Home | राशीभविष्य | ग्रहांचे भाकीत, १५ मार्च ते २१ मार्च २००९

ग्रहांचे भाकीत, १५ मार्च ते २१ मार्च २००९

मेष- उत्साहाने कामे होतील

राशीस्वामी मंगळ लाभात, तृतीयेश बुध व हर्ष-नेपच्यूनबरोबर. बुद्धी व शक्तीचा अपूर्व संगम झाल्याचा दिसून येईल. सर्व कामे उत्साहाने व उत्स्फूर्तपणे कराल. हाती घेलेले काम कितीही अडथळे आले तरी पूर्णत्वास न्याल. जीवनशैलीत आमूलाग्र बदल होईल. मौजमजा, करमणुकीच्या साधनांवर बराच खर्च होईल. नोकरीत मान-सन्मानाचे योग येतील. सभा-संमेलने, चर्चासत्रात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. 

वृषभ-: सार्वजनिक क्षेत्रात चमकाल

दशमात मंगळ-बुध-हर्षल-नेपच्यून व लाभात राशीस्वामी शुक्र, चतुर्थेश रवीबरोबर अशी ग्रहस्थिती. गृहसौख्यात भर पडेल. भौतिक सुख-सुविधांचा उपयोग घ्याल. घरात पै-पाहुण्यांची वर्दळ असेल. सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर राहून कामगिरी कराल. खेळाडूंना विशेषत: नावलौकिक चांगला मिळेल. जवळपासचे छोटे प्रवास घडतील. वाईट बातम्या समजल्या तरी मानसिक संतुलन टिकवण्याचा प्रयत्न करा. 

मिथुन- त्वरित निर्णय घ्याल

नवमातील राशीस्वामी बुध, लाभेश मंगळाबरोबर. कोणत्याही गोष्टीचे आकलन त्वरित होईल. निर्णय लगेच घ्याल. जुन्या चुका टाळून नवीन मार्गाचा अवलंब कराल. बौद्धिक क्षमता विकसित होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारेल. बेरोजगारांना नोकरीचे योग येतील. व्यावसायिकांना नवीन सौदे करण्यात यश येईल. मित्रमंडळीचे, सहका-यांचे मार्गदर्शन तर मिळणारच आहे. 

कर्क- पराधीन आहे जगती..

 अष्टमातील मंगळ-बुध-हर्षल-नेपच्यून व जोडीला साडेसाती यामुळे यशाचे रूपांतर बहुधा अपयशात झालेले असावे. जवळच्या व्यक्तींचा दुरावा, अबोला त्रस्त करीत असेल. नोकरी-व्यवसायात प्रतिकूल घटना घडत असल्याची प्रचिती येण्याची शक्यता आहे. मारुतीरायांचे भिमरूपी महारूद्रा..हे स्तोत्र वाचल्याने निश्चितपणे या संकटांतून बाहेर याल. योग्य व्यायाम व आहार यावर लक्ष केंद्रित करा. 

सिंह- कार्यास विरोध जाणवेल

राशीस्थानात असलेला शनी, सप्तमातून प्रतियोग करणारे मंगळ-बुध-नेपच्यून-हर्षल व राशीस्वामी अष्टमात अशा योगात आपल्या अंगीकृत कार्यास विरोध होण्याची शक्यता आहे. नसते गैरसमज निर्माण होतील. शक्यतो वादविवाद टाळून सामंजस्याची, तडजोडी भूमिका स्वीकारणे व्यवहार्य ठरेल. कामाची दगदग वाढेल व त्यातून प्रकृतीच्या कुरबुरी वाढतील. दुस-यांची जबाबदारी स्वत:वर घेऊ नका. 

कन्या- नवीन कल्पनांचा स्वीकार कराल

षष्ठातील राशीस्वामी बुध, तृतीयेश मंगळ व हर्षल-नेपच्यूनबरोबर त्यामुळे काम नेटाने होईल, नवनवीन कल्पना सुचून त्याची अमलबजावणी लगेच कराल. मार्केटिंग क्षेत्रातील व्यक्तींना टार्गेट गाठताना वयस्कर मंडळींची मोलाची मदत मिळेल. मुत्सद्दीपणामुळे आलेल्या प्रासंगिक अडचणींचा धैर्याने सामना कराल. प्रेमीजनांना नाजूक होकार मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यमान चांगले राहील. 

तूळ- विरोधकांवर मात कराल

राशीस्वामी शुक्र षष्ठात, लाभेश रवीबरोबर, पंचमात द्वितीयेश मंगळासह बुध, हर्षल, नेपच्यून. भविष्यातील काही घटनांसाठी आगाऊ तरतूद कराल. संशोधनात्मक कार्यासाठी बहुधा नेमणूक केली जाईल. विरोधकांनी कितीही त्रास दिला तरी परिणामी आपलीच सरशी होईल. सुदैवाने गृहसौख्यात भर पडताना वैवाहिक जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत भावनिक गुंतवणूक असेल. 

वृश्चिक- भगवान के घर देर हैं, अंधेर नहीं

दशमातील शनी, बुध-मंगळ-हर्षल-नेपच्यूनच्या प्रतीयोगात त्यामुळे हाती आलेली संधी निसटते की काय अशी परिस्थिती उद्भवेल. घडणा-या कामांना विलंब झाला तरी ती निश्चितपणे होणार आहेत. सुदैवाने प्रॉपर्टी मॅटरमध्ये आर्थिक फायदा होईल. विवाहोत्सुकांना विशेषत: प्रेमविवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना सर्व अनुकूल घडताना दिसेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी दूर जावे लागेल.

 

धनू- आत्मविश्वास वाढेल

राशीस्वामी गुरू द्वितीयात राहूबरोबर असल्याने अनाकलनीय खर्च वाढतील. कुटुंबीयांतील विशेषत: वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता सतावेल. घर घेण्यासंबंधीचे विचार सफल होतील. प्रवास करताना उच्चदर्जाच्या वाहनातून फिरण्याचा योग्य येईल. नोकरीनिमित्ताने दूरवरचे प्रवास करावे लागतील. आत्मविश्वास वाढल्याने काम जलद कराल. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळेल. 

मकर- मौनं सर्वार्थ साधनम्

अष्टमातील राशीस्वामी शनी, प्रतियोग करणारे मंगळ-बुध-हर्षल-नेपच्यून अशी ग्रहस्थिती. जास्त बोलण्यापेक्षा मुद्दय़ांवर लक्ष देणे आवश्यक ठरेल. केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणी तरी लाटण्याची शक्यता आहे. शारीरिक पातळीवर भरपूर दगदग करावी लागेल. सुदैवाने राशीस्थानातील गुरू ऐन मोक्याच्या क्षणी मात्र दैवी मदत मिळवून देऊन प्रसंगातून सुटका करील. 

कुंभ- हुशारी दिसेल

राशीस्वामी शनी सप्तमात, व्ययात गुरू-राहू साधारणत: आपल्या धोरणांबाबत गैरसमज वाढवतील. राशीस्थानातील मंगळ-हर्षल- बुध-नेपच्यूनमुळे ज्ञानाची कक्षा विस्तारेल. इतरांच्या दृष्टीने कठीण असणारी कामे तुम्ही सहजगत्या हातावेगळी कराल. पाल्याच्या शिक्षणाबाबत समाधानकारक स्थिती असल्याने सहका-यांमध्ये ताठ मानेने वावराल. आव्हाने-पैजा-सट्टा या मार्गाचा अवलंब नको. 

मीन- अनपेक्षित व्यक्तींची मदत

लाभस्थानात राशीस्वामी गुरू हा राहूबरोबर, व्ययात मंगळ-बुध-हर्षल-नेपच्यून असल्याने संमिश्र स्वरूपाची फळे मिळतील. ज्यांच्याकडून अपेक्षा नसते अशा व्यक्तींची आपणहून मदत मिळेल. खर्चाच्या अनेक वाटा फुटतील. नोकरीमध्ये बढतीचे जरी योग आले तरी मनासारखी संधी मिळणार नाही. व्यावसायिकांना व्यवसायात परदेशस्थ व्यक्तींची मदत मिळून समाधानकारक कामगिरी करता येईल.