Home | विदेश | भारतीयांचे जीवनगाणे आनंदीच

भारतीयांचे जीवनगाणे आनंदीच

नवी दिल्ली- बॉबी मॅकफेरीनच्या डोन्ट वरी बी हॅपीया गाण्याने 1988 मध्ये धमाल उडवली होती. महागाईने गांजलेल्या अन् अनंत अडचणींचा डोंगर समोर उभा ठाकला असतानाही मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधनया उक्तीनुसार हसतमुखाने आयुष्याचा गाडा ओढणा-या भारतीयांनी बॉबीचा हा सल्ला कधीचाच शिरोधार्य मानला आहे. जगभरातील आनंदी, समाधानी लोकांच्या यादीत भारतीयांचा क्रमांक दुसरा असल्याचे निश्चित करणा-या एका पाहणीमुळे याला पुष्टीच मिळाली आहे.

 

जागतिक पातळीवरही आर्थिक मंदी, बेरोजगारी, अशांतता, हिंसाचार, संघर्ष, नैसर्गिक आपत्तींमुळे जगण्याचा तोल ढासळला आहे. जिवनाचे पदर विस्कटू लागले आहेत. या परिस्थितीत अनेक देशांमधील नागरिकांच्या आयुष्याचा तोल याच समाधानी वृत्तीने सांभाळला आहे. इप्सोसया संस्थेने यासंदर्भात केलेल्या पाहणीनुसार, ‘जो है, जैसा है ठीक है, हम सब इस में भी खुश हैया वृत्तीचे लोक इंडोनेशियात सर्वाधिक (51 टक्के) आहेत तर, त्यांच्या पाठोपाठ 43 टक्के भारतीयांनी ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधानचा नारा दिला आहे.

 

दर वर्षी होणा-या या स्वरूपाच्या पाहणीत यापूर्वी भूतानचे नागरिक सर्वाधिक समाधानी असल्याचे आढळत असे. यंदा मात्र इंडोनेशिया आणि त्यापाठोपाठ भारतीयांनी हा मान पटकावला आहे. जगातील 24 देशांमध्ये इप्सोसने ही पाहणी केली होती.भारताप्रमाणेच मेक्सिकोमधील 43 टक्के नागरिकांनी आनंदी असल्याचे म्हटले आहे. तर ब्राझील आणि तुर्की या देशातील 30टक्के नागरिकांनी आनंदी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे अविवाहित व्यक्तींपेक्षा विवाहित व्यक्ती अधिक समाधानी असल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे.

विशेष म्हणजे आर्थिकदृष्टय़ा सुसंपन्न मानल्या जाणा-या अमेरिका, कॅनडा, ब्रिटन या देशांमधील आनंदी नागरिकांची संख्या तुलनेने कमीच आहे. आर्थिक अरिष्टांचा सामना करणा-या युरोपमधील केवळ 15 टक्के नागरिकच आनंदी असल्याचे नोंदवले गेले आहे. खंडानुसार विचार केल्यास लॅटिन अमेरिकेतील देशांमधील नागरिक सर्वात जास्त आनंदी आहेत. त्यानंतर आशिया आणि मध्य पूर्व आशियाचा क्रमांक लागतो.