मर्लिन मन्रोच्या काही अप्रकाशित छबी
हॉलिवुडची मदनिका मर्लिन मन्रोची ब्लॅक अँड व्हाइट रोलने काढलेली काही अप्रकाशित छायाचित्रे तब्बल 50 वर्षानंतर समोर आली आहेत.
हॉलिवुडची मदनिका मर्लिन मन्रोची ब्लॅक अँड व्हाइट रोलने काढलेली काही अप्रकाशित छायाचित्रे तब्बल 50 वर्षानंतर समोर आली आहेत. ही सर्व छायाचित्रे ‘लाइफ’ या विख्यात नियतकालिकातील विभागातील कपाटात पडून होती. अलीकडे ‘लाइफ’ने त्यांच्या छायाचित्रकारांनी केलेल्या प्रत्येक फोटोशुटचे ‘डिजिटलायजेशन’ करण्याचे काम हाती घेतले असताना हे फोटो सापडले. मात्र, मन्रो यशाच्या शिखरावर असताना लाइफने ही छायाचित्रे का प्रसिद्ध केली नाही, याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही. ही छायाचित्रे काढली त्यावेळी जगाच्या दृष्टीने अनोळखी असलेली मन्रो फक्त 24 वर्षाची होती. घायाळ करणा-या सौंदर्यवतीची ‘आयकॉनिक सेक्स सिंबॉल’ अशी ख्याती आजही टिकून आहे.
‘टि्वेटीएथ सेन्च्युरी फॉक्स’ या चित्रपट निर्मिती कंपनीने मन्रोला एका चित्रपटासाठी करारबद्ध केले होते. त्या चित्रपटासाठी लॉस एन्जेलिस येथील ग्रिफिथ पार्कमध्ये ऑगस्ट 1950 मध्ये ‘इडी क्लार्क’ या लाइफ नियतकालिकाच्या छायाचित्रकाराने तिची ही छायाचित्रे काढली.
हॉलिवुडमध्ये प्रवेश करण्याआधी स्वच्छ नैसर्गिक प्रकाशात काढलेल्या या छायाचित्रात मन्रो कॅमे-याला अत्यंत मोकळेपणाने सामोरे जाताना नजरेतील धीटाई समोरच्या व्यक्तीचा वेध घेताना दिसते.
