिंग- चीनमधील यिवू येथे बेकायदेशीरपणे पकडून ठेवल्याबद्दल 15 चीनी व्यापा-यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय दोन भारतीय व्यापा-यांनी घेतला आहे.
"चीनमध्ये आम्हाला बेकायदेशीरपणे पकडून छळ करणा-या 15 स्थानिक व्यापा-यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे", असे दिपक रहेजा या व्यापा-याने परराष्ट्र व्यवहारमंत्री एस.एम.कृष्णा यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
भारतीय व्यापा-यांशी बेकायदा वर्तन करणा-या चीनमधील पाच व्यापा-यांविरोधात चीनमध्ये फौजदारी खटला चालवण्यात येत असल्याचे चीन सरकारने सांगितले आहे. याशिवाय दोन्ही भारतीय व्यापा-यांनी त्यांच्या पासपोर्ट जप्त केल्याच्याविरोधातही न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याचे सरकारने नमूद केले.
रहेजा आणि श्यामसुंदर अग्रवाल या दोन भारतीय व्यापा-यांनी बुधवारी कृष्णा यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सर्व माहिती दिली.
चीनमध्ये गुजरात आणि मुंबई मधील 22 हिरे व्यापा-यांना तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. हे व्यापारी हाँगमधून हिरे आणून चायनीज बाजारात विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर 22 भारतीय व्यापा-यांपैकी 12 व्यापा-यांची चीन न्यायालयाने सहा जानेवारीला सुटका केली होती. तर रहेजा आणि अग्रवाल या दोन व्यापा-यांची सुटका भारतीय अधिका-यांच्या मदतीने झाली होती, मात्र त्यांना चीन सोडण्यास मनाई करण्यात आली होती.
