झरदारींच्या भ्रष्टाचारबाबत पाठपुरावा करा
इस्लामाबाद- पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्यासाठी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी स्वीस अधिका-यांना पत्र लिहिणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.
गिलांनी यांनी स्वीस अधिका-यांना पत्र लिहिले तर त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानाबाबत चाललेला खटला आपोआप संपुष्टात येईल असे मुख्य न्यायमूर्ती इफ्तिखार चौधरी यांनी नमूद केले. झरदारी यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा न चालवण्याच्या आरोपाखाली गिलानी यांना 13 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत.
पंतप्रधानांच्या पक्षाचा एक प्रमुख याप्रकरणात सहभागी असला तरी न्यायालयासमोर सर्वजण सारखेच असल्याचे न्यायालयाने सांगितले. याशिवाय स्वीस बँकेतील अधिका-यांना जर पत्र लिहिले तरच स्वीस बँकांत असलेले सुमारे सहा करोड डॉलर पाकिस्तानमध्ये परत येतील असेही न्यायालयाने नमूद केले.
आठ सदस्यीय खंडपीठाने गिलानी यांचे वकील एतजाज एहसान यांना गिलानींच्या याचिकेतील काही आक्षेपार्ह भाग वगळण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
नेत्यांविरोधातील बंद केलेले खटले पुन्हा चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर गिलानी यांनी आक्षेप घेत बंद खटले सरकार पुन्हा चालवू शकत नाही असे मत व्यक्त केले होते.गिलानी यांच्या या वक्तव्यामुळे तसेच पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई सुरू न केल्यामुळे गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते तसेच त्यांना न्यायालयाने अवमान नोटिस बजावली होती.
