ओदिशात विषारी दारुचे 19 बळी
कटक- ओदिशामध्ये विषारी दारु प्यायलाने मरण पावलेल्यांची संख्येत वाढ होत असून बुधवारी 14 जण मरण पावले आहेत. त्यामुळे विषारी दारूमुळे मरण पावलेल्यांची संख्या 19 झाली आहे. विषारी दारू प्यायलेल्यां पैकी आणखी 14 जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता.
भुवनेश्वरजवळील एका औषधनिर्माण कंपनीतील खोकल्याचे औषध दारुमध्ये मिसळून ही दारू सोमवारी रात्री महिदरपाडा परिसरातील लोकांनी प्यायली. ही दारू प्यायल्यानंतर 13 जणांना उलट्या, चक्कर,डोकेदुखीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी 14 जणांचा मृत्यू झाल्याने या विषारी दारू प्रकरणातील बळींची संख्या 19 झाली आहे. याप्रकरणातील 14 जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्याता वैद्यकीय प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या औषधनिर्माण कंपनीला पोलिसांनी सील ठोकले असून कंपनीच्या मालकांची चौकशी चालू आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत.
