अवकाळी पावसाने विदर्भातील पिकांचे नुकसान
अमरावती- शुक्रवारी पहाटे पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, वाशीम, बुवडाणा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना बसला आहे. अमरावती जिल्ह्यासह शहरालाही शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शुक्रवारी पहाटे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव-सुरजी, धामणगाव, नांदगाव, खांडेश्वर या तालुक्यात वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा पिकांचे, मोहोरलेल्या आंबी पिकांचे आणि कापणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सोसाट्याने वाहणा-या वा-यांमुळे अमरावती शहरातील अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटल्याने वीजप्रवाह खंडीत झाला आहे. त्याचप्रमाणे वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे, कौले उडून गेली आहेत.
