चेन्नईमध्ये विद्यार्थ्याने केला शिक्षिकेचा खून
चेन्नई- सातत्याने आपल्यावर ओरडणा-या शिक्षकेवर असलेल्या रागातून 15वर्षांच्या विद्यार्थ्याने भर वर्गात तिच्यावर चाकूने हल्ला करून ठार मारल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथील एका खासगी शाळेत गुरुवारी घडली. याप्रकरणी त्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चेन्नईतील सेंट मॅरीज अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षिका उमा माहेश्वरी (39) या एका वर्गात शिकवत होत्या. त्यावेळी त्याच शाळेतील नववीचा विद्यार्थी मोहम्मद इरफान (15) हा पेपरमध्ये चाकू लपवत वर्गात शिरला. इरफानने माहेश्वरी यांच्या मानेवर आणि चेह-यावर चाकूने वार केले. या घटनेमुळे घाबरलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर इरफानने तेथून पळ काढायचा प्रयत्न केला. मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. जखमी अवस्थेत असलेल्या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या शिक्षिकेबद्दल असलेल्या तीव्र रागातूनच आपण हे कृत्य केल्याची इरफानने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना आमच्यासाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया शाळेचे प्रशासकीय अधिका-यांनी सांगितले.
