ओंबळे, सोळंकीचा मारेकरी कसाबच
मुंबई- गिरगाव (विनोली) चौपाटी येथे पोलिसांशी झालेल्या झटापटीदरम्यान अजमल कसाबने त्याच्याकडील रायफलीतून गोळ्या झाडून सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे यांची हत्या केली आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांना जखमी केले, याचे ठोस पुरावे न्यायालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे कसाब हाच ओंबळे यांचा मारेकरी आहे, असा ठाम दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी केला.
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कसाब व त्याचा साथीदार अबू इस्माईल हे दोघे गिरगाव चौपाटीच्या विनोली जंक्शनवर दा. भ. मार्ग पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत अडकले होते. त्यावेळी पोलिसांबरोबरच्या चकमकीत अबू ठार झाला तर कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्यावेळी कसाबने त्याच्या एके-47 रायफलीतून गोळ्या झाडल्याने ओंबळे यांचा मृत्यू झाला तर गोविलकर गंभीर जखमी झाले. याबाबत कसाबवर ओंबळेंच्या हत्येचा आरोप ठेवताना, सरकारी पक्षाने गोविलकर यांच्याव्यतिरिक्त अबूवर गोळ्या झाडणारे तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले पोलिस अधिकारी भास्कर कदम व हेमंत बावधनकर यांचीही साक्ष नोंदवली. तथापि, याविषयी कोणताही स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी तपासला गेलेला नाही. त्यामुळे या घटनेविषयी स्वतंत्र साक्षीदार का नाही आणला? अशी विचारणा न्या. एम. एल. टहलियानी यांनी यावेळी सरकारी पक्षाला केली. तेव्हा ‘ही घटना 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर घडली होती. शिवाय वृत्तवाहिन्यांमुळे हा दहशतवादी हल्ला असल्याचेही तोपर्यंत लोकांना कळले होते. त्यामुळे या चकमकीच्यावेळी तिथे कोणीच नव्हते. परिणामी तपास अधिका-यांना कोणीही स्वतंत्र साक्षीदार मिळू शकला नाही’, असे स्पष्टीकरण निकम यांनी केले.
चकमकीची घटना स्पष्ट करण्यासाठी निकम यांनी कसाबच्या कबुलीजबाबातील ठराविक भागाचाही आधार घेतला. तथापि, त्यातील ‘मैने क्लाशन की (एके-47 रायफल) ट्रिगर दबायी तभी रायफल पकडे हुए पुलिसवाले को गोलियां लगी..’ या कसाबच्या वाक्याकडे न्यायाधीशांनी निकम यांचे लक्ष वेधले. ‘जो माणूस आपल्या संपूर्ण कबुलीजबाबात एके-47 ला क्लाशन म्हणतो, तो मध्येच त्याला रायफल कसा म्हणेल?’, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला. त्यावर ‘कसाबने कदाचित एकदा तसा उल्लेख केला असेल..’, असे म्हणत आपण प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीही विचारात घेऊन एकत्रितपणे परिस्थितीचा विचार करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद निकम यांनी केला.कसाब व त्याच्या नऊ साथीदारांनी कराचीहून निघाल्यानंतर पोरबंदरजवळ ‘एमव्ही कुबेर’ या नौकेचे अपहरण केले. त्यातील चौघा खलाशांना ‘अल-हुसैनी’वर पाठवल्यानंतर नाखवा अमरसिंह सोळंकीच्या मदतीने त्यांनी मुंबईचा किनारा गाठला. तिथे कसाबने सोळंकीची गळा चिरून हत्या केली, हे सारे कसाबच्याच कबुलीतून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय त्याच्याच सांगण्यावरून पोलिसांनी ‘कुबेर’चा शोध लावला आणि इंजिन रूममध्ये लपवलेला सोळंकीचा मृतदेहही हस्तगत केला. त्यानंतर ‘कुबेर’चे मालक विनोद मसानी यांनी नौकेवर स्वत:च भरून दिलेले सामान न्यायालयात ओळखतानाच पाकिस्तानस्थित कंपन्यांच्या अनेक सामानांबाबत अनभिज्ञता दाखवली. आपल्या नौकेचा नाखवा सोळंकी व अन्य चार खलाशी पुन्हा परतलेच नसल्याचेही त्यांनी साक्षीत सांगितले. दुसरीकडे, सोळंकीच्या हत्येचे आदेश दिले गेले होते, याचा सुसंगत पुरावाही हल्लेखोर व पाकिस्तानातील सूत्रधारांच्या संभाषणातून समोर आला आहे. त्यामुळे कसाबनेच सोळंकीची हत्या केल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद निकम यांनी यावेळी केला.
बधवार पार्क येथे दहा जणांना एका स्पीडबोटीमधून किनाऱ्यावर उतरताना पाहणारे भरत तामोरे यांनी त्यातील एक कसाबच असल्याचे न्यायालयात ओळखले आहे. त्याशिवाय या बोटीसंदर्भात अन्य अनेकांच्या साक्षीही सुसंगत आहेत. त्यामुळे 26 नोव्हेंबरच्या रात्री दहा हल्लेखोर मुंबईकिनारी दाखल झाल्याचे नि:संशय सिद्ध होते, असा दावाही निकम यांनी यावेळी केला.
दरम्यान, बुधवारच्या सुनावणीचे चुकीचे वृत्तांकन केल्याबद्दल न्यायालयाने काही वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना (प्रहार नव्हे) गुरुवारी फटकारले. ‘भादंविच्या कलम 1221 अन्वये देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा आरोप कसाबविरुद्ध लावला जाऊ शकत नाही’, अशा आशयाचे मत न्यायालयाने नोंदवल्याचे या वृत्तांमध्ये म्हटले होते. तथापि, तसे कोणतेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेले नव्हते, असे न्या. टहलियानी यांनी स्पष्ट केले. तसेच याविषयी शुक्रवारच्या अंकात खुलासा प्रसिद्ध करण्याचे आदेशही संबंधित वृत्तपत्रांच्या संपादकांना व प्रतिनिधींना लेखी आदेशाद्वारे दिले.
कसाबला झाला रक्तदाबाचा त्रास!
गुरुवारच्या सुनावणीदरम्यान कसाबने अचानक आपल्याला कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगत ‘अंडासेल’मध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे न्यायालयाने त्याला काही काळासाठी तुरुंगात परत पाठवले. तसेच नंतर तुरुंग अधीक्षक राजेंद्र धामणे यांना न्यायालयात बोलावून कसाबच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचे
निर्देश दिले.
