Home | २६ जुलै | महाडच्या १० गावांवर अजून आभाळ फाटलेले!

महाडच्या १० गावांवर अजून आभाळ फाटलेले!

महाड- तालुक्यातील १४ गावांवर २६ जुलै २००५ रोजी कोसळलेलं आभाळ अजूनही तसंच आहे. त्या मध्यरात्री दासगांव, जुई, रोहन आणि कोंडीवते गावांवर दरड कोसळल्यामुळे मोडलेले संसार अजूनही सावरलेले नाहीत. स्वयंसेवी संस्थांनी अनेक कुटुंबांच्या डोक्यावर छप्पर उभे केले असले तरी १० दरडग्रस्त गावांमधील रहिवासी  पुनर्वसनासाठी अद्यापही सरकारदरबारी उंबरठे झिजवत आहेत. सव, कोथेरी (जंगमवाडी), शिंगर कोंड (मोरेवाडी) तर दासगांव, चोचिंदे, चोचिंदेकोंड, मोहोत (सुतारवाडी), दाभोळ मोहल्ला, खरे तर्फे तुडील आणि आंबिवली (पातेरेवाडी) या गावांमधील ४९४ बेघर कुटुंबांची परवड चार वर्षानंतरही संपलेली नाही.

 

२६ जुलैच्या मध्यरात्री दासगाव, जुई, रोहण आणि कोंडीवते गावांवर दरड कोसळून १९२ गावक-यांचा मृत्यू झाला होता. काट्यकुटक्यांच्या संसारामधील किडुकमिडुक त्या काळरात्री दरडींची दगडमाती आणि चिखलाच्या ढिगा-याखाली गडप झाले. कुटुंबेच्या कुटुंबे या दरडींखाली गाडली गेली. जगले-वाचले अशांपैकी २०६ बेघर कुटुंबांना प्राईड इंडिया, लालबागचा राजा आणि जनकल्याण ट्रस्ट अशा सामाजिक संस्थांनी पक्की घरेही बांधून दिली. पण उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनाकडे सरकारने चार वर्षात ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे सामाजिक संस्थांची मदत मिळाली नसती तर आमचे काय झाले असते? असा सवाल येथील गावकरी करत आहेत.

कोंडीवते वगळता या बेघर कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सरकारने साधी जमीनही उपलब्ध केलेली नाही. यामुळे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला तरी घर बांधायचे कुठे? हा यक्षप्रश्न कायम आहे. त्यामुळे २६ जुलैला गमावलेल्या नातेवाईकांना दरवर्षी आदरांजली वाहायची आणि पुनर्वसनाची वाट पाहत अश्रूंना वाट करून द्यायची यापरता या कुटुंबांपुढे  दुसरा पर्याय नाही. 

मदतीचे हात..

दासगांव, रोहण, जुई आणि कोंडीवते गावांतील २०६ बेघर कुटुंबांच्या निवा-याची सोय सामाजिक संस्थांनी केली. यामध्ये दासगांव आदिवासी वाडीतील ४३ कुटंबे, रोहण १४, कोंडीवते येथील ६६ कुटुंबांना जनकल्याण ट्रस्टने पक्की घरे बांधून दिली. तर जुई येथील ६६ कुटंबांना प्राईड इंडिया आणि लालबागचा राजा या संस्थांमार्फत घरे बांधून देण्यात आली. महाडवासीयांसाठी २५ जुलै २००५ च्या मध्यरात्रीपासूनच २६ जुलैसुरू झाला होता. जोरदार आवाज करत दरडी घरांवर कोसळल्या आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. दासगांव (४८), जुई (९२), कोंडीवते (३३) आणि रोहण (१८) अशी त्या काळरात्री झालेली जीवितहानी आहे. अन्य गावांतही हाहाकार उडाला होता. दोन दिवसांनी  तालुक्याच्या दिशेने मदतीच्या गाड्याधावल्या पण तेव्हा उशीर झाला होता. या आपत्तीग्रस्तांसाठी २६ जुलैआजही सुरूच आहे.