गैरवर्तणूकप्रकरणी वॉर्नला 50,000 डॉलर्सचा दंड
मुंबई-राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय दिक्षित यांच्याशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी राजस्थान रॉयलचा कर्णधार शेन वॉर्नवर 50 हजार अमेरिकी डॉर्लसचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडियन प्रिमियर लिग अर्थात आयपीएलच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे.
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय दिक्षित यांच्याशी शेन वॉर्नने गैरवर्तन केले होते. याप्रकरणी दिक्षित आणि राजस्थान असोसिएशनने आयपीएलच्या शिस्तपालन समितीकडे वॉर्न विरोधात तक्रार नोंदवली होती. शिस्तपालन समितीने वॉर्न आणि दिक्षित या दोघांना मंगळवारी चौकशीचे समन्स बजावले होते. हा प्रकार घडल्यानंतर शेन वॉर्नने माफी मागितल्याने त्याच्यावर आयपीएलमध्ये खेळण्यात बंदी घालण्याऐवजी 50 हजार डॉलर्सचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच या पुढील सामन्यांत अशा प्रकारचे वर्तन त्याच्याकडून घडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
