मुंबईकरांचा प्रवास सुखाचा
मुंबई- परळच्या रखडलेल्या पादचारी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण कराच, असा सज्जड दम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी रेल्वे अधिका-यांना दिला आहे. त्यामुळे या वर्षअखेपर्यंत हा पूल पूर्ण करण्याचे रेल्वे अधिका-यांनी ठरवले आहे. याशिवाय शीव, कुर्ला, ठाणे येथील पादचारी पूलही (एफओबी) ठरलेल्या वेळेतच पूर्ण करण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. परळ पुलासाठी एक कोटी 41 लाख रुपये खर्च येणार आहे.
हा पूल 30 जून 2011 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेने खासदार मिलिंद देवरा यांना दिले होते. पण हे काम सुरू करण्यातच बरेच अडथळे आले. गेल्या पंधरवडय़ात या पुलाच्या ‘फाउंडेशन’चे काम पूर्ण करण्यात आले आहे, असे रेल्वेचे प्रवक्ते अशोक सिंग यांनी सांगितले. परळचा सध्याचा पादचारी पूल जुना आहेच आणि कालौघात परळच्या भागात अनेक कॉर्पोरेट व खासगी कार्यालये आल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या पुलावरून रोज ये-जा करणा-या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचल्याने हा पूल अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे तेथे नवीन पूल बांधण्याची मागणी होत होती. त्याची दखल तत्कालीन महाव्यवस्थापक भरतभूषण मोदगील यांनी घेऊन रेल्वेच्या अधिका-यांना या पुलासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी दिलेल्या अहवालावरून येथे नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पण खा. देवरा यांनी पुलाचे बांधकाम तातडीने हाती घेण्याची मागणी मोदगील यांच्याकडे केली असता, हे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. पण ते रखडलेच आणि अखेरीस या पुलाचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले ‘फाउंडेशन वर्क ’ गेल्या पंधरवडय़ात पूर्ण झाले आहे.
नव्याने बांधण्यात येणा-या पुलाची रुंदी 4.8 मीटर असून, तो परळ स्थानकाच्या उत्तरेकडे म्हणजेच दादर स्थानकाच्या दिशेला बांधण्यात येईल. फलाट क्रमांक एक आणि दोनवर तो उतरणार असून, परळ स्थानकाचे ‘रिमॉडेलिग’ झाल्यानंतर गरजेनुसार हा पूल फलाट क्रमांक तीन आणि चारवरही उतरवण्यात येईल वा त्याचा विस्तार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
