कृत्रिम चोचींद्वारे धनेश पक्ष्यांना जीवदान
लुप्त होणा-या प्रजाती वाचवण्यासाठी देशात अनेक मोहिमा हाती घेण्यात येतात. मात्र, अरुणाचल प्रदेशमध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असलेला धनेश (हॉर्नबिल) पक्षी वाचवण्यासाठी एक वेगळीच मोहीम सुरू आहे. धनेश पक्ष्यांची कृत्रिम चोच बनवून त्यांची ही प्रजाती वाचवण्याचे अभिनव प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात अपेक्षित यशही मिळत आहे.
धनेश पक्ष्याला अरुणाचल प्रदेशचा ‘राज्यपक्षी’ असा दर्जा मिळाला आहे. मात्र, या पक्ष्यांच्या चोचींसाठी आणि पिसांसाठी त्यांची ‘न्यिशी’ या जमातीकडून शिकार करण्यात येते. त्याचा वापर ‘पुडुम’ म्हणून ओळखली जाणारी त्यांची पांरपरिक पगडी सजवण्यासाठी आणि वेशभूषेसाठी केला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षात या पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे वनअधिका-यांनी सांगितले.
‘न्यिशी’ जमातीकडून होणाऱ्या या पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी उप मुख्य वन्यजीव संरक्षक चुखू लोमा यांनी कृत्रिम फायबर चोचींचा पर्याय शोधला. त्यांनी ‘न्यिशीं’ना विश्वासात घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांनी सजावटीसाठी या कृत्रिम चोची वापराव्यात. मात्र, या लुप्त होणा-या पक्ष्यांची शिकार करू नये, असे त्यांना समजावण्यात आले. आज अनेक ‘न्यिशी’ लोमा यांना सक्रिय पाठिंबा देत आहेत. धनेश पक्ष्यांची घरटी वाचवण्याच्या व नवी घरटी तयार करण्याच्या माध्यमातूनही त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेत जनतेचाही सहभाग असणार आहे.
