Home | महाराष्ट्र | व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांना नोटिस

व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांना नोटिस

नागपूर- राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) खरेदीसाठीच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाने नोटिसा बजावल्या आहेत.

स्वाइन फ्लूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने निविदा मागवल्या होत्या. मात्र या प्रक्रियेत अनियमितता असल्याची तक्रार करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना येत्या 25 मार्चपर्यंत उत्तरे देण्याचे निर्देश चव्हाण आणि गावित यांना न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.  

भूमीपुत्र चेतना ट्रस्ट या खासगी संस्थेने ही याचिका दाखल केली असून वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषधे विभागाचे संचालक आणि अन्न आणि औषध प्रशासनालाही या प्रकरणात प्रतिवादी करून घेण्यात आले आहे.