Home | आयपीएल | मुंबईविरुद्ध पंजाब ‘किंग’

मुंबईविरुद्ध पंजाब ‘किंग’

मोहाली- मुनाफ पटेलच्या आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीनंतरही आघाडीच्या फलंदाजांनी सपेशल शरणागती पत्करल्यामुळे मुंबई इंडियन्सला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून 76 धावांनी पराभूत व्हावे लागले. मुनाफने पाच विकेट्स मिळवत पंजाबला 163 धावांवर रोखले. मात्र सर्वच फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 87 धावांवर आटोपला. दारूण पराभवाला सामोरे जावे लागले तरी मुंबई इंडियन्सचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे.

प्रवीण कुमारने सचिन तेंडुलकरला (6) मार्शकरवी झेलबाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. फॉर्मात असलेला रोहित शर्मा बिपुल शर्माच्या गोलंदाजीवर गिलख्रिस्टकरवी यष्टिचीत झाल्यानंतर मुंबईचा डाव कोसळला. गेल्या सामन्यात चमकदार खेळी करणारा आयडेन ब्लिझार्ड (15), अ‍ॅँड्रय़ू सायमंड्स (8), अंबाती रायडू (13), टी. सुमन (4), आणि हरभजन सिंग (१२) यांनी लवकरच पॅव्हेलियनमध्ये हजेरी लावल्याने मुंबईची स्थिती  7 बाद 69 अशी झाली. किरॉन पोलार्डकडून स्फोटक खेळीची अपेक्षा होती. दोन जीवदान मिळाल्यानंतर फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने मार्शकडे झेल दिला. भार्गव भट्टने चार चेंडूत तीन विकेट्स मिळवत मुंबईचा डाव 87 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईची ही या मोसमातील नीचांकी धावसंख्या ठरली.