Home | देश | विशेष तपास पथकाची मोदींना क्लीन चीट

विशेष तपास पथकाची मोदींना क्लीन चीट

अहमदाबाद- गुजरातमधील गोध्रा येथे 2002 साली उसळलेल्या दंगलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)  मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुरुवारी क्लीन चीट दिली.

एसआयटीने महानगरीय न्यायालयात मोदी आणि अन्य 62 जणांबाबत अंतिम अहवाल दाखल केला. काँग्रेसचे दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झकीया जाफरी यांनी मोदी व इतर 62 जणांविरोधात याचिका दाखल केली होती. गोध्रा दंगलीमध्ये मोदींचा हात होता असा आरोप जाफरी यांनी केला होता. या दंगलीत गुलबर्ग सोसायटीमधील 67 नागरिक ठार झाले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  मात्र या प्रकरणी कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे चौकशी पथकाचे प्रमुख आर. के. राघवन यांनी न्यायालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले.

गेल्या वर्षी 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने झकिया यांच्या याचिकेवर कोणताही आदेश न देता एसआयटीच्या अहवालानंतर कनिष्ठ न्यायालयानेच निर्णय द्यावा असे सांगितले होते.मोदी  गुजरातच्या तत्कालिन पोलिस महासंचालकांसह  63 जणांवर फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेल्या जाफरी यांची दखल न घतेल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वी  न्यायमूर्ती शहा यांनी याबाबत दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्याच्या सूचना जाफरी यांना केल्या होत्या मात्र त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातच जाण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.