शहिदांना ठाणे, रायगड जिल्ह्यांत आदरांजली
ठाणे/रायगड- २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले निरापराध लोक आणि शहीद जवानांना गुरुवारी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आणि मेणबत्ती व शांतता मोर्चाचे आयोजन करून आदरांजली वाहिली. ठाणे आणि नालासोपारा येथे शहिदांना आदरांजली वाहण्याबरोबरच दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाब याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
२६/११ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी एक वर्ष झाले. त्यानिमित्त ठाणे शहरात विविध ठिकाणी यात मरण पावलेल्या लोकांना आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिस व सुरक्षा दलांच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानिमित्त शहरात मेणबत्ती व शांतता फेरींचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. मुंब्रा-कौसा येथे सकाळी समाजवादी पक्षाच्यावतीने कसाबचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. यावेळी तेथील सपच्या संतप्त मुस्लिम कार्यकर्त्यांनी पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
कॅसबर डान्स अकादमीच्यावतीने ठाण्यातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने शहिदांना श्रद्धांजली वाहिली. बाळकुम नाका येथे भाविसेच्या नेतृत्वाखाली कसाबच्या पुतळ्याला फाशी देण्यात आली. राट्रवादी काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयात शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
नवी मुंबईत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दैनिक ‘प्रहार’ व येथील विद्यालयांच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आयसीएल स्कूल, कोपरखरणे येथील ज्ञानविकास शाळा येथील विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून शहिदांना आदरांजली वाहिली. नवी मुंबईत पत्रकारांनीही आदरांजली वाहिली.
अभ्यासक्रमात समावेशाची मागणीमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध करून आणि तो दरवर्षी आदरांजली वाहून स्मरणात ठेवण्याऐवजी भावी पिढीला त्याची माहिती मिळावी यासाठी अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, अशी मागणी नवी मुंबईतील तरुणांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.
रस्त्याला चौधरींचे नावछत्रपती शिवाजी टर्मिनस येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान मुरलीधर चौधरी यांच्या स्मरणार्थ अंबरनाथमधील वडवली येथील त्यांच्या घरासमोरील रस्त्याला चौधरी यांचे नाव गुरुवारी देण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याच्या प्रथम स्मृतीनिमित्त या रस्त्याचे ‘शहीद मुरलीधर चौधरी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. आमदार बालाजी किणीकर, नगराध्यक्षा संपदा गडकरी, उपनगराध्यक्षा अंजली राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विरार रेल्वे स्थानकासमोर माजी आमदार हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीतर्फे शहिदांना आदरांजली अर्पण करून कसाब याला फाशी देण्यात आली. वसईतील पापडी येथे मनसेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पेण नगर परिषद आणि रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद सभागृहात स्तब्धता पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ, कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालय, क्षत्रिय मराठा संघ, कर्जत पोलिस ठाणे, कर्जत युवा ग्रुप यांच्यावतीने शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
