Home | देश | अश्लील चित्रफीत प्रकरण आमदारांना नोटीस

अश्लील चित्रफीत प्रकरण आमदारांना नोटीस

बंगळूरु- कर्नाटक विधानसभेत मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहणा-या तीन मंत्र्यांना विधानसभेचे अध्यक्ष के.जी.बोपैय्या यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहकार मंत्री लक्ष्मण सावदी, महिला व बालकल्याण मंत्री सी.सी.पाटील आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कृष्णा पालेमर यांना अध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे. आठ फेब्रुवारी रोजी विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना अश्लील चित्रफीत पाहणा-या भारतीय जनता पक्षाच्या या तीन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 
 
या मंत्र्यांना तीन फेब्रुवारीच्या आत या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. याप्रकरणी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत या तिघांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले नसल्याचे स्पष्ट केले. नियमानुसार या प्रकरणाची सभागृहातील सात जणांच्या समितीकडून चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले. या समितीची नेमणूक 13 फेब्रुवारीनंतर करण्यात येईल असे बोपैय्या यांनी सांगितले. 
 
या समितीमध्ये भाजपचे चार, काँग्रेसचे दोन, जनता दल सेक्युलर पक्षाचा एक सदस्य असणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी एस.सुरेश कुमार यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. समितीला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. तसेच समितीने आपला अहवाल 12 मार्च पूर्वी सादर करायचा आहे, असे बोपैय्या यांनी सांगितले. 

या तीन मंत्र्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यासंदर्भात बोपैय्या यांना विचारले असता, ही घटना घडली तेव्हा सभागृहात आपण उपस्थीत नव्हतो. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेले सदस्य या मंत्र्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करु शकतात.