पाकिस्तान नरमला!
इस्लामाबाद- काश्मीरच्या मुद्दय़ावरून छोट-छोटे हल्ले करून भारतीय सैनिकांना हैराण करणा-या पाकिस्तानने याच मुद्दय़ाबाबत अखेर नरमाई भूमिका घेतली. 21 व्या शतकात काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारताशी युद्ध करण्याची परिस्थिती नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी सोमवारी मान्य केले. काश्मीरच्या मुद्दय़ावर लोकशाहीमार्गाने तोडगा काढण्याची गरज असल्याचे गिलानी यांनी स्पष्ट केले.
काश्मीर प्रश्नावर आतापर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये चार युद्ध (1947, 1965, 1971 आणि 1999 साली) झाली आहेत. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यासाठी आता पाकिस्तान युद्धाचा भार सहन करू शकणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली. काश्मीर मुद्दा चर्चेद्वारे आणि दोन्ही देशांनी सहमतीने सोडवण्यावर भर दिला जाईल असे गिलानी यांनी सांगितले. पाकिस्तानच्या देश व विदेश नितीच्या केंद्रस्थानी काश्मीरचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील लोकशाहीचे कौतुक
पाकिस्तानमधील सामान्य जनतेपासून ते राजकीय नेत्यांना भारतातील लोकशाहीबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या एका वक्तव्यावरून ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे. पाकिस्तानमधील एकाही लोकनियुक्त सरकारने अद्याप आपला कार्यकाळ पूर्ण केला नसल्याची खंत गिलानी यांनी व्यक्त केली. देशातील लोकनियुक्त सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करणे लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे गिलानी यांनी यावेळी सांगितले.
