Home | देश | जन्मतारखेची लढाई लष्करप्रमुख हरले

जन्मतारखेची लढाई लष्करप्रमुख हरले

नवी दिल्ली- जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून सरकारशी सर्वोच्च न्यायालयात युद्ध पुकारलेल्या लष्करप्रमुखांना मात्र पराभवचा धक्का बसला. जनरल व्ही. के. सिंग यांची जन्मतारीख 10 मे 1950 अशीच ग्राह्य धरण्यात यावी असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना आपली याचिका मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जनरल सिंग यांना आता यावर्षी 31 मे रोजी आपले पद सोडावे लागणार आहे.

  

जन्मतारीख नोंदवण्याबाबत सरकारकडून कोणतीही चूक झालेली नाही. त्यामुळे सध्या कागदपत्रांवर असलेली 10 मे 1950 ही जन्मतारीखच ग्राह्य  धरण्यात यावी, असे नमूद करतानाच सिंग यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने खोडून काढला आणि त्यांची याचिका निकालात काढली. जन्मतारखेत घोळ झाला त्याचवेळी योग्य पावले उचलून बदल का करवून घेतले नाहीत, असा सवाल ही न्यायालयाने लष्करप्रमुख सिंग यांना विचारला.

 सरकारकडून सिंग यांच्या कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. सरकारचा लष्करप्रमुखांच्या कामगिरीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी लष्करप्रमुख म्हणून काम सुरू ठेवावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जनरल सिंग यांनी 2008 आणि 2009 मध्ये दिलेल्या पत्रांमध्येही 10 मे 1950 ही जन्मतारीख मान्य केली होती. त्या पत्राला त्यांनी बांधील राहावे. यूपीएससीमध्ये चुकीची माहिती नोंदवण्यात आली होती, असे सिंग यांचे म्हणणे आहे. मग तेव्हाच त्यांनी त्यात सुधारणा का केली नाही, असा सवालही न्यायालयाने सिंग यांना विचारला. दोन तास झालेल्या सुनावणीनंतर जनरल सिंग यांनी दुपारी दोन वाजता आपली याचिका मागे घेतली.  तत्पूर्वी, शुक्रवारी सकाळी लष्करप्रमुखांच्या जन्मतारखेवरून केंद्र सरकारने काढलेली अधिसूचना मागे घेत असल्याचे महाधिवक्ते जी. ई. वाहनवटी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. आर. एम. लोढा आणि एच. एल. गोखले यांच्या खंडपीठासमोर सांगितले.   

वाद 50 आणि 51 चा

लष्करप्रमुखांचा जन्म 1950  चा की 1951  चा हा वाद आहे. सध्याच्या कागदपत्रांनुसार लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांचा कार्यकाळ 31 मे 2012  रोजी संपत आहे. मात्र आपली जन्मतारीख 10 मे 19520  नसून 10 मे 1951 असल्याचे सिंग यांचे म्हणणे होते. त्यामुळे आपल्याला आणखी एक वर्ष लष्करप्रमुख पदी राहता येईल असा त्यांचा दावा होता. सरकारने त्यांची ही मागणी अमान्य केल्यानंतर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली जन्मतारीख बदलण्यासाठी याचिका केली होती. तसेच आपल्या जन्मतारखेचा घोळ होण्यास प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी न्यायालयात म्हटले होते.  मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना आपली याचिका मागे घेण्यास सांगितले आणि 50 51 चा वाद मिटवला.  

कोर्टाने फटकारले
  • जर यूपीएससीमध्ये जन्मतारखेची नोंदणी चूकीची होती तर त्याचवेळी सुधारणा का नाही केली?
  • 2008 आणि 2009 साली पदोन्नतीच्या वेळी लष्कराला दिलेल्या पत्रात 10 मे 1950 हिच जन्मतारीख मान्य का केले?
  • त्यावेळी ही जन्मतारीख होती तर मग त्यानंतरच वाद का निर्माण झाला?