डंपिंग ग्राउंड नव्हें निसर्ग उद्यान
धारावी म्हटलं की, लांबलचक झोपडपट्टी, दुकानं आणि माणसांची बजबजपुरी, ओला-सुका कचरा, त्यावर घोंगावणा-या माशा, असंच चित्रं डोळ्यांसमोर उभं राहतं. या परिसरात दरुगधीचं साम्राज्य आहे.
धारावी म्हटलं की, लांबलचक झोपडपट्टी, दुकानं आणि माणसांची बजबजपुरी, ओला-सुका कचरा, त्यावर घोंगावणा-या माशा, असंच चित्रं डोळ्यांसमोर उभं राहतं. या परिसरात दरुगधीचं साम्राज्य आहे. ‘आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी’ हीच या भागाची ओळख. या भागातील जवळपास 37 एकर जमिनीवर केवळ घाणीचंच साम्राज्य होतं. ‘डंपिंग ग्राउंड’ अशीच एकेकाळी ओळख असलेल्या धारावीतल्या या मैदानाचं चित्र पालटलेलं आहे. अविश्वसनीय वाटत असलं तरी इथला कचरा हटवून मैदानाचं नंदनवन करण्यात आलं आहे. विविध प्राणी-पक्षी, हिरवीगार झाडं यांनी व्यापलेलं ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ मुंबईतील एक प्रेक्षणीय स्थळच आहे.
धारावीसारख्या मध्यवर्ती भागात हे उद्यान असल्याने मुंबईतल्या कोणत्याही भागातून तिथे सहज पोहोचता येतं. सायन स्टेशनला उतरून धारावी डेपोकडे जाणाऱ्या बसने किंवा रिक्षाने तिथवर जाणं सोयीचं ठरतं. धारावी डेपोच्या आधीचा बस स्टॉप हा ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ म्हणूनच ओळखला जातो. समोर दिसणारी गर्द झाडीच उद्यान जवळ आल्याची खूण सांगते. बसमधून उतरल्यावर समोरच उद्यानाचं प्रवेशद्वार दिसतं. हे मुख्य प्रवेशद्वार असून, दुसरं प्रवेशद्वार अगदी टोकाला आहे. त्याठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. रोपांची खरेदी करणा-यांनाच तिथून प्रवेश आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला सुरक्षाव्यवस्था कार्यालय आहे. तिथे उद्यानदर्शनासाठी ठरावीक शुल्क भरावं लागतं. या कार्यालयासमोरच उद्यानाची माहिती सांगणारे फलक लावलेले आहेत. एका रांगेत मांडलेल्या विविध औषधी वनस्पतींच्या कुंडय़ा आपलं स्वागत करतात. संबंधित वनस्पतीचं नाव आणि तिची माहिती सांगणारी ठळक अक्षरातली पाटीही प्रत्येक कुंडीजवळ लावण्यात आली आहे. आपल्याला माहीतही नसलेल्या कित्येक वनस्पतींची ओळख इथे होते. इथून सरळ पुढे गेलं की, उद्यानाचं कार्यालय दृष्टीस पडतं. गोल आकारात वेगळ्या पद्धतीने ही इमारत बांधण्यात आली आहे. निसर्गाशी संबंधित या इमारतीतील विविध दालनं म्हणजे एक वेगळंच आकर्षण आहे. या दालनांमध्ये निसर्गावर आधारित चित्रांचं किंवा फोटोंचं प्रदर्शनही भरवलं जातं. पर्यावरणाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी दररोज या उद्यानाला भेट देत असतात.
या गोलाकार इमारतीतून बाहेर पडलात की, तुम्ही ख-या अर्थाने उद्यानात प्रवेश करता. इथे फेरफटका मारण्यासाठी विटांची पायवाट केली आहे. तीच तुम्हाला उद्यानाचा अचूक रस्ता दाखवते. या पायवाटेच्या दुतर्फा लावलेल्या वड-पिंपळासारख्या वृक्षांच्या दाटीत, इथल्या नीरव शांततेत फेरफटका मारणं निव्वळ आनंददायी आहे. निसर्गानुभव घेताना विविध प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारांतील रंगीबेरंगी फुलपाखरं, वेगवेगळे कीटक, सरपटणारे प्राणी अशा कितीतरी नव्या गोष्टी इथे दृष्टीस पडतात. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, कीटक-किडय़ांची गुणगुण कानावर पडते. मधूनच डोकावणारी मिठी नदी.. त्यात विहरणारे पांढरे बगळे आणि पलीकडे दिसणा-या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या काचेच्या चकचकीत इमारती पाहताना एखादं विलोभनीय चित्र पाहत असल्याचाच भास होतो.
या उद्यानात अनेक औषधी वनस्पती, फळभाज्या, फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. इथल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेऊन त्यासंबंधी माहिती घेता येते. अशा प्रकारे ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’ची भेट अभ्यासपूर्ण ठरते. त्यामुळेच अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सहलींसाठी या ठिकाणाची निवड करतात.
1980 च्या सुमारास या डंपिंग ग्राउंडचं निसर्गोद्यान करण्याची कल्पना पुढे आली, मात्र प्रत्यक्ष या कामाची सुरुवात 1983 मध्ये करण्यात आली. आरोग्यदायी, मोकळं-हवेशीर उद्यान तयार करणं हा त्यामागचा मूळ हेतू होता. अलीकडेच या उद्यानाने रौप्यमहोत्सवी टप्पा पार केला. आज इथल्या वनस्पतींची मुळं खोल रुजली आहेत. पूर्वी ‘माहीम नेचर पार्क’ म्हणून ओळखल्या जाणा-या या जागेचा ताबा बीएमआरडीएकडे होता. पुढे बीएमआरडीएचं एमएमआरडीए झाल्यानंतर या उद्यानाचं नामकरण ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ असं करण्यात आलं.
पाहायला गेलं तर रहदारीच्या रस्त्याला लागूनच हे उद्यान आहे, मात्र उद्यानात शिरल्यानंतर बाहेरचा गजबजाट मागे पडतो. तिथून बाहेर पडताना आपल्या नेहमीच्या रहाटगाडय़ातून चार घटका निसर्गाच्या निर्मळ सहवासात घालवल्याचं समाधान चेह-यावरून अलगद ओसंडतं.