Home | मध्यंतर | बिनगोष्टींची चित्रं..

बिनगोष्टींची चित्रं..

कॉमिक्स म्हणजे सर्वसाधारणपणे, चित्रांमधून सांगितलेली गोष्ट. पण, रूढार्थानं गोष्ट नसलेला आणि नाटय़मय घटनाही कमी असलेला विषय कॉमिक्ससारख्या चित्रांमधून मांडण्याची परंपरा आता ५० वर्षाची झाली आहे! ग्राफिक नॉव्हेलच्या कूळकथा अनेक असल्या तरी १९६०च्या दशकात, अमेरिकीपणाचा तिटकारा असलेल्या हिप्पींच्या अंडरग्राउंड कॉमिक्सपासून अशी पुस्तकं सुरू झाली. पुढे १९८५मध्ये डेरिडा फॉर बिगिनर्स’, ‘पोस्टमॉडर्निझम फॉर बिगिनर्सअशा गंभीर विषयांचा परिचय कॉमिकचित्रांमधून करून देणारी पुस्तकंही निघाली. तिथून पुढे कॉमिक चित्रांचा आधार घेणारा हा वाङमयप्रकार सशक्त होत गेला. आर्ट ष्पीगेलमान यानं जर्मन ज्यूंच्या छळवादावरली माऊसग्राफिक नॉव्हेल (दोन भागांत : १९८६ आणि १९९१मध्ये) सिद्ध केली, तिला तर पुलित्झर पारितोषिकमिळालं! याच आर्ट ष्पीगेलमान यांनी पुढे, ‘नाइन इलेव्हनच्या (न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त करणा-यां) हल्ल्याबद्दल इन नो श्ॉडो ऑफ टॉवर्सहे पुस्तकही लिहिलं. ज्यो सॅको यानं कॉमिकबुक पत्रकारितेचा नवा प्रवाहच १९९३ पासून रुळवला. त्याच्या पॅलेस्टाइन’ (२००१) या ग्राफिक नॉव्हेलचाही बाज पत्रकारानं लिहिलेल्या वास्तव-कादंबरीसारखा आहे.

 

भारतात ग्राफिक नॉव्हेल हा वाङमयप्रकार फारसा रुळलेला नाही. पण, सारनाथ बॅनर्जी यांनी २००४मध्ये कॉरिडॉरसिद्ध केली, ती पेंग्विन प्रकाशनानं छापली, तेव्हापासून या प्रकाराला भारतात बरे दिवस येण्याची आशा बळावली. दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील एका छोट्याशा पुस्तक-दुकानाच्या मालकाशी नानापरींच्या व्यक्तिमत्त्वांचे दुवे कसे जुळलेले होते आणि देशाच्या राजधानीच्या याच मध्यवर्ती भागात, अमली पदार्थ विक्रीसारखे बेकायदा धंदेही कसे सुखेनैव चालत होते, याचं सचित्र वर्णन करणा-यां या लघुकादंबरीला अंत नाही.. शेवटबिवट कशाला असायला हवा, असा सवाल ती करते! याच बॅनर्जी यांची द बार्न आउल्स वंडर्स केपर्सही कोलकात्यात घडणारी दुसरी (२००७) ग्राफिक नॉव्हेल. पण तरीही मोठा आशय साध्या चित्रांमधून सांगणा-यां अमर चित्र कथाभारतात जितक्या लोकप्रिय झाल्या, तशी सार्वभाषिक लोकप्रियता ग्राफिक नॉव्हेलला मिळालेलीच नाही.